
तुमच्या शाळेत कधी ‘सरप्राईज टेस्ट’ असते का? नियमित अभ्यास, होमवर्क सोडून फार वेगळी काही तयारी आपण केलेली नसते. ‘सरप्राईज टेस्ट’ होणार हेच माहिती नसतं, त्यामुळे तिचं ‘टेन्शन’ ही आपण घेतलेलं नसतं. त्यामुळेच बहुतेकवेळा त्यात आपल्याला मस्त मार्क मिळतात…
मग जी परीक्षा होणार आहे हे आपल्याला आधीच माहिती असतं आणि आपण कितीही टेन्शन घेतलं तरी परीक्षा काही कॅन्सल होणार नसते, उलट टेन्शन घेतल्यामुळे ती चांगली नाही उलट वाईट जाण्याचीच शक्यता असते, असं टेन्शन घ्यायचंच कशाला?
१. टेन्शन यायची दोन तीन मुख्य कारणं असतात. आपण वर्षभर नियमित अभ्यास मन लावून केलेला नसेल तर आपल्याला टेन्शन येतं. ‘तुझा पहिला नंबर यायलाच हवा’ असं आईबाबा सारखं सारखं म्हणत असतील तरी ‘पहिला नंबर नाही आला तर काय?’ असं टेन्शन येऊ शकतं. आपल्या अमुक मित्रापेक्षा जास्तच मार्क आपल्याला मिळायला हवेत अशी मनातल्या मनात ‘काँपीटीशन’ असेल तरी टेन्शन येणं शक्य आहे. ‘कमी मार्क पडले तर टीचर काय म्हणतील’ या विचारानेही टेन्शन येऊ शकतं… मग आता काय करायचं?
२. खरं तर या ‘जर तर’ मध्येच टेन्शन न येण्यासाठी काय करायचं याची उत्तरंही लपलेली आहेत. परीक्षा होणार आहे हे आपल्याला माहिती असतं… वर्षभर माहिती असतं. मग रोजचा अभ्यास चालढकल न करता वेळच्या वेळी मन लावून केला तर परीक्षेआधी येणारं टेन्शन गायब होईल ना?
हेही वाचा!
युध्द चालू असताना मुलं कशी खेळतात?
पण आता परीक्षा जवळ आली, त्यामुळे आत्ता काय करायचं ते बघुया
३. परीक्षेच्या अभ्यासासाठी बसायची जागा निवडा. टीव्हीसमोर सोफ्यावर बसून, बेडवर लोळत अभ्यास केला तर तो चांगला होणार नाही. घरातल्या एखाद्या कोपऱ्यात मांडी घालून नीट बसून, नेहमीच्या टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास करा. अभ्यासाला बसाल तिथे चांगला उजेड हवा. मोबाईल, टीव्ही असे अडथळे जवळपासही नकोत.
४. अभ्यास आणि परीक्षा या दोन्ही गोष्टींचा ताण घेऊन चालणार नाही. त्यामुळे कंटाळा येईल इतका अभ्यास करुन चालणार नाही. एक दीड तास अभ्यास केल्यावर थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा. अर्थात ब्रेक घेतल्यावर टीव्हीसमोर बसायचं नाही, मोबाईलमध्येही डोकं खुपसायचं नाही, तसं केलं तर केलेला सगळा अभ्यास वाया जाईल हे लक्षात ठेवायचं. त्याऐवजी तोंडावर पाणी मारुन फ्रेश व्हा, पाणी प्या, चहा प्या, थोडा खाऊ खा, बाहेर एखादी चक्कर मारा आणि ताजंतवानं होऊन पुन्हा अभ्यासाला बसा.
५. टेन्शन कमी करायचंय? मग दीर्घ श्वास घ्या… डोळे मिटा आणि नाकातून येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. बाहेरुन येणारे अनेक आवाज ऐका, त्यातल्या एखाद्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. टेन्शन गेलं की परत नव्या उत्साहाने अभ्यास सुरु करा.
६. अभ्यासाचं टाईमटेबल कसं करायचं हे सांगितलंच आहे तुम्हाला… तुमचं टाईमटेबल करा. त्यात तुम्हाला अवघड जाणाऱ्या विषयाला जास्त वेळ आणि सोप्या जाणाऱ्या विषयाला थोडा कमी वेळ द्या, अवघड विषयाचा नीट अभ्यास केला तरी निम्मं टेन्शन गायब होईल.
काय वाटलं वाचून ? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


