मेणबत्ती लहान होत पाण्यात गेली तरी विझली नाही! असं कसं होईल?

- राजीव तांबे

निवान धावत धावतच घरी आला. पाठीवरची सॅक खूर्चीत टाकत म्हणाला, “पेटती मेणबत्ती जर का पाण्यात ठेवली तर ती विझेल ना आजी? काѕѕय? कारण आमच्या सुमाताई म्हणाल्या की, उद्‍या त्या आम्हाला पाण्यात पेटती मेणबत्ती ठेवून दाखवणार आहेत. आणि पाणी असलं तरी ती विझणार नाही.”

image : freepik

आम्ही विचारलं, ‘असं कसं? तर त्या म्हणाल्या हे सिक्रेट तुम्ही उद्या शोधून काढा.”

आजी हसतच म्हणाली, “हे सहज शक्य आहे रे. चला ही गंमत आपण आत्ताच करुन पाहूया.”

निवान आणि आजी कामाला लागले.

आजीने मेणबत्ती, काडेपेटी आणि स्टीलचं छोटं पातेलं आणलं. 

निवान अर्धी बादली पाणी घेऊन आला. पाणी ओतण्यासाठी जग आणला. आजीने खूण करताय निवान एक लहान ताटली घेऊन आला.

आजीने मेणबत्ती पेटवली. वितळणार्‍या मेणाचे काही थेंब लहान ताटलीवर टाकले आणि त्यावर ती मेणबत्ती सरळ ऊभी केली.

आजीने ती मेणबत्ती पातेल्यात ठेवली.

हेही वाचा!

तापायला ठेवलेल्या दुधाचा फुगा होतो मग पाण्याचा का नाही?

आजी निवानला म्हणाली, “हं. आता जगने सावकाश पाणी ओत. अगदी मेणबत्तीचा वरचा थोडासाच भाग पाण्याबाहेर राहील इतकं पाणी ओत.”

आजीने सांगितल्याप्रमाणे निवानने सावकाश पाणी ओतलं.

आता आजी आणि निवान पाहू लागले काय होणार? 

थोड्याचवेळात मेणबत्तीची लांबी कमी-कमी होऊ लागली.

म्हणजे मेणबत्तीची लांबी पाण्याच्या उंचीपेक्षा कमी झाली तरी मेणबत्ती काही विझली नाही. मेणबत्ती जळतच होती.

निवान मोठे डोळे करून हे दृश्य पाहात होता.

निवानच्या मनातलं ओळखून आजी सांगू लागली, “मेणबत्तीची ऊंची जरी पाण्याच्या ऊंचीपेक्षा थोडी कमी झाली तरीही मेणबत्ती जळत राहते याचं कारण अगदी सोपं आहे. मेणबत्तीचा बाहेरचा पृष्ठभाग सतत पाण्याच्या संपर्कात असल्याने तो थंड राहतो...”

आजीला थांबवत निवान म्हणाला, “थांब. थांब. मी नीट पाहून याच्या पुढचं कारण शोधलं आहे. मेणबत्तीचा बाहेरचा पृष्ठभाग पाण्यामुळे सतत थंड राहिल्याने त्या भागातील मेण वितळतच नाही. पण मेणबत्तीचा आतील भाग मात्र मेणबत्ती सतत पेटत असल्याने वितळत राहतो. त्यामुळे तिथे खोलगट भाग तयार होतो. बघ आजी, तसंच दिसतंय तिथे.”

“शाबास निवान. एकदम बरोबर! व्यवस्थित निरीक्षण केलं तर सिक्रेट ओळखता येतंच.

‘पाणी स्वत:हून पेटत नाही पण पाण्यातच पेटणार्‍यांना ते कधी-कधी स्वत:हून मदत करतं’ ही चिनी म्हण लक्षात ठेव.”

rajcopper@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact