
Image: freepik
“पण माझ्या वर्गातली बरीच मुलं आहेत इंस्टावर. मग मीच का नाही?” बारा वर्षांची आरोही चिडून आईला विचारत होती.
“कारण तू अजून लहान आहेस.”
“मी अजिबात लहान नाहीये. तूच म्हणतेस ना सारखी की ‘आता तू मोठी झाली आहेस’ म्हणून?”
“अगं, तू काही बाबतीत मोठी झाली आहेस आणि काही बाबतीत अजून लहान आहेस.”
“असं कसं? म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा मी मोठी आणि नाही तेव्हा मी लहान का? ही चीटिंग आहे. मी पण अकाऊंट उघडणार आहे इंस्टावर.”
“पण तू उघडशील कसं? तिथे १३ वर्षांच्या खाली अकाऊंट उघडताच येत नाही.”
“हा! हा! माझ्या वर्गातल्या इतर मुलांनी उघडलंय तसंच!” आरोही डोळे मिचकावत म्हणाली.
“म्हणजे कसं?”
“खोटी जन्मतारीख टाकून.”
हेही वाचा!
“म्हणजे चक्क खोटं बोलून? नियम मोडून?” आईने खूप आश्चर्य आवाजात आणत विचारलं. “मग ही चीटिंग नाहीये का?”
“नाही! … म्हणजे आहे थोडीशी… पण आम्ही तरी दुसरं काय करणार? आम्हाला तरी काय ऑप्शन आहे सांग?” आरोही जरा दुखावून म्हणाली. “सगळे नियम असे करून ठेवलेले असतात की आम्हाला ते मोडल्याशिवाय मनासारखं काही करताच येत नाही.”
“अच्छा…” आई काहीतरी विचार करत म्हणाली, “पण मी काय म्हणते? असे नियम का केले असतील असं वाटतं तुला?”
“का म्हणजे?”
“म्हणजे असं, की १३ वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडियावर का अलाऊड नसेल असं वाटतं तुला?”
“मला काय माहिती?” आरोही खांदे उडवून म्हणाली.
आता आईच्या लक्षात आलं, की आरोहीला कसं सांगितलं की लक्षात येईल. ती म्हणाली,
“बरं ते जाऊ दे. मला एक सांग, तू एकटी कुठे कुठे जातेस?”
“अं? त्याचा काय संबंध आई?”
“सांग तर खरं. मग सांगते संबंध काय ते. तू एकटी कुठे कुठे जातेस?”
“अं… कॉलनीत मैत्रिणींशी खेळायला… कॉलनीत ड्रॉईंग क्लासला…”
“आणि?”
“शाळेत पण मी एकटीच जाते ना बसमध्ये बसल्यावर. तिथे तरी तुम्ही कुठे बरोबर असता?”
“बरोबर. अजून कुठे एकटी जातेस का?”
“नाही.” आरोही विचार करत म्हणाली.
“आता बघ हां, या सगळ्या ठिकाणी तू एकटी जातेस, पण तिथे सगळे लोक अनोळखी असतात का?”
“हॅट! सगळे ओळखीचे असतात माझ्या.”
“बरोबर ना? मग आता मला सांग, की जिथे सगळी मोठी माणसं आहेत, तीसुद्धा सगळी अनोळखी आहेत अशा ठिकाणी तू कधी एकटी गेली आहेस का?”
“नाही.”
“अशा एखाद्या ठिकाणी तू एकटी जाशील का? की जिथे सगळी अनोळखी मोठी माणसं आहेत. जी तुझ्या आईवडिलांच्याही ओळखीची नाहीत. आणि त्यातले काही जण त्यांचं नावसुद्धा खोटं सांगतात, इतर लोकांना फसवतात… अशा ठिकाणी तू एकटी, अगदी आईवडिलांशिवाय जाशील का?”
“हॅट! काहीही काय?”
“अजिबात ओळखीच्या नसलेल्या लोकांना तू तुझे फोटो, तुझ्याबद्दलची माहिती सांगशील का?”
“आई तू काहीही काय विचारतेस? असं कोणी करतं का?”
“का बरं नाही करत?”
“कारण असं करणं सेफ नाहीये. लहान मुलांना कोणी फसवू शकतं.”
“हो ना? मग इंस्टाग्राम सारख्या कुठल्याही सोशल मीडियावर पण हेच असतं बाळा. तुझं अकाऊंट म्हणजे तू एकटी तिथे जाणार. तिथे अनोळखी लोक तुझ्याशी बोलायला येणार. आणि अजून तुला त्यातले चांगले वाईट लोक ओळखू येत नाहीत. खरं म्हणजे तुझ्या वयाच्या कुठल्याच मुलांना ते समजत नाही.”

Image: .freepik
“ओह!” आरोही विचार करत म्हणाली, “म्हणून लहान मुलांना इन्स्टा वर अलाऊड नसतं का?”
“हो.”
“मग जाऊदे.” आरोही समजूतदारपणे म्हणाली.
”शाब्बास!” आई म्हणाली, “तुझं जेव्हा वय नियमात बसेल तेव्हा मीच तुला अकाऊंट उघडून देईन.”
“डन!” असं म्हणून आरोही दुसरं काहीतरी खेळायला गेली. तिला आईचं म्हणणं नीट समजलंही होतं, आणि पटलंही होतं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact