‘ती’ माझी बेस्ट फ्रेण्ड, पण तिची बेस्ट फ्रेण्ड भलतीच कुणी. असं कसं?

image : freepik

इशा शाळेच्या पहिल्या दिवशी सॉलिड खूश होती. एक तर ती फायनली पाचवीत गेली होती. त्यामुळे एके दिवस तिचा दादा तिला “प्राथमिकच्या मुलांनी गप्प बसा” म्हणून चिडवायचा, ते आता बंद झालं होतं. आणि दुसरं म्हणजे तिला शाळेत मिताली भेटणार याचा फार आनंद झालेला होता. मिताली तिची चौथीपर्यंतची बेस्ट फ्रेंड होती. दोघी कायम सगळीकडे सोबत असायच्या, एकत्र अभ्यास करायच्या, एकसारख्या कार्यक्रमात भाग घ्यायच्या, इतकंच काय, पण खेळाच्या एकाच टीममध्ये दोघींना घ्यावं यासाठी शिक्षकांशी भांडायच्यासुद्धा! यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघींनी काय मज्जा करायची ते दोघींनी परीक्षेच्या आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे सुट्टी लागल्यावर त्या दोघी दोन तीन वेळा एकमेकींकडे खेळायलाही गेल्या होत्या. पण एकदा इशा गावाला गेली, मग मिताली गावाला गेली आणि नंतर त्या एकमेकींकडे काही खेळायला गेल्या नाहीत. असंही त्या एकमेकींपासून खूप लांब रहायच्या, त्यामुळे सारखं कोणालातरी सोडायला आणि आणायला जावं लागायचं. ते काही जमायचं नाही. त्यामुळे इशा जवळजवळ पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत मितालीला अजिबात भेटलीच नव्हती.

 

 

हेही वाचा!

वर्गातली मुलं त्रास देतात, एकटे पाडतात, भीती दाखवतात! काय करू?

 

शाळेच्या पहिल्या दिवशी इशा मितालीसाठी स्वतः बनवलेलं कार्ड घेऊन गेली होती, पण मिताली शाळेत आली, तीच मुळी मानसीबरोबर! तिने इशाला हाय केलं, इशाने आणलेलं कार्ड घेतलं, तिच्याबरोबर दोन मिनिटं बोलली, पण बसली मात्र मानसीबरोबर एका बाकावर. हे बघून इशाला एकदम रडूच यायला लागलं. कालपर्यंत आपली बेस्ट फ्रेंड असणारी मिताली असं कसं काय करू शकते?

इशाला असं वाटलं की मितालीने चीटिंग केली. तिने आपल्याशी मैत्री तोडली. त्यामुळे ती मितालीशी अजिबातच बोलेना. आणि मितालीला मात्र आपलं काय चुकलं तेच कळत नव्हतं. मानसी तिच्या घराच्या जवळ राहायची. त्या दोघी सुट्टीत एकमेकींना नेहेमी भेटायच्या, एकत्र खेळायच्या. त्यांचा स्वभावही जुळला होता, आवडीनिवडी सारख्या होत्या. खरं म्हणजे इतकी वर्षं आपली गट्टी कशी झाली नाही हेच त्यांना कळत नव्हतं. पण या सगळ्यात इशा मात्र एकटी पडल्यासारखी झाली. तिने मितालीशी बोलणं बंद केल्यामुळे बाकीच्या वर्गाला असं वाटलं की इशाच भांडते आहे. या सगळ्यात तिने काय करायला हवं होतं?

तर सगळ्यात पहिले इशाने हे समजून घ्यायला पाहिजे होतं, की कोणाचीही कोणाशी मैत्री जबरदस्तीने होत नाही. आणि झालेली मैत्री अशी उगाच तोडायचीही नसते. त्यामुळे मितालीला एक नवीन मैत्रीण मिळाली असली तरीही तिची आणि मितालीची मैत्री कायम वेगळी आणि स्पेशलच राहणार होती. कदाचित तिने मानसीशी मैत्री केली असती, तर तिघींचा छान ग्रूप झाला असता, किंवा कदाचित मितालीला काही दिवसांनी वाटलं तर ती परत इशाशी बोलू शकली असती. पण चिडून भांडून इशाने मितालीला ते करूच दिलं नाही.

आपली मैत्रीण शेअर करणं कितीही कठीण असलं, तरी इशाने मानसी आणि मितालीची मैत्री मान्य करणं हेच अधिक योग्य ठरलं असतं. कारण मैत्री काही ठरवून होत नाही आणि ठरवून मोडताही येत नाही. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact