
“अरे मंटू… शबाना… कार्तिक… चला खायला!” मंटूची आई आता चौथ्यांदा त्यांना हाका मारत होती.
मंटूकडे त्याचे सगळे मित्र मैत्रिणी आले होते. आणि ते त्याच्या घरासमोरच्या बागेत खेळायला गेले होते. सगळ्यांना खरं म्हणजे सॉलिड भुका लागल्या होत्या. पण रंगात आलेली आबाधोबी सोडून खायला जायला कोणीच तयार होईना. शेवटी आईने मध्ये येऊन त्यांचा बॉल घेऊन टाकला आणि म्हणाली, “आता जर तुम्ही खायला आला नाहीत, तर मी एकेकाला बॉल मारीन आता.”
शेवटी ते सगळेजण मस्ती करत, आरडाओरडा करत आले आणि गोल करून बसले. आईने त्या सगळ्यांसाठी फ्रेंच फ्राईज आणले होते. मंटू आणि त्याचे मित्र मैत्रिणी बालवाडीत असल्यापासून दर रविवारी एकेकाच्या घरी असे दिवसभर खेळायला जायचे. आता चौथीत गेले तरी पण त्यांचं तेच रुटीन होतं. त्यातपण त्यांना मंटूच्या घरी खेळायला यायला फार आवडायचं. कारण त्याचा बंगला खूप मोठं होतं आणि त्याला चारही बाजूंनी अंगण होतं. तिथे लपाछपी खेळता यायची. शिवाय त्याचे आई-बाबा आणि आजी-आजोबा मस्ती केल्याबद्दल कधीच रागवायचे नाहीत. उलट तेच कधीकधी मुलांशी खेळायला यायचे. आणि दुपारनंतर मंटूची आई किंवा बाबा त्यांना बागेत घेऊन जायचे. तसे ते आजपण बागेत आले होते. खूप वेळ बागेत खेळून मस्ती करून झाल्यानंतर मंटूच्या आईने दिलेले फ्रेंच फ्राईज खाऊन झाल्यावर आई म्हणाली की “मी घरी जाते. आणि सगळं सामान ठेऊन परत येते.” आणि आई घरी गेली. परत खेळायला जाण्यासाठी ते सगळे तिथून उठले आणि कपडे झटकत परत जायला लागले तेवढ्यात कार्तिक म्हणाला,
“ईईई, शबानाच्या पाठीवर अळी आहे.”
झालं! शबानाने उठून आरडाओरडा करत उड्या मारायला सुरुवात केली. आणि तिच्या पाठीवरची अळी झटकायच्या ऐवजी सगळेजण त्या अळीचं वर्णन करून तिला अजून चिडवत होते.
“एकदम हिरवीगार आहे.”
“आणि ती चालतीये कशी बघ…”
“शी! तिला घाणेरडे केस पण आहेत वाटतं.”
“ती आता शबानाच्या केसात जाणार आहे.”
“अरे नाही… ती टी-शर्ट मध्ये जाणार आहे तिच्या.”
“अरे नुसते बडबड काय करताय? काढा ना ती अळी!” शबाना बिचारी रडकुंडीला आली होती. पण ती हिरवी अळी शांतपणे तिच्या पाठीवर बसून होती आणि काही केल्या खाली पडत नव्हती. आणि कोणीच त्या अळीला हात लावायला तयार नव्हतं. शेवटी राधिकाने एक लांब काडी आणली आणि त्या अळीच्या जवळ ती काडी नेली. आधी जरा वेळ तर त्या अळीने त्या काडीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण पाच सेकंदांनी ती अळी त्या काडीच्या अजून जवळ आली. तिने हळूच त्या काडीवर एक पाय ठेवला. मग दुसरा पाय ठेवला आणि मग एक-एक करत तिने तिचे ते सगळेच्या सगळे पाय काडीवर आणले आणि ती त्या काडीवर उभी राहिली. मग मानसीने ती काडीवरची अळी शबानाला दाखवली. त्यावर ती तोंड वाकडं करत म्हणाली, “शी. किती घाणेरडी अळी आहे… पण तू तिला अशी पकडून का बसलीयेस? टाकून दे ना खाली.”
तेवढ्यात त्या अळीने काडीवर परत चालायला सुरुवात केली. आता ती मानसीच्या हाताच्या जवळ जायला लागली. आता ती आपल्या हाताजवळ येईल म्हंटल्यावर मानसीने कसलाही विचार न करता हातातली काडी आणि त्यावरची अळी खालच्या गवतात टाकून दिली. आणि इतका वेळ काहीच न बोलणारा मंटू म्हणाला,
“अगं, अशी गवतात नको टाकू ती अळी.”
“का?????”
“तिच्यावर कोणाचा तरी पाय पडेल ना!”
“आधी ती गवतातच होती.” मानसी शिष्ठपणे म्हणाली.
“शक्यच नाही!” मंटू खाली बसून त्या अळीचं निरीक्षण करत म्हणाला. “ही अळी झाडाच्या पानावर असणार. आणि शबाना त्याला टेकून बसली तेव्हा तिच्या पाठीवर आली असणार.”
“ओके. मग?” मानसीने जरा चिडून विचारलं. इतर कोणी त्या अळीला हात लावायला तयार नसतांना तिने ती अळी शबानाच्या पाठीवरून काडीने काढली होती आणि आता हा मंटू तिला उगीच अक्कल शिकवत होता.
“मग काही नाही…” मंटू अजून पण त्या अळीचंच निरीक्षण करत होता. ती अळी अगदीच कन्फ्युज झाल्यासारखी जिथे सोडलं तिथेच बसून राहिली होती. इतका वेळ हे सगळं अळी-पुराण ऐकणारे त्याचे मित्र आता मात्र जरा वैतागले. “अरे ए मंटू! सोड ना ती अळी. चल खेळायला जाऊ.” कार्तिक म्हणाला.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


