
आईला ती जर काही चुकत असली असं सांगितलं किंवा मी माझं म्हणणं मांडलं की आई म्हणते तू तर फारच उलट बोलायला लागलीये! असं का करतात आईपप्पा? मोठी माणसं सुद्धा कधी कधी चुकू शकतात की नाही?
ऐश्वर्या (८वी)
हाय ऐश्वर्या,
तू म्हणतेस ना, तसं तुझ्या वयाच्या खूप मुलामुलींना वाटतं. म्हणजे पाचवी किंवा सहावीपर्यंतसुद्धा तुम्हाला असं वाटत नाही. किंवा तुम्ही जे बोलताय ते आगाऊपणाचं आहे असं मोठ्या माणसांनासुद्धा वाटत नाही. याचा अर्थ लहान मुलं आगाऊपणा करत नाहीत का? तर तसं नाही. मुलं लहानपणापासून अशीच असतात. कधीतरी ऐकून घेतात, कधीतरी उलट उत्तर देतात. पण लहान मुलांना थोडंसं रागवून मोठी माणसं सोडून देतात, पण तुझ्या वयाच्या मुलांना मात्र लगेच आणि जास्त रागवतात. का माहितीये?
कारण तुम्ही आता थोडे थोडे मोठे व्हायला लागलेले आहात. त्यामुळे तुमच्या बोलण्याकडे ‘लहान मूल’ म्हणून दुर्लक्ष करणं शक्य नसतं. पण तुम्ही अजून पूर्ण मोठे झालेले नाही आहात, त्यामुळे तुम्ही जे बोलता ते मोठ्या माणसांसारखं गंभीरपणे पण घेता येत नाही. शिवाय तुम्ही जेव्हा आईला तिचं चुकलं असं सांगता त्यावेळी कदाचित तुम्हाला सगळं माहिती नसतं. आई काय वागली ते दिसतं, पण तसं का वागली ते कळत नाही. कारण तुम्ही अजून तेवढे मोठे झालेले नसता.
हेही वाचा…
आई-बाबा भावंडांमध्ये मोठ्यांनाच का रागवतात? लहानांना का नाही?
त्यामुळे तुम्ही सहज काहीतरी सांगायला जाता आणि मोठ्या माणसांना ते आगाऊपणाचं वाटतं. त्यामुळे करायचं काय? तर आपली बोलण्याची पद्धत कशी आहे याकडे लक्ष ठेवायचं. एकच गोष्ट आपण बऱ्याच पद्धतीने सांगू शकतो. त्यात जर आपण, “मला काय वाटतं सांगू का?” किंवा “कदाचित असं असेल” अशा पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं तर मोठी माणसं ते जास्त ऐकून घेऊ शकतात.
राहता राहिला तुझा दुसरा प्रश्न. मोठी माणसं कधीच चुकू शकत नाहीत का? तर असं नसतं. मोठी माणसं सुद्धा चुका करू शकतात. पण तरीही त्यात लहान मुलांनी, अगदी तुमच्या वयाच्या मुलांनासुद्धा बोलणं योग्य नसतं. कारण त्यांचं काय चुकलं आणि ते कसं सुधारायचं हे त्यांना जास्त चांगलं माहिती असतं.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


