तुम्ही जर कधी कुत्रं पाळलं असेल, तर तुम्हाला हे नक्की माहिती असेल, की कुत्र्याला चुकवून काहीही खाणं हे केवळ अशक्य असतं. दोन खोल्या पलिकडे किंवा अगदी घराच्या बाहेर गॅलरीत, अंगणात कुत्रं असेल, ते अगदी गाढ झोपलेलं असेल तरीही वेफर्सचं पाकीट उघडल्याचा आवाज त्याला येतोच. आणि आपण पहिला वेफर तोंडात टाकायच्या आत तो त्याचा वाटा मागायला लाळ गाळत समोर येऊन उभा राहतोच.
हे वाचा!
झाडांमुळे आपले कान सुरक्षित राहतात! म्हणजे नक्की झाडं काय करतात?

कुत्र्याला कुठले कुठले आवाज ऐकू येतात?
वेफर्स एकवेळ जाऊद्या. ते आणि त्यांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असेही असेही फार कुरकुर आवाज करतात. पण आई किंवा वडील घरी यायच्या दोन चार मिनिटं आधीच घरातलं कुत्रं कान ताठ करून त्यांची वाट बघत बसलेलं असतं. ते येणार आहेत हे त्यांना आधीच कसं समजतं? इतकंच नाही, तर रात्रीच्या शांततेत कुठेही कसलाही आवाज झालेला नसतांना घरातलं कुत्रं अचानक सावध होऊन उठून बसतं, नीट लक्ष देऊन काहीतरी ऐकतं आणि मग एकतर भुंकतं किंवा पुन्हा झोपून जातं. त्यावेळी त्याला काय ऐकू येतं? आणि तो आवाज आपल्याला का येत नाही?
या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे कुत्र्याला माणसांपेक्षा खूप चांगलं ऐकू येतं. कुत्र्याला आपल्यापेक्षा चारपट दूरचे आवाज ऐकू येतात. ऐकू आलेला आवाज कशाचा आहे आणि तो नेमका कुठून येतो आहे हेही कुत्र्याला आपल्यापेक्षा खूप जास्त ओळखता येतं. आणि त्यामुळेच आपल्याला बिस्किटांचा डबा उघडण्याचा आवाज कितीही बारीक वाटला तरी कुत्र्याचा कानांना तो व्यवस्थित मोठा ऐकू आलेला असतो. आईबाबांची किंवा घरातल्या कुठल्याही माणसांची पावलं किंवा गाडीचा आवाज त्याला खूप ऐकू आणि लांबून ओळखू येतो.

असे असतात कुत्र्यांचे कान
- कुत्र्याच्या कानात माणसांच्या कानापेक्षा जास्त स्नायू असतात.
- माणसांच्या कानात सहा स्नायू असतात तर कुत्र्यांच्या कानात १८ स्नायू असतात.
- कुत्र्यांना त्यांचा कान हलवून आवाज जास्त चांगला ऐकता येतो.
- कुत्र्याच्या कानाचा आकार वैशिष्ठ्यपूर्ण असतो. त्यामुळे त्याला आवाज मोठा ऐकू येतो.
- माणसांना २०,००० या फ्रिक्वेन्सीपर्यंतचे आवाज ऐकू येतात. कुत्र्यांना मात्र ५०,००० या फ्रिक्वेन्सीपर्यंतचे आवाज ऐकू येतात.
- कुत्र्याचं पिल्लू जन्माला येतं त्यावेळी त्याची ऐकण्याची क्षमता विकसित झालेली नसते. त्यामुळे त्याला अजिबात ऐकू येत नाही. त्याला साधारण आठवड्याभरात आवाज ऐकू यायला लागतात.
मोठ्या आवाजात ऐकण्याचा कुत्र्यांना त्रास होतो का?
कुत्र्यांना आपल्यापेक्षा जास्त मोठ्याने आवाज ऐकू येतात त्याचा त्यांना त्रासही होतो. विशेषतः दिवाळीत एकदम मोठा आवाज करून फुटणाऱ्या फटाक्यांची कुत्र्यांना भीती वाटते. आणि ते घाबरून रस्त्यात, वाहनांच्या रहदारीत पळत सुटतात. त्यामुळे अपघात होऊ शकतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


