मोठ्यांचं लहान्यांनी नेहमीच ऐकायचं, मग लहान्यांचं मोठे ऐकणार की नाही?

 Image: freepik

जेव्हा केव्हा आईच्या मैत्रिणी घरी येतात तेव्हा ती चहा किंवा काॅफी करणार म्हणजे करणारच. मग त्या दोघी गप्पा मारत चहा पिणार मग मधेच कधीतरी आई मावशीला काहीतरी दाखवायला उठणार मग त्या मावशीला हुक्की येणार, आणि ती घाईघाईने कप उचलून स्वैपाकघरात नेणार तेवढ्यात आई येणार मग ती ते कप

घेण्याचा प्रयत्न करणार. मग दोघीजणी,

'अगं कशाला?'

'राहू दे!'

'मी उचलते ना..'

'चालतं गं एवढं काय त्यात?'

असल्या वाक्यांची फेकाफेक करणार. कोणीतरी जिंकणार आणि कप आत घेऊन जाणार. मी अगदी गपचूप कोपऱ्यात बसून मोबाईलवर यूट्यूब बघत नाहीतर गेम खेळत बसलेले असणार मग माझा काय संबंध त्या कपाशी किंवा चहाशी? पण तसं नसतं…ती मावशी गेली रे गेली की आईसाहेब आधी काय करणार तर माझ्या अंगावर ओरडणार.

'एवढंही समजत नाही का गं तुला? बाहेरचं माणूस आपल्या घरात कप उचलून ठेवतंय. बरं वाटतं का?'

माझ्या मनात येतं, की 'पण ती मावशीच म्हटली होती की; चालतं गं, एवढं काय त्यात?' पण हे उत्तर आईला थोडीच देता येतं? त्यामुळे आपण काहीच म्हटलं नाही तर तीच पुढे म्हणते, 'अगं पटकन पुढे व्हावं. कप घ्यावेत. मी करते म्हणावं.'

'अगं आई पण मावशीने मला सांगितलं नाही, नाहीतर मी केलं असतं.'

चूक! चूक! चूक! एकदम चुकीचं उत्तर! त्याचा रिझल्ट लग्गेच मिळतोच

 हेही वाचा!

'सांगायला कशाला पाहिजे गं प्रत्येक गोष्ट? लहान आहेस का तू आता? मी तुझ्या वयाची होते तेव्हा आईकडे कोणी आलं तर न सांगता चहा करुन द्यायचे. कपबशा विसळून ठेव हे आम्हाला कधी सांगावं लागलं नाही कोणाला. म्हणे सांगितलं नाही. तुम्हा आजकालच्या मुलांना ना, कसली शिस्त म्हणून नाही. कोणाचा धाक नाही. खुशाल उलट उत्तरं देता. आमच्या वेळी…' ‘आमच्या वेळी’ नंतर काय काय होतं ते मी सांगायची काही गरजच नाही.

'काहीपण सांगते बरं का ही आई. म्हणे कोणी न सांगता चहा करायची. काहीप्पण! आणि समजा म्हणजे नुसतं समजा हं, आई आणि तिची मैत्रिण आमच्या अभयासावर बोलत असतील. त्या तसंही तेवढंच बोलतात. तर, त्या बोलत असतांना मी जर का असं म्हटलं, की, 'आमच्या टीचरना काही कळत नाही. नुसत्या बोअर करतात क्लासमधे.' तर? 'तुला कोणी विचारलंय का? किती वेळा सांगितलंय, दोन मोठी माणसं बोलत असतांना लहान मुलांनी मधे बोलू नये. आगाऊ झाली आहे कार्टी!'

बरं हे वाक्य बोलून दहा मिनिट व्हायच्या आत पुन्हा 'एवढं समजत नाही? लहान आहेस का?' हे वाक्य येणारच.

 हेही वाचा!

प्राॅब्लेम तरी काय आहे आईचा? कप उचलायला मी मोठी, मधे बोलायच्या वेळी लहान, अभ्यास करायला मोठी, शाॅपिंग करायला लहान. हिचंच ठरत नाही आणि माझ्यावर ओरडत असते एकसारखी. मला काय वाटतं ते कोणी विचारतच नाही. एकदा ठरवून टाका ना की, दहावीपर्यंतची मुलं लहान असतात आणि काॅलेजमधे ती मोठी होतात किंवा नववीत मोठी होतात किंवा असं काहीही जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते. पण प्लीज ते एकदाच काय ते ठरवा. तुमच्या सोयीने हवं तसं दहा वेळा बदलू नका.

मी काही असं म्हणत नाही की दर वेळी माझंच ऐका. कारण मी असं म्हटलं तरी माझं कोणी रोज रोज ऐकणार आहे थोडीच?? पण मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्याल की नाही? आपला अभ्यास करायचा, कुठल्या कॉम्पिटिशनमधे नाव द्यायचं, क्लासहून किंवा शाळेतून यायला उशीर झाला तर फोन करायचा. या गोष्टी मला माहिती असतात. त्याच त्याच कशाला सांगता परत परत? आणि मी तुमचं सगळं ऐकून घ्यायचं, आणि मी काय सांगते ते ऐकायला तुम्हाला वेळच नसणार. ही तर चांगलीच चीटिंग आहे. त्यामुळे मी जर तुमचं ऐकायला हवं असेल तर तुम्हीही माझं ऐकत जा!'

Image:.freepik

'बरोब्बर आईसारखं जमलं ना लेक्चर???'

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact 

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact