परीक्षा म्हटली की घाम फुटतो. परीक्षेची एवढी भीती का वाटते?

– डॉ. वैशाली देशमुख

image:.freepik

समजा, शाळा सुटता सुटता तुम्हाला कळलं की उद्या परीक्षा असणार आहे. हे कळल्यावर तुम्ही आनंदानं उड्या मारत सुटता का? छे! उलट शाळा सुटण्याचा सगळा आनंद कुठच्या कुठे जातो. वरवर, उसनं अवसान आणून तुम्ही घरी जाताना गप्पा मारता, मित्र-मैत्रिणींशी खेळता; पण त्या सगळ्यापाठीमागे एक मोठ्ठा काळा ढग दिसत असतो. आता अभ्यासाला लागायला लागणार! बराच वेळ चालढकल करून तुम्ही एकदाचे अभ्यासाला बसता. पुस्तक उघडलं की अक्षरं एकमेकांमध्ये मिसळून जायला लागतात. आधी कितीतरी वेळा ऐकलेले, वाचलेले शब्द पहिल्यांदाच वाचतोय की काय इतके अनोळखी वाटायला लागतात.

प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस उजाडतो. सकाळी उठूच नये, आज शाळेला दांडी मारावी असे विचार मनात यायला लागतात. पण असं काही करता येणार नाहीये हे माहिती असतं, मग कसेबसे तयार होऊन तुम्ही शाळेला जाता.

हेही वाचा!

पेपर सुरू होतो. पोटात कसंतरी व्हायला लागतं, हातापायांना घाम सुटतो, छातीत धडधडायला लागतं. आपल्याला परीक्षेत काहीच येणार नाही, आपण न वाचलेल्यातलंच विचारणार याविषयी तुमची पक्की खात्री होते. घोकून पाठ केलेल्या व्याख्या, फॉर्म्युले, तारखा; काही म्हणता काही आठवेनासं होतं.

जेव्हा संकट येतं तेव्हा शरीरात काय होतं?

आपल्यातल्या प्रत्येकानं यातलं काही ना काही अनुभवलं असेल, थोडं कमी किंवा थोडं जास्ती. हे सगळं का होतं माहितेय? आपल्या पुरातन, आदिमानवी मेंदूमुळे. तसं पाहायला गेलं तर मेंदूचा हा भाग आपल्याला संकटांपासून वाचवतो. समोर धोका आला की आपल्या शरीरात ॲड्रिनॅलिनसारखी रसायनं पाझरायला लागतात. शत्रूशी दोन हात करायला किंवा प्रसंगी पळून जाऊन बचाव करायला आपलं शरीर सज्ज होतं. हृदय जोरजोरात धडधडून रक्तप्रवाह वाढवतं. भरभर श्वास घेऊन ऑक्सिजनची पातळी वाढते.

तुम्ही म्हणाल, की परीक्षेच्या वेळी का होतं मग असं? कारण आपण परीक्षेकडे एक संकट, धोका म्हणून पाहायला शिकलोय. त्यामुळे परीक्षा हा शब्द जरी म्हटला तरी  मेंदू लगेच जागा होतो आणि आपल्याला तो सगळा त्रास व्हायला लागतो.

आता तुमच्या लक्षात आलंच असेल परीक्षेचं टेन्शन का येतं ते! अर्थात काहीच टेन्शन घ्यायचं नाही असं मात्र नव्हे हं. उलट थोडं टेन्शन आपल्याला मदत करतं, फक्त अति झालं की त्रासदायक ठरतं.

मग आता काय कराल परीक्षा आली की? शांतपणे तिला सामोरं जायचं. जास्तीत जास्त जमेल तितका मनापासून अभ्यास करायचा. खोल श्वास घेऊन स्वत:ला शांत ठेवायचं. आणि ‘आपल्याला जमेल, आठवेल’ असं स्वत:ला सांगत राहायचं. मुख्य म्हणजे परीक्षेला संकट समजायचं नाही.

(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)

vrdesh06@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact