
Image: i.pinimg
सुटी लागल्यावर जेवढी गंमत मित्रांसोबत बाहेर जावून खेळायला येते तितकीच मजा एकत्र बसून पिक्चर पाहातानाही येते. एरवी टीव्हीवर सिनेमे पाहाताना आई बाबा सारखे अभ्यास सोडून पिक्चर काय पाहताय? हे काय लहान मुलांचे चित्रपट आहे का, काहीही पाहायचं का? अशा कमेण्ट्स करुन आपल्या सिनेमा बघण्याचा मूडच घालवता. आणि मित्रांसोबत बाहेर खेळायलाच वेळ मिळत नाही तर मिळून चित्रपट कुठे बघणार? पण आता तर उन्हाळ्याची हक्काची सुटी लागली आहे. आपण आपल्याला जे हवं ते करु शकतो. खेळू शकतो, सिनेमा पाहू शकतो. फुल्ल टू टाइमपास करु शकतो. मित्र मैत्रिणींसोबत एकत्र पिक्चर पाहून धम्माल करता येईल यासाठी मी तुम्हाला तुम्ही कोणते चित्रपट /डाॅक्युमेण्ट्रीज पाहू शकता हे सांगणार आहे.मी आज ज्या चित्रपटाबद्दल सांगणार आहे तो चित्रपट म्हणजे चिल्लर पार्टी..लहान मुलांना अनेकदा गृहीत धरलं जातं. त्यांच्याकडे कोणी सीरियसली पाहातच नाही. मुलं काय नुसती दंगामस्ती करतात असाच मोठ्यांचा समज. पण हा समज आपल्या चिल्लर पार्टीने खोडून काढला आहे. त्यांनी असं काम केलं की मोठ्यांनाही त्यांच्या कामाला दाद द्यावी लागली. हा चित्रपट म्हणजे नुसती धम्माल आहे.
हेही वाचा!
मुंबईतील चंदन नगर सोसायटीत राहाणारी ही मुलं. त्यांची 8 मुलांची टीम आहे. प्रत्येकाचं काहीना काही वैशिष्ट्य. त्यावरुन त्यांना नावही पडलेलं. रामशंकर नावाचा मुलगा फास्ट बाउलिंग टाकतो म्हणून त्याचं नाव अक्रम. अर्जून अभ्यासात फारच हुशार. त्याला सर्व गोष्टींबद्दल खूपच ज्ञान, म्हणून त्याचं नाव एनसायक्लोपेडिया. प्रत्येकाच्या वैशिष्ट्यानुसार प्रत्येकाची टोपण नावं पडलेली. याच नावाने ती मुलं चंदन नगर सोसायटीत ओळखली जायची. आणि त्यांच्या संपूर्ण गॅंगला मात्र सोसायटीत चिल्लर पार्टी म्हणून ओळखलं जायचं.
ही मुलं क्रिकेट खेळायची. शेजारच्या क्रिकेट टीमशी त्यांची स्पर्धा असायची. शेजारच्या क्रिकेट टीमकडे असलेल्या कुत्र्यामुळे चिल्लर पार्टी कायम त्यांच्याशी हरायची. त्यामुळे चिल्लर पार्टीच्या मनात कुत्र्यांबद्दल द्वेष भावना निर्माण झाली. चंदन नगरमध्ये फटका नावाचा एक मुलगा गाड्या पुसण्यासाठी कामाला यायचा. त्याच्यासोबत त्याचा भिडू नावाचा कुत्राही यायचा. चिल्लर पार्टीला काहीही करुन फटका आणि भिडूला चंदननगर सोसायटीत येवू द्यायचं नसतं. ते खूप प्रयत्न करतात, युक्ता लढवतात. पण ते काही फटका आणि भिडूला सोसायटीच्या बाहेर काढू शकत नाही. हळूहळू चिल्लर पार्टीची फटका आणि भिडू सोबत मैत्री व्हायला लागते. शेजारच्या क्रिकेट टीमशी जिंकण्यासाठी फटका बाउलिंग करुन चिल्लर पार्टीची मदत करतो. त्यामुळे चिल्लर पार्टीलाही फटका आणि भिडू हवेहवेसे वाटू लागतात.

Image: filmibeat
सगळं छान सुरु असताना या चिल्लर पार्टीची गाठ असंवेदनशील अशा शशिकांत भिडे या राजकारणी व्यक्तीशी पडते. या पाॅलिटिशन व्यक्तीचा सेक्रेटरी फटकाला मारतो. हे पाहून भिडू त्या सेक्रेटरीवरच हल्ला करतो. याचा राग येवून शशिकांत भिडे रहिवाशी भागात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेतो. सोसायटीत वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना संपवलं जाईल असं फर्मान काढतो. अशा भटक्या कुत्र्यांना सोसायटीत वावरु द्यायचं असेल तर सोसायटीतील ५० टक्के सदस्यांची मान्यता एका महिन्यात मिळवावी लागेल असंही म्हणतो. शशिकांत भिडेंच्या या नोटिशीमुळे भिडूचा जीव धोक्यात येतो. चिल्लर पार्टीला काहीही करुन भिडूला वाचवायचं असतं. सोसायटीत राहू द्यायचं असतं. पण भिडे यांच्या नियमाप्रमाणे सोसायटीतील पन्नास टक्के म्हणजे चंदन नगर सोसायटीतील ३१ सदस्यांची मान्यता लागणार असते.

Image: blog.edqart.com
एका महिन्यात ३१ सदस्यांचा होकार कसा मिळवायचा हा प्रश्न चिल्लर पार्टीसमोर असतो. ते वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. पण कोणतीच युक्ती कामाला येत नाही हे बघितल्यावर त्यांचे प्रयत्न आणखी जोर धरतात. चिल्लर पार्टी भिडूला वाचवण्यासाठी चड्डी मार्च काढतात. यामुळे शहरातील सगळ्यांचं लक्ष चिल्लर पार्टीकडे जातं. चिल्लर पार्टीला आणि शशिकांत भिडे यांना न्यूज चॅनेल्सवाले मुलाखतीसाठी स्टुडिओतही बोलावतात. तिथे भिडे चिल्लर पार्टीला काहीबाही बोलून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न करतात. पण मुलं बधत नाही. ते लोकांपर्यंत त्यांना हवा तो मेसेज पोहोचवतात. लोकांमध्ये भिडूबद्दल सहानुभूती निर्माण करतात. दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी भिडूला सोसायटीतून घालवण्यासाठी त्याच्या मागे असतात. शेवटचा एकच दिवस उरलेला असतो आणि चिल्लर पार्टीकडे ३१ सदस्यांचा होकार नसतो. आता भिडू आपल्याला कधीही दिसणार नाही या विचाराने निराश होवून मुलं सोसायटीत परत येतात. भिडूसाठी या मुलांनी शशिकांत भिडे सारख्या राजकारणी माणसाशी पंगा घेतलेला असतो. चिल्लर पार्टी आपल्या मिशनमध्ये यशस्वी होते की नाही , चिल्लर पार्टीची धम्माल, भिडू आणि फटकासाठी यामुलांनी केलेले शर्थीचे प्रयत्न यासर्वांसाठी चिल्लर पार्टी हा चित्रपट पाहायलाच हवा.
२०११ साली प्रदर्शित झालेला चिल्लर पार्टी हा हिंदी सिनेमा आहे. तो दोन तासांचा आहे.
हा सिनेमा नेटफ्लिक्स, ॲमेझाॅन प्राइम व्हिडीओ, जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर पाहाण्यास उपलब्ध आहे. शिवाय यूट्यूबवरही https://www.youtube.com/watch?v=1bRa-FlMiJE या लिंकवर चिल्लर पार्टी हा सिनेमा पाहाता येईल.
चिल्लर पार्टी पाहिल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटला, तुम्हाला काय आवडलं यासोबत तुमचीही चिल्लर पार्टी असल्यास तुम्ही करत असलेली धम्माल, गंमतीजमती मलाही नक्की लिहून पाठवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact