आजारी पडू नये म्हणून ग्रेट बस्टर्ड स्वत:च्या मनानेच घेतात औषधं!

Image: scienceblog

आपण आजारी पडलो की दवाखान्यात जातो. डाॅक्टर आपल्याला तपासून औषधं देतात. औषधं घेतली, आराम केला की आपल्याला बरं वाटतं. आजार जर छोटाच असेल तर आजी- आई आपल्याला घरच्याघरी औषध देवून बरं करतात. इतकंच नाहीतर आजारी पडू नये म्हणून  पौष्टिक पदार्थ खाऊ घालून आई आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पण जेव्हा प्राणी पक्षी आजारी पडतात, तेव्हा ते काय करत असतील बरं असा प्रश्न पडतो का तुम्हाला? आजरी पडल्यावर औषध घेणं, आजारावर उपचार करणं हे फक्त माणसालाच जमतं असं वाटतं का तुम्हाला? जर असं वाटत असेल तर आपला समज चुकीचा आहे.  हे खरं आहे की पक्षी आजारी पडल्यावर स्वत:हून कोणत्या दवाखान्यात जावू शकत नाही. पण ते स्वत:च आजारावर उपचार मात्र करु शकतात हे संशोधकांनी आपल्या संशोधनातून सिध्द केलं आहे. ग्रेट बस्टर्ड ज्याला भारतात माळढोक नावाने ओळखलं जातं हे पक्षी विशिष्ट जंतूपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी स्वत: उपचार करतात.

हेही वाचा!

ग्रेट बस्टर्डचं वैशिष्ट्य काय?

भारतात आढळणाऱ्या ग्रेट बस्टर्ड या पक्ष्याला माळढोक पक्षी म्हणून ओळखलं जातं. ओटीस टारडा या प्रजातीचे ग्रेट बस्टर्ड हे उत्तर मोरोक्को, दक्षिण आणि मध्य युरोप, मध्य आणि पूर्व आशियात आढळतात. उडणारा सर्वात वजनदार पक्षी म्हणून ग्रेट बस्टर्डची विशेष ओळख आहे. हे पक्षी ३ ते १९ किलो वजनाचे असतात.

१९९६ पासून जगभरात या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे ग्रेट बस्टर्ड यांना असुरक्षित पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं असून त्यांचा समावेश ' द इंटरनॅशनल युनियन फाॅर कनझरव्हेशन ऑफ नेचर रेड लिस्ट' मध्ये करण्यात आला आहे. जगात असलेल्या एकूण ग्रेट बस्टर्ड पैकी ७० टक्के ग्रेट बस्टर्ड नैऋत्य युरोपातील आयबेरिअन पेनिनसुला या पर्वतीय प्रदेशात आढळतात.

या ग्रेट बस्टर्ड पक्ष्यांवर महत्वाचं संशोधन स्पेनमधील माद्रिदच्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल सायन्सेस'च्या संशोधकांनी केलं आहे.

Image: rarebirdalert

संशोधक काय म्हणतात?

 Image: earth.com

संशोधकांनी ग्रेट बस्टर्ड पक्ष्याच्या ६१९ विष्ठा नमुन्यांचा अभ्यास केला. त्यातून हे ग्रेट बस्टर्ड आपल्या आहारात दोन वनस्पतींच वापर प्रामुख्याने करतात असं आढळून आलं. या वनस्पतींमध्ये असं काय आहे याचा अभ्यासही संशोधकांनी केला. त्यातून हे ग्रेट बस्टर्ड स्वत:च स्वत:वर उपचार करतात, त्यासाठी विशिष्ट वनस्पतींचा वापर करतात हे सिध्द झालं आहे.ग्रेट बस्टर्ड काॅर्न पाॅपिस (खसखससारख्या वनस्पती) आणि पर्पल व्हायपरस बग्लाॅस या दोन वनस्पती औषध म्हणून खातात.

काॅर्न पाॅपिस याचा वापर माणूस औषधी घटक म्हणून करतात. काॅर्न पाॅपिसमध्ये वेदनाशामक घटक असतात. तर पर्पल व्हायपरस बग्लाॅस ही वनस्पती माणसाने खाल्ली तर विषारी ठरु शकते. पण या वनस्पतीमध्ये बुरशी विरोधी गुणधर्म असतात.  

विणीच्या हंगामात ग्रेट बस्टर्ड या दोन वनस्पती जास्त प्रमाणात खातात. कारण या हंगामात त्यांच्या शरीरातील ऊर्जा जास्त वापरली जाते. शिवाय शरीरात परजीव जाण्याची शक्यताही असते. या परजीवांपासून आरोग्याला असलेला धोका टाळण्यासाठी ग्रेट बस्टर्ड भरपूर प्रमाणात् या दोन वनस्पतींचं सेवन करतात.

मादी  ग्रेट बस्टर्डच्या तुलनेत नर ग्रेट बस्टर्ड यांच्या शरीरात परजीव जाण्याचा जास्त धोका असतो. तसेच संशोधनातही नर ग्रेट बस्टर्डच काॅर्न पाॅपिस आणि पर्पल व्हायपरस बग्लाॅस या दोन वनस्पती नर ग्रेट बस्टर्ड मादींच्या तुलनेत जास्त खात असल्याचं संशोधकांना आढळलं.

जरी नर ग्रेट बस्टर्ड या वनस्पती जास्त सेवन करत असल्या तरी मादी ग्रेट बस्टर्डच्या आहारातही या दोन वनस्पती असतात हे संशोधकांना आढळलं आहे. या वनस्पती सेवन करुन ग्रेट बस्टर्ड परजीवांपासून आपल्या आरोग्याचं रक्षण करतात.

ग्रेट बस्टर्डसारखे चिंपाझी आणि डाॅल्फिनही

फक्त ग्रेट बस्टर्डच नाही तर चिंपाझी आणि डाॅल्फिनही स्वत:च स्वत:वर उपचार करुन घेण्याइतके हुशार असतात. चिंपाझीच्या शरीराला जखमा झाल्या तर चिंपाझी विशिष्ट किटकांना पकडतात. ते किटक जखमांवर घासून जखमा बऱ्या करतात. तर डाॅल्फिन मासे समुद्रातील विशिष्ट प्रकरचे प्रवाळ आपल्या अंगावर घासतात. याद्वारे त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करण्याची ते काळजी घेतात.

Image:scientificamerican

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact