
Image : freepik
रुद्र वयाने लहानच, म्हणजे सहावीत शिकणारा. पण लहान असला म्हणून काय झालं? या छोट्याशा रूद्रला राग मात्र फारच मोठा येतो. घरी सतत चिडचिड करणारा, संताप करणारा रुद्र बाहेर खेळायला गेल्यावर अर्ध्या तासात घरी परत येतो. येतो तोच मुळी कोणाचा तरी राग राग करत. कधी त्याला खेळाचे नियम सांगणाऱ्या नृपाचा राग आलेला असतो तर कधी रुद्रला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रावणीचा. शाळेतही रुद्रचं वागणं हे असंच. त्याचं वर्गात कोणाशीच पटत नाही. शिक्षकांनी टीम प्रोजेक्ट करायला दिलेला होता, तिथेही त्याचं सगळ्यांशीच वाजलं. प्रोजेक्ट असेल तर रुद्र आमच्या टीममध्ये नकोच असंच वर्गातल्या सर्व मुलांचं म्हणणं. कारण सतत चिडणारा रुद्र कोणाचं ऐकण्याच्या मूडमध्येच नसतो. जेव्हा पाहावं तेव्हा माझंच खरं असंच त्याचं वागणं, जे इतर मुलांना अजिबात पटत नाही. पाचवीच्या रिझल्टवर रुद्रमुळे टीम प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही, असा शेरा लिहून आलेला. तो वाचूनही आपल्या स्वभावात बदल करायला हवा, असं रुद्रला अजिबात वाटत नाही.
लहानपणी ह्ट्टी असलेला रुद्र जसजसा मोठा होत होता तसा तो रागीटच होत होता. आईच्या हे लक्षात येत होतं. बाबांसमोर रुद्रने चिडचिड केली, आदळआपट केली, आडदांडपणा केला तर बाबा त्याच्यावर ओरडून, धाकदपटशा दाखवून त्याला शांत बसवत. पण रुद्र तेवढ्यापुरतीच शांत व्हायचा. आतून मात्र धुसफुसतच असायचा. आत दाबून धरलेला राग बाबाची पाठ फिरली की दुप्पट वेगाने बाहेर पडायचा.
हेही वाचा!
त्यादिवशी असंच झालं. बाबाने रुद्रला रागवून गप्प केलेलं असतं. बाबा असेपर्यंत शांत बसलेला रुद्र बाबा बाहेर गेल्यावर आपल्या मूळ स्वभावावर येतो. त्याला हाॅलमध्ये ओम त्याचा स्टडी टेबल घेवून चित्र काढत असल्याचं दिसतं. याने न विचारता आपल्या टेबलला हात लावलाच कसा यामुळे रुद्रचा संताप संताप होतो. रुद्र ओमची चित्रकलेची वही हातानं जोरात ढकलतो आणि त्याच्या पुढ्यातला टेबल हिसकावून स्वत:च्या खोलीत निघून जातो. इकडे दादा आपल्याशी असा वागला त्यामुळे ओम रडत आईकडे जातो. खरंतर आईला रुद्रचा खूप राग आलेला होता. पण तो राग ती गिळून घेते. आई रुद्रला हाक मारुन हाॅलमध्ये बोलावते. आईची हाक ऐकून रुद्रही हाॅलमध्ये येतो. ' बेटा तू ओमच्या पुढ्यातला टेबल का हिसकावलास, त्याची चित्रकलेची वहीही फेकली असं का केलंस? तुला टेबल हवा होता तर मागायचा ना त्याच्याकडे. त्याला तर थोडा वेळच हवा होता टेबल, चित्रं काढून झाल्यावर त्याने दिलाच असता ना?
' पण आई माझ्या टेबलला ओम का हात लावतो, त्याचं टेबल आहे ना?
'अरे हो आहे, पण घेतला त्याने तर काय बिघडलं. भाऊच आहे ना तुझा तो. एकमेकांमध्ये वस्तू वाटून घेतल्या तर काय बिघडलं?
' नाही.. मला माझ्या वस्तूला न विचारता हात लावला की राग येतो!'
ओमचं रडणं थांबलेलं असतं. तो मध्येच म्हणतो ' आई माझ्या टेबलाचा पाय तुटला काल. माझे दोन मित्र त्यावर बसले होते. म्हणून मी दादाचा टेबल घेतला!'
' बघितलं ना रुद्र काहीतरी अडचण होती म्हणून घेतला ना ओमने तुझा टेबल!' आईने रुद्रची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला.
मग आई रुद्रला म्हणाली, ' मला सांग रुद्र, तुला कसला राग येत नाही ते.. छोट्या छोट्या गोष्टींवरुन राग येतो तुला. जेवायला आधी ओमलाच का दिलं? गाडीत मागच्या सीटवरचा का बसायला लावलं? मित्राने अमूक म्हटलं म्हणून राग, मित्राने तमूक केलं म्हणून राग. रुद्र तुला फक्त रागच येत असतो. तुझ्या या रागीट स्वभावाने सर्व तुझ्या दूर जाताय हे कळतंय का तुला?
' मला काही फरक पडत नाही!' आईच्य प्रश्नावर रुद्र पुन्हा चिडून उत्तर देतो.
' तुला फरक पडत नसेल पण तुझ्या आजूबाजूच्या लोकांना तर पडतो. काल निलिमा टीचर भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या, ' यंदा रुद्रला शाळेत जरा समजावून पाठवा. मागच्या वर्षी सर्व मुलं खेळायच्या तासाला, सहलीला एकत्र मजा करायची आणि रुद्र मात्र एकटाच बसलेला असायचा. मी मुलांना सांगायचा प्रयत्न केला, पण रुद्र विनाकारण मुलांवर चिडतो. त्यामुळे मुलं घ्यायचीच नाही रुद्रला त्यांच्यात. मुलं त्याला घ्यायची नाही, म्हणून तो आणखी चिडायचा , खरंतर मलाच खूप वाईट वाटायचं.'
'रुद्र तुझ्या स्वभावाने तू एकटा पडतोस. तुला कोणी मित्र नाही. तू कुणाला घरी बोलवत नाही, तुला कोणी मित्र त्यांच्या घरी बोलवत नाही. यामुळे मलाही वाईट वाटतं. तुझ्या चिडखोर, भांडखोर स्वभावामुळे तू बाबांची सतत बोलणी खातो, याचंही मलाच वाईट वाटतं. आपला दादा आपल्याशी असं वागतो, हे बघून ओमलाही वाईट वाटतं. तुझ्या रागीट स्वभावाचा तू सोडून इतरांना फरक पडतो रुद्र!'

Image : freepik
आई थोडी दुखावल्याच्या स्वरात म्हणाली. आईच्या बोलण्यामुळे चिडलेल्या रुद्रच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याचा राग कमी झाला.
' रुद्र मी तुला राग न येण्याच्या किंवा राग आल्यावर तो लवकर शांत करण्याच्या सोप्या युक्त्या सांगू का?'
रुद्र आईला लगेचच हो म्हणतो.
हेही वाचा!
' राग येऊ न देण्याच्या, राग शांत करण्याच्या तीन चारच युक्त्या आहेत. पण त्या अगदी सोप्या आहेत. तुला सहज करता येतील. काय करायचं, राग आला तर मनातल्या मनात १ ते १०० आकडे सरळ आणि उलटे मोजायचे . तेवढ्या वेळात आलेला राग कमी होतो. समजा तुला कोणत्याही गोष्टीमुळे कोणाचा राग आला तर संतापण्याआधी कारण समजून घ्यायचं. आता हेच बघ ना तू जर ओमला विचारलं असतं, की माझा टेबल का घेतला तर त्याने तुला कारण सांगितलं असतं. आणि कारण कळलं असतं तर तुला राग आलाच नसता.. हो ना?'
रुद्र आईच्या बोलण्यावर होकारार्थी मान डोलावतो.
' मित्र मैत्रिणींमध्ये खेळताना फक्त आपलंच म्हणणं खरं असं करु नये रुद्र. असं करायला गेलं तर तुला रागच येणार. कारण इतरांनाही त्यांची मतं असतात. त्यांच्या इच्छा असतात, ते तुझंच का म्हणून ऐकतील. त्यामुळे एकमेकांना समजून उमजून खेळायला हवं. हसत खेळत गटातून काम करायला हवं. यामुळे सर्वामध्ये मिसळता येत. आपली इतरांशी मैत्री होते. मित्र मैत्रिणींमध्ये राहिला तर एकटं वाटणार नाही, चिडचिड होणार नाही. समजा एवढं करुनही राग आलाच तर आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. श्वास आत घेणे, बाहेर सोडणे या क्रियेवर एक मिनिट जरी तू लक्ष केंद्रित केलं तरी तुझा राग शांत होईल. जेवणाच्या वेळेस नीट जेवण केलं तर पोट व्यवस्थित भरेल. पोट भरलेलं असलं की चिडचिड होत नाही. किती सोपे उपाय आहेत बघ हे..तुला आवडेल तो करुन पाहा!
आईने राग शांत करण्याचे, राग येवू न देण्याचे सांगितलेले उपाय रुद्रला एकदम भारी वाटतात.
' आई मी एक काम करतो, तू सांगितलेले उपाय मी एका कागदावर लिहूनच काढतो!'
आईला रुद्रची ही आयडिया आवडते.
' मस्त रुद्र. लिहिणारच आहेस तर आणखी एक काम कर. तो कागद तुझ्या कपाटाच्या दाराला लाव. आणि रोज किमान एकदा तरी त्यावर नजर घालत जा!'
रुद्र्ला आईचं हेही म्हणणं पटतं.
रुद्र स्टडी टेबल घेवून लिहायला बसतो. ' माझं लिहून झालं की ओम मी तुला टेबल देतो चित्र काढायला!' रुद्रची ही ऑफर ऐकून ओमही खूष होतो.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact