
परीक्षा आहे म्हणून तासनतास एका जागी बसून अभ्यास केला तर अभ्यास कमी झोपच जास्त येते! ही झोप पळवण्याचे उपाय आहेत!
परीक्षेचा अभ्यास करायचा असतो. पण अभ्यासाला बसलं की झोप यायला लागते. डुलक्या येतात, जांभया येतात. झोपून घ्यावंसं वाटतं. झोपलं तर आई बाबा रागावतात आणि अभ्यास झाला नाही तर .. ही भीतीही वाटते. अभ्यास असूनही झोप येते त्याच्यामागे विशिष्ट कारणं असतात. ही अभ्यास डिस्टर्ब करणारी झोप आपण पळवून लावू शकतो.
हेही वाचा!
डोक्यात कटकट अन पोटात धाकधूक ..परीक्षेचं टेन्शन का येतं?
- परीक्षा म्हणजे टेन्शन, ताण, एका जागी बसून खूप वेळ अभ्यास लक्षात ठेवण्याची धडपड सुरु असते. सारखा अभ्यास करुन ,लक्ष केंद्रित करुन थकवा आलेला असतो. अभ्यास करुन करुन बोअर झालेलं असतं. या सगळ्या कारणांमुळे झोप येते. रात्री पुरेशी आठ तासांची झोप झालेली असली तरीही अभ्यास करताना झोप यायला लागते.
- एकाजागी तासनतास बसून अभ्यास न करता मधे मधे छोटे ब्रेक घ्यावे. या ब्रेकमधे स्ट्रेचिंग करावं, उड्या माराव्यात. चालावं. घरी भावंडांसोबत खेळावं. परीक्षा असली तरी अभ्यास एके अभ्यास न करता थोडा वेळ मैदानी खेळही खेळावे. मधे ब्रेक घेतल्याने, खेळल्यामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. मेंदूला ऑक्सिजन मिळतं. यामुळे शरीर आणि मन ताजतवानं होतं. आणि पुन्हा अभ्यासाला बसलं की छान वाटतं.
- जिथे अभ्यासाला बसता ती जागा हवेशीर हवी. तिथे पुरेसा सूर्यप्रकाश किंवा लाइटचा उजेड हवा. पुरेसा प्रकाश असला की आपल्या मेंदूला जागं राहण्याचे, काम करण्याचे सिग्नल मिळतात. तसेच सोफ्यावर, गादीवर लोळून अभ्यास न करता टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करावा.

- परीक्षेच्या काळात पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी प्यायलं नाही तर थकवा येतो. लक्ष केंद्रित होत नाही. अभ्यास करताना मधे मधे उठून पाणी प्यावं. किंवा मग जवळ पाण्याची बाटली घेऊन बसावं. पाणी पुरेसं प्यायल्याने मेंदूला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.
- अभ्यास करताना मधे मधे गोड, मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने लगेच एनर्जी मिळते. पण लगेच एनर्जी कमीही होते. थकल्यासारखं होतं. असे पदार्थ खाऊन मग झोप येते. म्हणून अभ्यास करताना मधे मधे फळं, सुकामेवा, तृणधान्याचे पदार्थ खावेत. या पदार्थांमुळे अभ्यास करण्याची ऊर्जा वाढते.
- अनेकदा मनातल्या मनात वाचून कंटाळा येतो. झोप येते. असं झालं की थोडं मोठ्यानं वाचावं. आपण आपल्याला एखादा मुद्दा समजून सांगावा किंवा आत्तापर्यंत जे वाचलं त्याच्या नोटस काढाव्यात. थोडं लिहिण्याचं काम करावं. यामुळेही झोप पळून जाते.
- दुसऱ्या दिवशी कोणताही पेपर असू दे झोप पूर्णच व्हायला हवी याकडे लक्ष द्यावं. ७ ते ८ तास पूर्ण झोप घ्यावी. झोप पूर्ण न झाल्यास अभ्यासाच्या वेळेस झोप येते. पूर्ण झोप झालेली असल्यास अभ्यास छान होतो.
- परीक्षेचा ताण घेऊ नये की परीक्षेची भीती बाळगू नये. या दोन्ही गोष्टींमुळे आपला मेंदू थकतो. ताण किंवा भीती वाटल्यास ध्यानधारणा करावी. दीर्घ श्वसन करावं. आपल्याला हे जमेल, आपण हे करु शकतो असं स्वत:च स्वत:ला सांगावं. यामुळेही अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते आणि झोप येत नाही.
काय वाटलं वाचून ? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


