युध्द चालू असताना मुलं कशी खेळतात?

Image: businessinsider

सध्या तुम्ही वर्तमानपत्रात इस्त्राएल अमेरिका आणि इराण युध्दाच्या बातम्या वाचत असाल. बातम्यांमध्ये या युध्दाची दृश्य पाहात असाल. इस्त्राएल आणि पॅलेस्टाइन युध्द, रशिया आणि युक्रेन युध्दही सुरुच आहेत. या युध्दाबद्दलही तुम्ही वाचलं असेल. जगभरात सध्या कुठेनाकुठे छोटी मोठी युध्द सुरुच आहेत. काही ठिकाणी तर वर्षानुवर्षांपासून युध्द सुरु आहे. ही युध्दं सुरु असतात तेव्हा सामान्य माणसं कशी जगतात? मुलं कशी शिकतात? कुठे खेळतात असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. त्यात मुलांचं खेळणं ही तर फार महत्त्वाची गोष्ट. खेळायला मिळणं किती गरजेचं असतं हे तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती असेल. परीक्षा असू दे नाहीतर आजारपण. बाहेर ऊन असू दे पाऊस असू दे की थंडी. खेळण्यची इच्छा झाली की ती आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. युध्दग्रस्त भागात युध्दामुळे लोकांच्या जगण्याच्या प्रत्येक घटकावर गंभीर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम मुलांच्या खेळण्यावरही झाला.

हेही वाचा!

मोठी माणसं युध्द का करतात? हे मुलांनाही माहिती असायलाच हवं!

युध्दाचं स्वरुप गंभीर झालं की तेथील लोकांना आपलं घर सोडून दुसरीकडे निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहायला जावं लागतं. मुलांची शाळा, त्यांच्या खेळण्याच्या जागा सर्व युध्दात उध्वस्त होतं. जिथे खाणंपिणं अशक्य होतं, जीवाला धोका असतो तिथे मुलांच्या खेळण्याचा, त्यांना खेळायला मिळत नसल्याचा विचार कोण करतं? पण कोणी विचार करत नसलं तरी युद्ध सुरु असलेल्या भागातील मुलांनाही खेळण्याची तीव्र इच्छा असते. या मुलांना खेळायला मिळायला हवं यासाठी संवेदनशील विचार करणाऱ्या युनिसेफ सारख्या जागतिक संघटना पुढाकार घेतात. प्रयत्न करुन युध्दग्रस्त भागातील मुलांसाठी खेळण्याच्या जागा तयार करतात.

मुलं कशी खेळतात?

  •  निर्वासित छावण्यांमध्ये एक साधी सतरंजी अंथरली जाते. मुलं एकत्रितरित्या बसतात आणि त्यांच्यासोबत अनेक बैठे खेळ घेतले जातात. या खेळातून त्यांचं मनोरंजन होतं. त्यांच्या मनावरचा युध्दाचा ताण गळून पडतो. शिवाय मनोरंजनासोबतच त्यांच्या मेंदूला चालना मिळेल असे खेळ मुलांसोबत घेतले जातात.
  • अशा प्रकारे युध्दग्रस्त भागात मुलांसाठी खेळ घेण्याची युनिसेफने  १९९९ मध्ये कोसोव्हो युध्दात सुरुवात केली होती. नंतर जिथे जिथे युध्दग्रस्त भाग आहे किंवा भूकंप, वादळं यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तेथील कुटुंब बेघर झालीत, निर्वासित म्हणून राहू लागली. त्या निर्वासित मुलांसाठी युनिसेफने खेळ घ्यायला सुरुवात केली.  युद्ध आणि आपत्तीग्रस्त भागात  मुलांसाठी खेळायला जागा तयार करणे हा युनिसेफच्या कामाचा महत्वाचा भाग झाला.
  •  सीरियाच्या लटाकिया या ग्रामीण भागातील ११ वर्षांच्या जानाला आणि तिच्यासारख्या अनेक मुलांना युनिसेफ जे खेळ घेते त्यातून स्वत:चा आनंद सापडू शकला.
  • सुदानमधील कसाला राज्यातील शागार्ब छावणीत राहणारी १२ वर्षांची सबरिन युनिसेफने आयोजित केलेल्या खेळण्याच्या कॅम्पमध्ये गेली. तेव्हा तिला तिच्यातली क्रिएटिव्हिटी वापरुन चित्र काढण्याची, ते रंगवण्याची संधी मिळाली. या गोष्टीमुळे सबरिन आणि तिच्यासारख्या तेथील अनेक मुलांच्या मनातली निराशा दूर झाली.

Image: warchild

  •  डॅरिला ही १२ वर्षांची युक्रेनमधली मुलगी. तिची आई आर्यना मुलांसाठी नृत्याचे वर्ग घेते. स्वत: डॅरिलाही तिथे नृत्य शिकते. नृत्य करते. यामुळे डॅरिलाचा मूड सुधारला. स्मरणशक्ती चांगली झाली. ती स्वत: चित्रं काढू लागली, कागदांच्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करु लागली.
  •  गाझामध्ये जिथे बाॅम्ब हल्ल्यांनी सर्व परिसर बेचिराख झाला आहे तिथेही मुलं विरंगुळ्यासाठी खेळतात. त्यांच्याकडे खेळण्याही नसतात. पण जे सापडेल त्या वस्तूंद्वारे ते खेळण्या तयार करतात.
  • ज्या ज्या देशांमध्ये युद्ध सुरु आहे तेथील मुलं या अवघड परिस्थितीतही खेळतात. खेळण्यातून आपला आनंद शोधतात. युद्धाच्या अवघड काळात आपलं जगणं आनंदी करतात.

खेळणं हा टाइमपास नाही. मुलांच्या आनंदासाठी, विकासासाठी खेळणं खूप महत्त्वाचं असतं. खेळण्यातून ताण , वेदना, दु:ख विसरले जातात.  'मुलांनो खेळा, खूप खेळा. तुमचा हक्क आहे खेळण्याचा. खेळत राहा' हेच या युध्दग्रस्त भागात खेळण्यात रमलेली मुलं, मुलांना खेळता यावं यासाठी प्रयत्न करणारी युनिसेफ सारखी संस्था सांगते आहे. खेळण्यासाठीच्या त्यांच्या हाका तुमच्यापर्यंत पोहोचता आहेत ना?

काय वाटलं वाचून ?  नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact