आम्ही छान खेळत असलेलो आई बाबांना आवडत नाही का?

 

खेळायला बाहेर अर्धा तास गेलं की अर्धा तास झाल्याबरोबर आई मोठ्याने हाक मारुन घरी बोलावते. थोडा वेळ जास्त खेळू दिलं तर काय बिघडलं? - विहान, ६वी 

हाय विहान,

तुझी ही जी तक्रार आहे ना, ती तुझ्या वयाच्या जवळजवळ सगळ्याच मुलांची असते. ते म्हणतात की आमचा खेळ रंगात आलेला असतो, सॉलिड मजा येत असते तेव्हाच नेमकी आई हाक मारते. असं ती का करते? खरं खरं सांगू? तुमच्या आईला तुमचा खेळ बंद पाडण्यात अज्जिबात इंटरेस्ट नसतो. खरंच! तुम्ही मस्त खेळत असाल, मजेत असाल याचा तिला आंनदच होतो. तिलाही असं वाटतं की मुलांना खेळू दे अजून थोडा वेळ. तरीही ती तुम्हाला हाक का मारते?

कारण तिला तुम्हाला हाक मारावीच लागते. आता तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही मुलं हाक मारल्याशिवाय खेळ आवरून कधी तरी घरी जाता का? कधी तरी गेलाय का? बरं समजा तुम्हाला अर्ध्या तासाच्या ऐवजी एक तास खेळू दिलं तर तुम्ही कुरकुर न करता खेळ थांबवता का? नाही ना? कारण तुम्हाला तेव्हाही अजून थोडा वेळ खेळायचं असतं.

 

हेही वाचा…

मोठी माणसं चुकीचं वागतात तेव्हा आम्ही गप्प राहून बघतच बसायचं का?

पण तुम्ही जर सारखे खेळतच बसलात तर अभ्यास कधी करणार? तुमची इतर कामं कधी करणार? हात पाय कधी धुणार? आईबाबांशी गप्पा कधी मारणार? आणि मुख्य म्हणजे जेवणार कधी? तुम्ही खेळत बसता तेव्हा तुम्हाला भूक लागल्याचंही लक्षात येत नाही. मग केव्हातरी अचानक भुकेने रडूच यायला लागतं. चिडचिड व्हायला लागते. हो ना?

हे आईला माहिती असतं. म्हणून ती तुमच्या भुकेचा, अभ्यासाचा, इतर गोष्टींचा अंदाज घेऊन तुम्हाला हाक मारते. त्यामुळे तुम्हाला रडू यायच्या आत, उगाच भांडणं व्हायच्या आत तुम्ही घरी जाऊ शकता. आणि त्यातून समजा तुम्हाला एखाद्या सुट्टीच्या दिवशी खूप खूप वेळ खेळायचं असेल, तर काय करायचं? तर आधी अभ्यास संपवून टाकायचा, पोटभर जेवायचं आणि मग आईला सांगून जायचं की मी आज खूप वेळ खेळणार आहे. मग ती कशाला बरं नाही म्हणेल?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact