आपल्या पृथ्वीला ताप आलाय? तो कसा आणि कोणामुळे?

-विनय र. र.
मराठी विज्ञान प्रसारक

Image: freepik

कल्पना करा, तुमचा घराच्या एका खोलीची एक मोठी खिडकी काचेची आहे. ती उघडी ठेवली की तिच्यातून सूर्याचे ऊन आत येते आणि खोली गरम होते. खोलीतील तापलेली हवा आणि गर्मी बाहेरही जाऊ शकते. पण जर तुम्ही खिडकीची काचेची तावदाने बंद केलीत तर? तर ऊन आत येईल पण आतली गर्मी बाहेर जाऊ शकणार नाही, आणि खोली आणखी गरम होत राहील. आपल्या पृथ्वीचंही असंच काहीसं चाललंय! पृथ्वी तापत चालली आहे. तापमानवाढ होत आहे.

तापमानवाढ म्हणजे काय?

पृथ्वीचं सरासरी तापमान हळूहळू वाढतंय. याला जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वाॅर्मिंग म्हणतात. पृथ्वीला थोडी गरमी हवीच असते, कारण तिच्यामुळेच आपण जगतो. जर पृथ्वी खूप थंड झाली असती, तर सगळे समुद्र गोठले असते आणि प्राणी-वनस्पतींचा जन्मच झाला नसता. पण आता पृथ्वी खूप जास्त गरम होत चाललीय.

 

हेही वाचा!

पृथ्वीचं तापमान वाढल्याने कोणाचं काय नुकसान होणार आहे?

पृथ्वी गरम कशी होते?

सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यातील काही प्रकाश ऊन म्हणजे गरम स्वरूपात असतो. पृथ्वीवरील जमीन, समुद्र ऊन शोषून घेतात. आणि गरम होतात. उरलेला प्रकाश परत अवकाशात (आकाशात) जाऊ पाहतो. पण हवेत काही खास वायू असतात — जसे कार्बन डायऑक्साइड , मिथेन आणि पाण्याची वाफ. हे वायू त्या परतत जाणाऱ्या गरमीला अडवतात आणि ती पुन्हा पृथ्वीवरच ठेवतात. याला हरितगृह परिणाम म्हणजे 'ग्रीनहाउस इफेक्ट' म्हणतात.
हरितगृह म्हणजे काचेची भाजीपाला वाढवण्याची खोली — तिथे आत गरमी अडकते ना? तसंच पृथ्वीभोवती हे वायू एक जाड 'कांबळं' बनवतात. पूर्वीपासून हे निसर्गात हे थोड्या प्रमाणात चालू राहिलेले आहे. त्यामुळेच पृथ्वीचं तापमान नीट राहतं — साधारण १५°C. पण गेल्या २०० वर्षांत लोकांनी खूप बदल केले: कारखाने, गाड्या, विमानं चालवण्यासाठी कोळसा, पेट्रोल, डिझेल जाळलं. यातून खूप कार्बन डायऑक्साइड हवेत गेला. जंगलं तोडली, त्यामुळे झाडं जी कार्बन डायऑक्साइड खातात त्यांची संख्या कमी झाली.शहरं वाढली, प्रदूषण वाढलं.
आता हे 'कांबळं' खूप जाड झालाय. गरमी बाहेर जाऊ शकत नाही, आणि पृथ्वीचा ताप वाढतोय!
याचा परिणाम म्हणजे समुद्राची पातळी वाढते, खूप गर्मी पडते, वादळं-पुर येतात, बर्फ वितळतो, प्राणी आणि वनस्पतींना त्रास होतो.

पृथ्वीचा ताप उतरवण्यासाठी
आपण काय करावं?

* जास्तीत जास्त झाडं लावा.
* विजेची बचत करा — दिवे, पंखे बंद करा जेव्हा गरज नसते.
* सायकल चालवा किंवा बसने जा, कमी पेट्रोल वापरा.
* सूर्याची आणि वाऱ्याची ऊर्जा वापरा.
* आपण सगळे मिळून प्रयत्न केला, तर पृथ्वी पुन्हा थंड आणि आनंदी होईल.
ही आपली पृथ्वी आहे आणि आपण तिची काळजी घ्यायला हवी!

vinay.ramaraghunath@gmail.com

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले? लग्गेच कळवा! -कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact