तापायला ठेवलेल्या दुधाचा फुगा होतो मग पाण्याचा का नाही?

-राजीव तांबे

आजीने सकाळी एका मोठ्या गॅसवर आंघोळीसाठी पाणी तापवत ठेवलं. तर दुसर्‍या छोट्या गॅसवर चहासाठी दूध गरम करत ठेवलं. 

आजी निवानला म्हणाली, “जरा या दुधाकडे आणि पाण्याकडे लक्ष ठेव. मी आलेच.”

निवान गॅस समोर उभा राहिला.

image : zigya

दूध तापू लागलं. दुधात छोटेछोटे बुडबुडे येऊ लागले. दुधावर साय तरंगू लागली. आता हळूहळू दूध उकळू लागलं. दुधावर छोटासा फुगा तयार झाला.

त्याचसुमारास पाणी पण उकळू लागलं. पाण्यातून बबुडबुडे येऊ लागले. पाण्यातून वाफा उसळू लागल्या.

आता यावेळी नेमकं काय करायचं, ते काही निवानला समजेना. आजीने तर त्याला फक्त ‘लक्ष ठेवायला’ सांगितलं होतं. पण लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं?

आता दुधाच्या पातेल्यातला दुधाचा फुगा मोठा होऊ लागला. आणि अचानक दुधाच्या पातेल्यातून येणार्‍या वाफा बंद झाल्या. 

त्याचवेळी पाण्याच्या पातेल्यातील पाणी उकळू लागले. पाण्याच्या तळापासून वरपर्यंत जोरजोरात बुडबुडे येऊ लागले. वेगात वाफा येऊ लागल्या.

इतक्यात तो दुधाचा फुगा फुटला आणि दूध उतू जाऊ लागलं. निवान घाबरला. त्याने घाबरुन दोन्ही गॅस बंद केले.

आजी धावतच आली पण काही क्षण उशीरा.

हेही वाचा… 

औषध आहे की जादू? पक्के दात पडल्यानंतरही तोंडात येणार औषधाचा दात!

निवानकडे पाहात आजीने विचारलं,“अरे दूध कसं काय उतू गेलं? आणि तू दोन्ही गॅस का बंद केलेस?”

“अगं नाहीतर हे पाणी सुध्दा उतू गेलं असतं ना?”

“अरे निवान दूध उतू जातं पण पाणी नाही.”

“पण का?” 

image : pcbpedia

आजी सांगू लागली,“दुधात पाणी, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ याचं मिश्रण असतं. दूध गरम होऊ लागलं की, त्यातले स्निग्ध पदार्थ दुधाच्या पृष्ठभागावर येऊन तरंगू लागतात. मग त्याचा एक पापुद्रा तयार होतो...”

“ही दुधावरची साय! हो नां आजी?”

“एकदम बरोबर.”

निवान उत्साहाने म्हणाला, “आता मी सांगतो. ही साय या दुधाच्या पृष्ठभागावर अशी काही घट्ट बसली की, आतून येणारी वाफ या सायीने अडवली. मी जो दुधाचा फुगा म्हणतोय ना तो होता ‘सायीचा फुगा!’ कारण या सायीखाली वाफ कोंडल्यामुळे त्याचा फुगा तयार झाला. हो नां?”

“शाबास निवान. थोडासा तर्क लढवला की समजू लागतं. वाफेचा दाब खालच्या बाजूने वाढत जाऊन, दूध वर वर यायला सुरूवात होते. तसतसा तो फुगा फुलायला लागतो. पण हा दाब अती झाला की, हा सायीचा पापुद्रा फोडून दूध उतू जातं. पाण्याचं मात्रं असं होत नाही. पाणी उकळू लागलं की त्याची वाफ सहजंच सरळ बाहेर पडू लागते. त्यामुळे ते उतू जात नाही. 

‘खवा खाणार्‍यांच्या घरातलं दूध उतू जात नाही’ ही हुनान प्रांतातली चिनी म्हण लक्षात ठेव.

rajcopper@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact