
पक्षीराज्यामध्ये आकर्षक रंगांनी नटलेल्यांची काही कमी नाही, पण या सगळ्या रंगीबेरंगी भिडूंमध्ये नजरेत भरतो तो फ्लेमिंगो. गुलाबी- शेंदरी पंखांनी नटलेल्या या पक्ष्याला उडताना पाहिल्यावर त्याचे 'अग्निपंख' हे नाव सार्थ वाटते. त्याचे इंग्रजी नावही त्याच अर्थाने म्हणजे 'फ्लेम कलर्ड' म्हणून फ्लेमिंगो असे पडले आहे. जगभरात मिळून 'फोनिकोप्टेरिडे' कुळातील फ्लेमिंगोच्या सहा जाती आढळतात. भारतात यातील सर्वात मोठी म्हणजे 'ग्रेटर फ्लेमिंगो' आणि सर्वात लहान 'लेसर फ्लेमिंगो' पाहायला मिळते. वॅडर्स म्हणजे चिखल, पाणथळीतल्या गटात अग्निपंख पक्षी येतात. हिंदीमध्ये या पक्ष्याला 'राजहंस' असे म्हटले जाते.
ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो ओळखण्यासाठी त्यांच्या चोचीवरील काळ्या रंगाची मदत होते. ग्रेटर फ्लेमिंगो ही फ्लेमिंगोची सर्वात मोठी प्रजाती. ग्रेटर फ्लेमिंगो हे 5 फूट उंच असतात. त्यांचं वजन आठ पौंड असतं. तर लेसर फ्लेमिंगो ही फ्लेमिंगोची सर्वात लहान प्रजाती. लेसर फ्लेमिंगो हे 3 फूट उंच असतात आणि त्यांचं वजन तीन ते सहा पौंड असतं.
हेही वाचा
खारीपेक्षा तिप्पट असलेले शेकरु असते खादाड,भित्रं आणि लाजरंही!

Image : https://fineartamerica.com/
फ्लेमिंगो हे भटकणाऱ्या, स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मोडतात. भारतात फ्लेमिंगोंचा निवास गुजरातमधील कच्छच्या रणात असतो. या ठिकाणी वाळूचे उंचवटे तयार करुन त्यात ते आपली अंडी घालतात. पावसाळ्यानंतर इथले पाणी आटले की, फ्लेमिंगो गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये हिवाळी पाहुणे म्हणून वेगवेगळ्या सरोवरांमध्ये, खाड्यांमध्ये आलेले पाहायला मिळतात. खारट पाण्यात उगवणारे शेवाळे खाल्ल्यानंतर फ्लेमिंगोंच्या पंखांचा गुलाबी रंग अधिकच गडद होतो. फ्लेमिंगोच्या चोचीची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण असते. वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा मोठा असतो आणि चोच मध्यभागी वाकलेली असते. फ्लेमिंगो आपली लांबलचक मान खाली वाकवून चोच पाण्यात बुडवितो, तेव्हा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर येतो. मग या चोचीत पाण्यातला गाळ चिवडून भक्ष्य शोधताना, चोचीत पाणी, गाळ भरुन घेतला जातो. चोचीच्या कडेला असलेल्या कंगोऱ्यांमधून हा गाळ गाळून बाहेर फेकला जातो आणि अन्न पोटात जाते.
फ्लेमिंगो दरवर्षी फक्त एकच अंडं घालतात. समजा घातलेल्या अंड्याला अपघात झाला, अंड्याचं काही नुकसान झालं तरी ते दुसरं अंडं घालत नाही. अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येतं तेव्हा पिल्लू फ्लेमिंगोच्या अंगावर करड्या किंवा पांढऱ्या रंगाची मऊ पिसं असतात. ही पिसं त्यांना ऊब मिळण्यासाठी असतात. त्यांच्या पंखांचा रंग गुलाबी, नारिंगी आणि लाल होण्यासाठी तीन वर्षं लागतात.
फ्लेमिंगो हा बलवान पक्षी आहे. फ्लेमिंगोला पोहोता येत नाही, पण फ्लेमिंगो वेगानं उडू शकतो. त्याचा उडण्याचा सर्वोच्च वेग हा ३५ मैल प्रतितास आहे. उंच मान आणि लोंबकळणारे लांब पाय यामुळे उडताना हे पक्षी जरा बेढबच दिसतात. फ्लेमिंगो हे साधारणत: २० ते ३० वर्षं जगतात. पण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली, त्यांना योग्य अन्न मिळालं तर मात्र ५० वर्षं जगण्याचीही त्यांच्यात क्षमता असते. फ्लेमिंगोच्या सहा प्रजातींपैकी ॲंडीअन फ्लेमिंगो ही प्रजाती धोक्यात आली आहे. त्यांचे पंख, अंडे यासाठी मोठ्या प्रमाणावर शिकार होते आहे. भारतात महाराष्ट्रातील उजनी जलाशय, गुजरातमधील नल आणि थोल सरोवर, ओडिशातील चिल्का सरोवर येथे फ्लेमिंगो मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. ठाण्याच्या खाडीतही हजारोंच्या संख्येने येत असल्याने या खाडीचा काही परिसर आता फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून संरक्षित करण्यात आला आहे.
- मकरंद जोशी
( लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत)
makarandvj@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


