चिमणीएवढ्या पक्ष्याला लांबच लांब चोच. तोऱ्यात फिरणारा हा पक्षी कोण?

आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीतून दिसणाऱ्या झाडांवर आपल्याला चिमण्या, कावळे, पोपट, साळुंक्या, बुलबुल सारखे पक्षी नेहेमी दिसतात. आपल्या अंगणातले पक्षी म्हणून आपण त्यांना ओळखतो. अमेरिकेत घराच्या अंगणात कुठला पक्षी येतो माहितीये तुम्हाला? हमिंगबर्डला अमेरिकेतल्या घराच्या अंगणातला पक्षी म्हणून ओळखलं जातं. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमधला सर्वात छोटा पक्षी म्हणून या हमिंगबर्डची ओळख आहे. स्थलांतर करतानाही इतर पक्ष्यांप्रमाणे हे हमिंगबर्ड थव्याने जात नाही तर एकेकटे स्थलांतर करतात. एकट्याने ५०० मैल दूर उडत जातात. त्यांच्या उडण्याचंही एक वैशिष्ट्य आहे. गाड्या कशा रिव्हर्स घेता येतात तसा हमिंगबर्ड हा एकमेव पक्षी आहे जो उलटा उडत येवू शकतो. 

पंखांची वेगाने हालचाल करण्यात पटाईत असणारा हा पक्षी. ती हालचाल करताना एक विशिष्ट आवाज होतो. या आवाजावरुनच हमिंगबर्ड हे नाव या पक्ष्यांना मिळालं आहे. या पक्ष्यांना वास येत नाही. पण रंगांच्या बाबतीत हमिंगबर्डची नजर अतिशय पक्की असते. भडक रंगांच्या फुलांकडे आकर्षित होणाऱ्या हमिंगबर्डची अनेक वैशिष्ट्यं आहेत. पण या पक्ष्याचा फोटो बघितल्यानंतर नजरेत भरते ती त्याची लांबलचक चोच. एवढुशा पक्ष्याला एवढी लांब चोच कशाला हवी बरं? असा प्रश्न कोणालाही पडेल..हमिंगबर्डच्या या लांबलचक चोचीबद्दल जगभरातल्या पक्षीप्रेमींना कुतुहल वाटतं.

हमिंगबर्डला लांब चोचीचा फायदा काय?

काळाप्रमाणे माणूस बदलतो, उत्कांत होतो हे आपण अभ्यासाच्या पुस्तकात वाचलं आहे ना.. हमिंगबर्डची चोचही अशीच आहे. तीही काळाप्रमाणे वदलत गेली आहे. आहार आणि सुरक्षा या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी हमिंगबर्डला त्याच्या लांब चोचीचा फायदा होतो.

१२ सेंमी लांब एवढी लांबलचक चोच असणाऱ्या हमिंगबर्डच्या चोचीचा आकार आणि लांबी प्रजातीनुसार बदलते. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हमिंगबर्डच्या एकूण ३३० प्रजाती आहे. लांबलचक असलेली हमिंगबर्डची चोच थोडी वक्र असते. त्याचं कारण म्हणजे फुल. हो फुल. फुलामध्ये चोच घुसवून त्यातील रस पिण्यासाठी हमिंगबर्डची चोच लांब असते आणि वक्रही.

हमिंगबर्ड फुलामध्ये आपली चोच घुसवून जिभेच्या सहाय्याने रस ओढतो. फुलांचा रस गोळा करण्यासाठी एका सेकंदात हमिंगबर्डची चोच १३ वेळा फुलामधे फिरते. त्यातून जो रस गोळा होतो तो लगेच गिळून टाकतो. कुठल्या फुलांमधला रस प्यायचा ती फुलं ठरलेली असतात. त्या फुलांमध्ये आपली चोच घालता येवून रस पिता यावा अशी रचना हमिंगबर्डच्या चोचीची असते.

Image: dailymail

प्रजातीप्रमाणे हमिंगबर्डच्या चोचींची रचना, लांबी यात वेगळेपण असते. हमिंगबर्डची चोच कमीत कमी ८ मिलीमीटर तर जास्तीत जास्त १२० मिलीमीटर लांब असते.  

स्वत:चं संरक्षण करण्यासाठी आपल्या लांब चोचीचा हमिंगबर्ड उपयोग करतात. त्यांच्या हद्दीत इतर पक्ष्यांनी प्रवेश केल्यास किंवा इतर पक्ष्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्यास हमिंगबर्ड आपल्या चोचीचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपली चोच शत्रू पक्ष्याच्या शरीरात खूपसून स्वत:चं संरक्षण करतात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact