-डॉ. योगिता आपटे

सोशल मीडियावरचे मित्र मैत्रिणी काही खरे नसतात असं सगळी मोठी माणसं म्हणतात. पण मला ते पटत नाही. तर ते बरोबर आहे का?
सोशल मीडियावरचे मित्र मैत्रिणी खरे नसतात हे आईवडिलांचं म्हणणं काही अर्थी बरोबर आहे आणि काही अर्थी थोडंसं चूकही आहे. म्हणजे असं, की सोशल मीडियावर येणारे लोक आपल्याच आजूबाजूच्या समाजातले असतात. त्यामुळे सोशल मीडियावरचे लोक किंवा मित्र मैत्रिणी खरे नसतात हे म्हणणं काही बरोबर नाही. पण आपण प्रत्यक्षात भेटणाऱ्या लोकांमधून चांगले आणि वाईट किंवा खरं आणि खोटं वागणारे लोक सहज ओळखू शकतो, तसं सोशल मीडियावर होत नाही. कारण सोशल मीडियावर बहुतेक वेळा बहुतेक लोक पूर्ण खरं बोलत नाहीत. फक्त चांगलं असेल ते सोशल मीडियावर टाकणं ही असंच सगळे करतात. आणि खरं म्हणजे आपणही करतो.
आपण कुठे तरी ट्रेकला गेलो तर तिथले फोटो टाकतो, कशी मजा केली ते टाकतो, तिथे आपण घसरुन पडलो ते काही आपण लिहीत नाही. साधे स्वतःचे फोटोसुद्धा आपण फिल्टर टाकल्याशिवाय इन्स्टावर टाकत नाही. पण बाकीचेही तसं करत असतील हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग होतं काय?
हेही वाचा!
सोशल मीडियामुळे सोशल स्किल्स कशी कमी होतील?
तर आपल्या ऑनलाईन मित्रमैत्रिणींचे फोटो बघून आपल्याला असं वाटतं की ते सगळे किती मजा करतायत आणि आपणच काही करत नाही. किंवा त्यांनी किती शॉपिंग केली आहे आणि आपल्याकडे चांगले कपडे नाहीत. आणि मग हळूहळू इतर लोक काय करतायत, कुठे जातायत हे बघणं आपल्यासाठी महत्वाचं होऊन बसतं. त्यातून फिअर ऑफ मिसिंग आऊट असा एक नवीनच प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येतो.

बरं म्हणायला हे सगळे आपले मित्र असतात. पण आपल्याला जेव्हा खरोखर काही तरी शेअर करायचं असतं तेव्हा आपण या सगळ्यांशी बोलू शकत नाही. कारण एकमेकांना wow आणि लाईक्स देण्यापलिकडे आपली मैत्रीच झालेली नसते. अर्थात या ऑनलाईन ओळखीपैकी कोणाशी आपली खरी छान मैत्री होऊ शकते. पण त्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष भेटणं आणि एकमेकांबरोबर खूप वेळ घालवणं हे आवश्यक असतं.
कारण खरे मित्र मैत्रिणी काही आपल्याला प्रत्येक वेळी वा छान असं म्हणत नाहीत. जिथे आपलं चुकतं तिथे स्पष्ट तोंडावर सांगतात. आपल्याला चुका सुधारायला मदत करतात. आपण आपल्या मनातील कुठलाही विचार त्यांच्याशी बोलू शकतो. आणि तेही त्यांच्या आयुष्यातले प्रोब्लेम्स आपल्याशी शेअर करतात. म्हणूनच सोशल मीडियावर मित्र मैत्रिणी असायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष भेटणाऱ्या खऱ्या मित्रांची जागा ऑनलाईन मित्र घेऊ शकत नाहीत.
पण मग स्क्रीन वापरण्याचे इतके तोटे आहेत तर मोबाईल अजिबात वापरायचाच नाही का? तर तसं नाही. ते शक्यही नाही आणि योग्यही नाही. मात्र स्क्रीन वापरतांना तो जबाबदारीने वापरायचा.
(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)


