- डॉ. श्रुती पानसे

Image: additudemag
आज सर काही वेगळ्याच मूडमध्ये होते. ते आले तेव्हापासून त्यांचा शिकवण्याचा मूडच नव्हता. ते आज आमच्याशी चक्क गप्पा मारत होते. वर्गात आले तेव्हा सगळ्यांनी पटापटा त्यांच्या विषयाची म्हणजे इतिहासाची पुस्तकं आणि वह्या बाकावर काढल्या. तर ते म्हणाले, आज आपल्याला पुस्तकं नकोत, वह्या नकोत. पेन नको. काही नको. बाकं मोकळी करा. मला आज फक्त तुमची डोकी हवी आहेत.
' तुम्ही अभ्यास कसा करता ते मला सांगा.'
एकेकाकडे जाऊन त्यांनी या प्रश्नाचं उत्तर आम्हाला विचारलं. उत्तरं साधारणपणे अशी होती..
१ . ' पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवतो.' 'प्रश्नांची उत्तरं पुन्हा पुन्हा लिहितो.'
२'. उत्तरं पाठ करते.'
३. 'एका वहीतलं दुसऱ्या वहीत उतरवून काढते,'
४. 'दर रविवारी क्लासचे सर परीक्षा घेतात. त्याचा अभ्यास करतो. त्यांनी दिलेली प्रश्नोत्तरं पाठ करतो.'
हेही वाचा!
सगळ्यांचं ऐकून झाल्यावर सर म्हणाले, 'यात तुम्हाला काय आव्हान वाटतं?'
आम्ही सगळे म्हणालो, काही नाही. उलट या सगळ्याचा खूप कंटाळा येतो. म्हणून अभ्यास करावासा वाटतंच नाही.
मग सरांनी आम्हाला समजावून सांगितलं. ' अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं. तेव्हा तुम्हाला विषयाची उत्सुकता वाटते का?'
आम्ही म्हणालो, 'कधी कधी.'
ते म्हणाले, 'खरं आव्हान यातच आहे. समजून घेण्यात.
नवा विषय समजून घेताना आपण मेंदूतल्या सगळ्या पेशींना कामाला लावत असतो. ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं, समजून घेणं यासाठी; पण आपण तेच पुन्हा पुन्हा करतो तेव्हा त्यातून नवीन फारसं काही घडून येत नाही.'

Image : freepik

Image: stock.adobe
' पण सर परीक्षेत तर तेच हवं असतं ना..'
' अगदी बरोबर. परीक्षेसाठी ते तुम्हाला करावंच लागेल. त्यातून अभ्यास पक्का होईल; पण तेवढंच करणं हे कंटाळ्याचं काम आहे. त्यापेक्षा अभ्यास हा आव्हानांशी; वेगवेगळ्या उपक्रमांशी जोडा.
तुम्ही लहान होतात तेव्हा 'सांगितलं गेलं' तसा अभ्यास तुम्ही करत गेलात. आता तुम्ही मोठे झाला आहात. स्वत:च्या आनंदासाठी अभ्यास करा.
आपल्या अभ्यासाच्या ॲक्टिव्हिटी स्वत:च शोधून काढा. कधी एकट्याने, कधी दोघा-तिघांनी मिळून शोधून काढा. या ॲक्टिव्हिटी जेवढ्या अवघड तेवढा तुम्हाला आनंद जास्त मिळेल.'
'हे कसं शक्य आहे? जेवढं अवघड तेवढं छान असं कसं ?'
'करून बघितलं की कळेल.' सर म्हणाले, ' असं करूया की वर्ग, वह्या, पाठ्यपुस्तकं, तऱ्हेतऱ्हेच्या व्यवसायमाला, शिक्षक, फळा, गृहपाठ, पाठांतर, ट्यूशन्स याच्या बाहेर अभ्यास असतो, तो शोधूया. गणिताचा संबंध कुठे कुठे आहे? शोधा आणि मला सांगा. विज्ञानाचा, भाषेचा संबंध कुठे आहे, त्यांची यादी करा. मला द्या. आपण ती वर्गात वाचू. त्यावर चर्चा करू. असं प्रत्येक विषयातलं शोधून काढू.
अवघड ते छान कसं हे सरांनी नीट समजून सांगितल्यावर आम्हाला कळलं. त्यानंतर सरांनी आम्हाला विचारलं,हे आव्हान स्वीकारायला आहात का तयार ?'
आम्हालाही अवघड छान कसं असतं , हे अनुभवून बघायचं होतं, आम्ही सरांना लगेच म्हणालो, 'हो चालेल.'
प्रत्येकात उत्साह सळसळत होता. हेच तर सरांना हवं होतं.
(लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)
ishruti2@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact