स्क्रीनचं व्यसन टाळण्यासाठी स्क्रीन टाइम किती असायला हवा?

-डॉ. योगिता आपटे

घरोघरी मुलं आणि आईवडील यांच्यातल्या भांडणाचा मुद्दा असतो तो म्हणजे स्क्रीन! त्यातही स्क्रीन टाईम किती असावा? मुळात असावा की नसावा याचा विचार करण्याआधी आपल्याला हे तरी बघितलं पाहिजे की स्क्रीन टाइम म्हणजे काय? तर, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले असलेल्या यंत्रासोबत घालवलेला वेळ म्हणजे स्क्रीन टाईम! म्हणजे टीव्ही, स्मार्टफोन्स, टॅब, कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम यातल्या प्रत्येक यंत्राच्या स्क्रीनसमोर घालवलेला प्रत्येक मिनिट स्क्रीनटाईम समजला जातो.

हेही वाचा!

आता या व्याख्येचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपला स्क्रीन टाईम मोजताना हे सगळे भाग मोजत नाही. आपण काय विचार करतो? तर इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप आणि इतर सोशल मीडिया साईट्स. त्याशिवाय आपण जे गेम्स खेळतो ते. त्यात आपण जेवढा वेळ घालवतो तोच आपला स्क्रीनटाईम आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र घरात कोणीतरी टीव्ही लावला म्हणून आपणही एखाद दोन सीरियलचा एपिसोड बघतो. थोड्या बातम्या बघतो. एखादा रिऍलिटी शो किंवा गाण्यांचा कार्यक्रम किंवा डान्स शो बघतो. तोही सगळा स्क्रीनटाईमच असतो. आपण शाळेत दिलेला अभ्यास करण्यासाठी इंटरनेट वापरतो, अभ्यासासाठी एखादं अँप वापरतो तोही सगळं स्क्रीनटाईमच असतो. असा जर आपण विचार केला तर आपण दिवसातला जागेपणीचा बराचसा वेळ कुठल्या ना कुठल्या स्क्रीनसमोर असतो असं आपल्या लक्षात येतं. पण प्रत्यक्षात मात्र आपण स्क्रीनसमोर वेळ घालवत असतांना आपल्याला त्याची जाणीव होत नाही.

एरवी आपण एखादी गोष्ट, एखादी कृती अमर्याद वेळ करू शकत नाही. कारण आपल्याला ते शक्य नसतं. व्यायाम, अभ्यास, वाचन, गप्पा मारणं, एखादं काम करणं यापैकी काहीही आपण करत असलो तरी आपलं वेळेचं भान सहसा सुटत नाही. आपण अगदी एखाद्या पुस्तकात गुंग होऊन गेलो तरी ते पुस्तक कधी ना कधी संपतं. पण स्क्रीनच्या बाबतीत तसं होत नाही. कारण स्क्रीन या प्रकारचे गुणविशेष तसे आहेत. आणि म्हणूनच स्क्रीनचं व्यसन लागू शकतं.

स्क्रीनचे (विशेषतः फोनचे) गुणविशेष

तुम्ही तो स्क्रीन एकट्याने बघू शकता किंवा इतर कोणाबरोबर बघू शकता.

स्क्रीनकडे बघणं ही कुठलीही हालचाल न करता करण्याची गोष्ट आहे

स्क्रीनवर समोर येत राहणारा मजकूर किंवा व्हिडीओ कन्टेन्ट कधीच संपत नाही. पुस्तक वाचून संपतं, पण सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवरचा कन्टेन्ट संपतच नाही.

हा मजकूर अत्यंत सोपा असतो. त्याचा विचार करण्यासाठी फार बुद्धी वापरावी लागत नाही. 

अत्यंत आकर्षक रंग, आवाज आणि हालचाली सतत समोर दिसत असल्याने त्यावरून आपलं लक्ष दुसरीकडे नेणं अतिशय अवघड होऊन बसतं.

स्क्रीनकडे बघणं अत्यंत मनोरंजक असतं

प्रत्येक वयोगटासाठी इथे काही ना काही असतंच

बहुतेक सगळ्या प्रमुख भाषांमध्ये मजकूर उपलब्ध असतो

तुमच्या आवडीचा कन्टेन्ट तुमच्या समोर येत राहतो. तुम्ही आधी जे सर्च केलेलं असेल त्याप्रमाणेच पुढचा मजकूर तुम्हाला सुचवला जातो. 

yogeeta.apte@gmail.com

(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact