चार वर्षानंतर फु बाओ जाणार आपल्या घरी. म्हणजे कुठे जाणार?

Image: news.cgtn

दक्षिण कोरियात एक अतिशय भावनिक सोहळा पार पडला. हा सोहळा होता निरोप देण्याचा. आपल्यासोबत राहणारी व्यक्ती जर कुठे दूर दुसरीकडे जाणार असेल आणि त्या व्यक्तीला निरोप द्यायचा असेल तर आपल्याला  खूप दु:ख होतं, रडू येतं. ती व्यक्ती आपल्यापासून दूर जावू नये असं वाटत राहातं. पण दक्षिण कोरियात एक महिन्यापूर्वी म्हणजे मार्च महिन्यात पार पडलेला हा निरोप समारंभ कोणा व्यक्तीसाठी नव्हता. तर तो होता एका प्राण्यासाठी. जायंट पांडाच्या शावकासाठी म्हणजेच पिल्लासाठी. फु बाओ हे तिचं नाव.

 हेही वाचा!

फु बाओ ही जायंट पांडा आहे. (काळ्या पांढऱ्या रंगाचं मोठं अस्वल). फु बाओचा अर्थ नशिबवान खजिना. फु बाओचा जन्म दक्षिण कोरियातील 'एव्हरलॅण्ड झू' या प्राणीसंग्रहालयात २०२०मध्ये झाला. २०१६ मध्ये १० वर्षांची ए बाओ आणि ११ वर्षाचे ले बाओ (हे फु बाओचे आई- बाबा)चीनमधून दक्षिण कोरियात आले होते. चीन आणि दक्षिण कोरिया या दोन देशातील मुत्सुद्देगिरीचा भाग म्हणून चीनमधील जायंट पांडाना दक्षिण कोरियात पाठवण्यात आलं होतं.

चीनमधील सरकार इतर देशांबरोबर 'पांडा डिप्लोमसी'चा वापर करतं. या मुत्सुद्देगिरीतला एक नियम म्हणजे इतर देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या जायंट पांडांना जेव्हा पिल्लं होतात आणि ती जेव्हा चार वर्षांची होतात तेव्हा त्यांना त्यांच्या मूळ देशात म्हणजे चीनमध्ये परत पाठवलं जातं. या नियमानुसारच फु बाओला चीनमध्ये परत पाठवलं जाणार होतं. करार, नियम एका बाजूला आणि प्रेम जिव्हाळा दुसऱ्या बाजूला. आपल्या चार वर्षांच्या वास्तव्यात फु बाओने दक्षिण कोरियातील लोकांना खूप प्रेम दिलं. लोकं खास फु बाओला भेटण्यासाठी एव्हरलॅण्ड झू मध्ये यायचे. तिला पाहून लोकं आपले दु:ख आपला त्रास विसरायचे. अनेकांना फु बाओ म्हणजे आपल्या आजारावरचं औषध वाटायची.

Image: kidsnews

Image: kidsnews

लहानांपासून मोठ्यांपर्यंत फु बाओवर प्रेम करणारी सर्व वयोगटातील माणसं होती. त्यामुळेच फु बाओ जेव्हा आपल्या देशात म्हणजे चीनमध्ये परत जाणार ही बातमी पसरली तेव्हा लोक अस्वस्थ झाले. दु:खी झाले.  फु बाओला चीनमध्ये पाठवण्याआधी एक महिना विलगीकरण कक्षात (क्वारन्टाइन) ठेवण्यात येणार होतं. त्यामुळे फु बाओ कोणालाच दिसणार नव्हती, कोणीच तिला भेटू शकणार नव्हतं.  म्हणूनच फु बाओला शेवटचं भेटण्यासाठी, तिला पाहण्यासाठी , ज्या फु बाओने आपल्याला चार वर्षं आनंद दिला त्याबद्दल तिचे आभार मानण्यासाठी हजारो लोकांनी एकच गर्दी केली होती.

मार्च महिन्यात ज्या दिवशी फु बाओला निरोप देण्यात येणार होता त्या दिवशी खूप पाऊस सुरु होता. भर पावसात लोकं छत्र्या घेवून फु बाओला बघण्यासाठी चार चार तास रांगेत उभे राहिले होते. ' तुला भेटणे हा एक चमत्कार होता. फु बाओ तुझे खूप आभार' असे संदेश गाड्यांवर रंगवले गेले होते. फु बाओच्या फोटोंनी गाड्या सजवण्यात आल्या होत्या. या सर्व कृतीतून लोकांनी फु बाओविषयीचं प्रेम व्यक्त केलं.

एक महिन्याचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर फु बाओ चीनमधील सिचुआन प्रांतात म्हणजे आपल्या मूळ गावी परत जाणार आहे. हा प्रांत म्हणजे जायंट पांडांचं मूळ घर. फु बाओचे आई बाबाही सिचुआन प्रातांतूनच दक्षिण कोरियाला गेले होते.  जुलै २०२३ मध्ये ए बाओ म्हणजे फु बाओच्या आईनं जुळ्या जायंट पांडांना जन्म दिला.  मादी जायंट पांडाला वर्षातून एकदाच गर्भधारणा होते. अनेकदा शावक (पिल्लं) वेळेआधीच जन्माला येतात. त्यांचं वजन २०० ग्रॅमपेक्षाही कमी असतं. असे शावक जिवंत राहण्याची शक्यताही खूप कमी असते. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact