पेपर लिहिताना फार खाडाखोड होते. खराब अक्षरामुळे मार्कं गेले तर!

Image: freepik

आपण लिहिलेला पेपर नीटनेटका हवा. अक्षर सुवाच्य हवं. कसातरी अजागळासारखा लिहिलेला पेपर बघून तुमच्या टीचरना तो उघडून वाचावा असंच वाटलं नाही तर तुम्ही उत्तरं कितीही अचूक लिहिली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच कमीतकमी खाडाखोड करुन, नेटक्या अक्षरात उत्तरं लिहिणं, सुबक आकृत्या काढणं, पेपरवर शाईचे डाग पडणार नाहीत याची काळजी घेणं हे सगळं महत्त्वाचं आहे.

नीटनेटका पेपर... काय करायचं?

  •   उत्तर लिहिताना प्रत्येक वाक्याचा मनातल्या मनात नीट विचार करुन ते लिहायचं. लिहून झाल्यावर विचार केला, हा शब्द इथे नको, तिथे हवा असं वाटलं की खाडाखोड होते, मग पेपर गचाळ दिसतो.
  •  खाडाखोड करायला लागणारच असेल तर तिथे रंगकाम केल्यासारखा प्रकार करायचा नाही तर त्या शब्दावर एखादी आडवी रेघ मारायची, शब्द पूर्ण दिसेनासा होईपर्यंत खोडत बसलं की ते दिसायला वाईट दिसतं.
  • काहीवेळा त्या भानगडीत उत्तर पत्रिकेचा कागदही फाटू शकतो. त्यामुळे खाडाखोड करायलाच लागणार असेल तर ती कशी करायची हेही लक्षात ठेवायचं.
    शांतपणे, नीट विचार करुन उत्तरं लिहिली की खाडाखोड कमी होते. पेपर पूर्ण करायची घाई म्हणून अजिबात विचार न करता उत्तरं लिहायला घेतली तरी खाडाखोड वाढतेच हे लक्षात ठेवायचं.

हेही वाचा!

डोक्यात कटकट अन पोटात धाकधूक ..परीक्षेचं टेन्शन का येतं?

Image: freepik

  •  नीटनेटकं एकसारखं अक्षर, दोन शब्दांमध्ये पुरेसं अंतर आटोपशीर काना-मात्रा-वेलांटी असेल तर आपला पेपर आपोआपच स्वच्छ दिसतो.
  • आपल्या पेपरमध्ये कमीतकमी खाडाखोड असेल तर याचा अर्थ आपण नीट अभ्यास केला आहे असाही होतो. उगाचच सारखी खाडाखोड दिसली की याचा अर्थ या विद्यार्थ्याने काहीही अभ्यास केला नाही, असाही परीक्षकांचा समज होतो. आपल्याबद्दल असा समज होऊ द्यायचा की नाही, याचा निर्णय तुमच्या हातात आहे.
  • फक्त चांगलं अक्षर आणि खाडाखोड टाळणं म्हणजे पेपर छान सोडवला असं नाही. नकाशे, चित्र, आकृत्या अशी जी जी माहिती पेपरमध्ये देणं आवश्यक आहे तीही नीटपणे भरलेली हवी. एखादी आकृती काढून उत्तर लिहायचं असेल तर ती आकृती प्रमाणबद्ध हवी. उगाचच बेढब आकृती काढली तर तुमचे मार्क कट होऊ शकतात. हे सगळं नीट लक्षात ठेवा आणि पेपर लिहिताना त्याचं भानही ठेवा.

 

 

काय वाटलं वाचून ?  नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact