
Image: firstpost
परवाची गोष्ट. वीरला शाळेत जायचं असल्यानं आई नाश्ता आणि स्वयंपाकाच्या तयारीत गुंतलेली होती. वीरने उठल्यानंतर नेहमीप्रमाणे मोबाइल हातात घेतला. थोड्याच वेळात तो फोन घेवून आईजवळ आला आणि तिला पाण्यात तरंगणारी विमानं दाखवू लागला. उकाड्याने घामाघूम झालेल्या आईने 'आता हे कुठलं दृश्य ?' असा प्रश्न वीरला विचारला. दुबईमधलं. वीरने सांगितलं. 'जरा नीट वाच. विमानं बुडण्याइतकं पाणी वाळवंटातल्या दुबईत आलं कुठून? आई म्हणाली.
- 'अगं हे दुबईचंच व्हिज्युअल आहे. बातमीही आहे खाली. दुबईत काल एवढा पाऊस पडला की विमानतळावरील विमानं पाण्यात तरंगू लागली!' असं वीरने आईला सांगितलं. दुबईत एवढा पाऊस तोही एप्रिलमध्ये हा विचार मनात ठेवून आईने सकाळची कामं उरकली. आणि कामातून मोकळी झाल्यावर तिनेही मोबाइल हातात घेतला. दुबईतल्या पावसाची बातमी खरंच आहे का अफवा? हे बघायला तिने बातम्यांच्या वेबसाइटस शोधल्या. तर सगळीकडे दुबईतल्या प्रचंड पावसाच्या बातम्या, व्हिडिओ, फोटो होते. दुबईत एका दिवसात तिथे वर्षभरात पडणारा पाऊस पडून गेला होता.
हेही वाचा!
...पण दुबईत एवढा पाऊस पडलाच कसा?
दुबईत एवढा पाऊस पडला याला तेथील हवामान विभागाचे तज्ज्ञ मानवनिर्मित कारणांमुळे झालेल्या हवामान बदलाच्याचा परिणामास कारणीभूत ठरवतात. मानवनिर्मित परिस्थितीमुळे वातावरण खूपच गरम होत आहे. गरम वातावरण हवेतील आर्द्रता टाॅवेलने पाणी शोषून घ्यावं याप्रमाणे जास्त शोषून घेतं. आणि त्याच्या बदल्यात असा धो धो पाऊस पडतो.
दुबईमधील हवामानाची स्थिती अरेबियन द्वीपकल्पातून आणि ओमानच्या आखातातून जाणाऱ्या मोठ्या वादळी प्रणालीशी संबधित होती. वातावरणाच्या वरील भागातील कमी दाबाची प्रणाली आणि जमिनीवरील कमी दाबाच्या प्रणालीत हवेवरचा दाब वाढला. पिळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.याचं रुपांतर जोरदार वादळात झालं आणि दुबईत असा हाहाकार उडवणारा जोरदार पाऊस पडला.

Image: investing.com
हेही वाचा!
क्लाउड सीडिंग आणि दुबईतल्या पावसाचा काय संबंध?

Image: blogs.und.edu
क्लाउड सीडिंगमुळे दुबईत एवढा पाऊस पडला असं म्हटलं जातं. क्लाउड सीडिंग म्हणजे कृत्रिमपध्दतीने पाऊस पाडण्याचं तंत्र. दुबईत पाऊस कमी पडतो. पाण्याची गरज वाढत असताना पर्जन्यमान वाढवण्यासाठी, सरासरी एवढा पाऊस पाडण्यासाठी दुबईत क्लाउड सीडिंगचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. क्लाउड सीडिंग म्हणजे वातावरणात सुधारणा करण्याचं तंत्र आहे. जे ढगांची पाऊस किंवा बर्फ निर्माण करण्याची क्षमता वाढवतं. या तंत्राद्वारे छोटे बर्फ केंद्रक जे खरंतर नैसर्गिक रित्या तयार व्हायला हवेत ते कृत्रिमरित्या विमानांच्या सहाय्याने ढगात सोडले जातात. हे कण ढगांमध्ये बर्फाचे तुकडे तयार करण्यासाठी मदत करतात. असे नव्याने तयार झालेले बर्फाचे तुकडे वेगाने खाली पडतात. यालाच क्लाउड सीडिंगपध्दतीने पाऊस पाडणे असं म्हणतात.
पण दुबईमधील हवामान तज्ज्ञ सांगतात की दुबईत जेव्हा मोठं वादळ आलं तेव्हा ढगांवर क्लाउड सीडिंगची प्रक्रिया केलेली नव्हती.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact