घाबरलेल्या-गोंधळेल्या अळीचा ताबा मंटू घेतो तेव्हा…

 

image : freepik

“ती अळी अशी गवतात सोडून दिली तर ती मरून जाईल.” मंटू म्हणाला.

“मग आता काय तिला उचलून झाडावर ठेवायचं का?” मानसी म्हणाली.

“ईईईई…” शबानाला ती आयडियाच आवडली नाही. 

“काहीही काय?” असं कार्तिक म्हणत होता तेवढ्यात मंटू म्हणाला, “हो. दुसरं काय करणार?”

“अळी उचलून झाडावर ठेवायची? उचलून? हाताने?” कार्तिकला घाण वाटलेली त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आणि हे सगळं चालू असतांना गवतात अडकून पडलेली ती बिचारी छोटीशी अळी अपेक्षेने त्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होती. त्यांनी जर तिला उचलून ठेवलं नसतं, तर तिचं काही खरं नव्हतं. एक तर तिला ती कुठे आहे, जवळचं झाड कुठे आहे ते काहीच समजत नव्हतं. तिच्या आकाराच्या मानाने गवत खूपच उंच होतं. ती अळी जेमतेम इंचभर लांब असेल. आणि गवत मात्र एक वितापेक्षा जास्त म्हणजे आठ इंचांपेक्षा जास्त वाढलेलं होतं. समजा ती एखाद्या गवताच्या पात्यावर चढून वर उभी राहिली असती तर तिला झाड कुठे आहे ते एकवेळ दिसलंही असतं, पण त्या झाडापर्यंत जायचं कसं? आणि इथे गवतात बसून राहणं तर धोक्याचंच होतं. इथे इतकी मुलं खेळत होती, कोणाचाही पाय तिच्या डोक्यावर पडू शकला असता. आता काय करावं बरं? अळीने घाबरून स्वतःची गुंडाळी करून घेतली. तिला पण शबानाचा राग आला होता. मगाशी खायला बसतांना शबानाची पाठ एका छोट्या झाडाच्या फांदीला घासली होती आणि त्यामुळे त्या फांदीच्या टोकावर बेसावध बसलेली अळी शबानाच्या पाठीवर पडली होती. आणि आपण कुठे आलोय हे न समजल्यामुळे तिथेच बसून राहिली होती. आणि तिची काहीही चूक नसतांना तिला खाली पाडून वर ती सगळी मुलं तिच्याकडे बघून “ईईईईई” म्हणत होती. पण हा जो कोणी मंटू होता तो मुलगा मात्र चांगला असावा असं तिला वाटलं. तिचा प्रॉब्लेम काय आहे ते तरी त्याला समजलं होतं. पण आता तो काय करणार होता कोणास ठाऊक?

हेही वाचा!

अंगावर अळी पडते तेव्हा.. अळीविषयी प्रेम वाटतं की तिची किळस येते?

अळी एकटीच स्वतःशी विचार करत बसली होती. त्यामुळे बाकी मुलं काय बोलतायत याकडे तिचं लक्षच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिने जरा वर बघितलं तर तिच्या अगदी तोंडासमोर एक वाळकी काडी आली होती. 

image : dreamstime

“आता ही काडी कुठून आली?” अळीने विचार केला. ती काडी तिच्या डोळ्यांच्या इतकी जवळ होती की तिला त्या पलीकडचं काही दिसेना. मंटूने ती काडी जरा वेळ त्या अळीसमोर धरली. पण अळी काही केल्या ती काडी पकडेना. शेवटी मंटूने ती काडी टाकून दिली आणि त्या अळीला अलगद बोटांच्या चिमटीत उचलून दुसऱ्या हाताच्या तळहातावर ठेवलं. आणि म्हणाला, “अगं बधिर! दिलेली काडी तरी पकडायचीस ना.” अळीने तोंड वर करून हा मंटू कोण आहे ते नीट बघून घेतलं. तो होता छोटाच. १०-११ वर्षांचा असेल. पण तो अळीला अजिबात घाबरत नव्हता. त्याने अळी बसलेला हात डोळ्यांच्या जवळ नेला आणि म्हणाला, “अरे ही कसली क्यूट अळी आहे. तिच्या पाठीवर पण डिझाईन आहे.” 

“हो? मला कसं नाही दिसलं कधी?” असा मनात विचार करत अळीने स्वतःच्या पाठीकडे बघितलं. “खरंच की! आपल्या पाठीवर इतकं छान केशरी आणि काळं डिझाईन आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं!” मग तिने परत आजूबाजूच्या मुलांकडे बघितलं. आपल्या पाठीवर इतकं छान डिझाईन असतांना ही मुलं आपल्याकडे बघून इतकी वाकडीतिकडी तोंडं का करतायत तेही तिला कळेना. बरं, अगदी स्वच्छतेचा विचार करायचा झाला तरी अळी त्या सगळ्या मुलांपेक्षा पुष्कळच स्वच्छ होती. तिच्या फक्त पायांना थोडीशी माती लागलेली होती. आणि बाकी मुलं मात्र अक्षरशः घामाने, मातीने मळून कळकट्ट दिसत होती. मंटूने तिला हातावर उचलून घेतल्यानंतर ते सगळे चार पावलं लांब जाऊन उभे राहिले होते. आणि मंटूला चिडवत होते. पण त्याला त्याने काहीच फरक पडलेला नव्हता. तो आपलं अळीचं निरीक्षण करण्यात बिझी होता. “आता हा आपलं काय करणार आहे?” अळीला एकदम भीती वाटायला लागली. आणि ती चालत चालत निघाली मंटूच्या हातावरून टीशर्टकडे. त्याच्या खिशात आपल्याला लपून बसता येईल हे तिच्या लक्षात आलं होतं. पण मंटूने तिला मनगटापर्यंत पोचल्यावर पकडून परत तळहातावर ठेवली आणि तो त्याच्या मित्रमैत्रिणींना म्हणाला, “तुम्ही जा खेळायला. मी जरा या अळीला घरी सोडून येतो.”

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact