डाॅ. श्रुती पानसे

‘एके दिवशी मी अभ्यास करायचं ठरवलं. सगळ्या विषयांची पुस्तकं समोर ठेवली. कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे ठरवायला लागल्यावर लक्षात आलं की अवघड विषयांची पुस्तकं बाजूला पडतात. मात्र असं होऊ नये म्हणून आपल्याला सोपे विषय कोणते आणि अवघड विषय कोणते हे कसं ठरवलं जातं हे लक्षात घेऊया.
जे विषय पटकन समजत नाहीत, ते अवघड. जे विषय समजण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागते ते मागे ठेवले जातात. आणि या कारणांमुळे अजून अजून अवघड होत जातात. विषय तसे अवघड नसतात, आपल्या वयाला समजतील, झेपतील असेच असतात. काही विषयांना कमी मेहनत घेतली तरी पुरते आणि काहींना जास्त मेहनत लागते. इतकाच फरक आहे.
आपल्या वर्गातल्या मुलांची आवड आणि नावड समजली तरी लक्षात येईल की प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगळे आहेत. काहींना भाषा विषय अवघड वाटतात तर काहीचं गणिताशी वाकडं असतं.
हेही वाचा!
https://urjaa.online/how-to-make-a-workable-study-timetable-for-exam-period/
१. भाषा - भाषा विषय अवघड वाटणाऱ्यांनी नेहमीपेक्षा जास्त वेळा पाठ्यपुस्तकातले धडे वाचले, थोडं अवांतर वाचन केलं, धड्याखालचे प्रश्न सोडवून झाल्यावर स्वत: प्रश्न काढले, निबंध वाचले, मनाने निबंध लिहिले तर हा विषय आवडायला लागेल.
२. गणित - गणित अवघड जातं असं वाटणाऱ्यांनी रोज ठरवून पाच गणितं जास्त सोडवली तर सात दिवसात त्यांची 35 गणितं जास्त सोडवून होतील. आपोआप सराव होईल आणि अवघड विषय सोपा वाटायला लागेल.
३. इतिहास – इतिहास आवडत नसेल तर त्यातल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. त्यातली माणसं काय करतात हे बघावं म्हणजे गोष्टी सहज लक्षात राहतात. मुद्दाम लक्षात ठेवायची गरज राहत नाही.
४. विज्ञान – मनात कुतूहल असेल तर विज्ञान हा विषय लवकर समजतो. याशिवाय विज्ञानात प्रयोग असतात. प्रत्येक प्रयोग म्हणजे एक छानशी गोष्ट असते. ती गोष्ट लक्षात घ्यावी. मुख्य म्हणजे जमतील तसे स्वत: प्रयोग करून बघावेत. पुस्तकात लिहिलेले प्रयोग स्वत: केले, करून बघितले की त्यातली गोडी वाढते.
५. भूगोल – खरं भूगोल हा अतिशय जिवंत विषय आहे. आसपास नजर टाकली तरी भूगोलातल्या अनेक गोष्टी सापडतात. त्या समजून घेतल्या आणि शोधायला लागलो तर भूगोलातला रस वाढतो. बाहेरच्या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात सापडल्या की विषय तितकासा अवघड राहणार नाही.
(लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
ishruti2@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


