तुम्ही पाठांतर करता की घोकंपट्टी? दोघांमध्ये काय फरक आहे?

- डॉ. श्रुती पानसे

                                                                                                             पाठांतर नेमकं कसं करायचं? आणि कशाचं करायचं? - स्वराली अभ्यंकर, पुणे

image : clipartstation

परीक्षा अगदी जवळ आली आहे. पण काही केल्या सगळं पाठ होत नाही असं होतंय का तुमचं? अभ्यासातील एखादी गोष्ट न समजता पाठ केली तर विसरायचा धोका असतो; पण जे नीट समजलेलं  आहे ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही, याचा अनुभव आहे का तुम्हाला? बघा बरं. तुम्ही काही अख्खी पुस्तकच्या पुस्तकं पाठ करत नाही. तरीही राहतंच ना लक्षात? कारण तो भाग पूर्णपणे समजलेला असतो.

पाठ्यपुस्तकातील सगळ्या गोष्टी पाठ करायच्या नसतात; उदा. निबंध, गणितं, प्रश्नांची जशीच्या तशी उत्तरं वगैरे. हे आपण कालच्या भागात बघितलं. कधी कधी सूत्र, व्याख्या, लेखक-कवीचं नाव आणि धड्याचं नाव यांच्या जोड्या, रासायनिक सूत्र अशा काही गोष्टी पाठ असाव्या लागतात; पण तरीही अर्थ समजला नसेल तर आणि अर्थ समजेपर्यंत पाठ करायला जाऊच नये; कारण त्याचा अर्थ कळला तरच आपण ते अभ्यासात, पेपरमध्ये वापरू शकतो.

त्यामुळे अर्थ समजण्यासाठी ते पुन:पुन्हा वाचणं, सोडवणं, काही गोष्टी लिहिणं,यातून आपोआप लक्षात राहतं. वेगळं पाठ करण्याची गरज पडत नाही. असा अभ्यास जास्त चांगला आहे.

१. गणिताची सूत्रं तर अभ्यास करून करूनच लक्षात ठेवावीत. त्यासाठी वेगळा कुठलाही मार्ग पत्करू नका.

२. क्षेत्रफळ, परिमितीसारखी सूत्रे लक्षात राहण्यासाठी त्या त्या आकाराचे कागद कापावेत.  मनानेच लांबी झ्र रुंदी झ्र ऊंची झ्र परीघ झ्र त्रिज्या वगैरे मापं ठरवावीत. योग्य भाग रंगवावेत.  एकदा-दोनदा वेगवेगळी मापं घेऊन केलं तरी काहीही पाठ करण्याची गरज पडणार नाही. अभ्यास होऊन जाईल. एवढंच नाही तर केलेलं नीट लक्षात राहील. कधीही विसरणार नाही.

हेही वाचा!

परीक्षा आहे तर टीव्ही बंद, पण का?

३. लेखक-कवी आणि धड्याचं नाव यासाठी धडा वाचताना प्रत्येक वेळी लेखकाचं नाव ही वाचा. धड्याच्या नावावरून लेखकांचं नाव आठवा. लेखकाच्या नावावरून धड्याचं नाव आठवा, असा खेळ स्वत:च खेळा. आपोआप लक्षात राहील.

४. कोणत्याही विषयाच्या व्याख्या अभ्यासायच्या असतात. या व्याख्या पटकन समजू शकतील अशा असतील तर त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत; पण लांबीने मोठ्या असतील, गुंतागुंतीचा अर्थ असेल तर त्या मोठ्या व्याख्येचे आपल्या सोयीनुसार योग्य भाग पाडा.

अनेकदा अशा व्याख्येत अनेक संकल्पना एकत्र केलेल्या असतात. प्रत्येक भाग नीट समजून घ्या. हवं तर प्रत्येक भागाला १), २), ३) असे आकडे घाला. क्रमाने एक-एक करून समजावून घेताना पाठ होईलच. प्रत्येक भागाचा अर्थ समजला तर जास्तच सोपं.

५.  रासायनिक सूत्रं एकदम परीक्षेच्या आधी पाठ करायला जाऊ नका. रोज पाच पाच सूत्रं वाचा आणि लिहा. आज पाच सूत्रं लक्षात राहिली की, दुसऱ्या दिवशी पुढची पाच करायला घ्या.

त्यावेळी आदल्या दिवशीची पाच आठवा. लक्षात आहेत का ते तपासा. मगच पुढची पाच करा. असं रोज केलं तर काही दिवसांत सर्व सूत्रं आठवतील. आदल्या दिवशीचं एखादं सूत्र आठवलं नाही तर पुन्हा वाचा, पुन्हा लिहा. त्याचबरोबर ते सर्व प्रयोगही वाचा.

या पद्धतीने अभ्यास करायची सवय नसेल तर हळूहळू सुरुवात करा. या सर्व पद्धती सोप्या आहेत.

नक्की जमतील, अशाच आहेत.

(संचालक, अक्रोड)

ishruti2@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact