
मी आरशात बघितलं की आईला फार राग येतो. मग ती लगेच मला रागवायला सुरुवात करते.
'सारखं काय आहे आरशात?'
'गेलीस का पुन्हा आरशात बघायला?'
'जेवढा वेळ स्वतःचा चेहरा बघत असतेस तेवढा वेळ पुस्तक बघितलं असतं तर मार्क्स तरी मिळाले असते.'
अशी तक्रार सातवी आठवीतल्या खूप मुलामुलींची असते. त्यातही मुलींची जास्त! आपण जाता येता आरशात बघितलं तर आईला इतकं चिडायला काय झालं हेच त्यांना कळत नाही. आपण आरशात बघितल्याने इतर कोणाचंही नुकसान होत नाही. आपण काम टाळून आरशात बघत नाही. मग त्यात इतकं चिडण्यासारखं काय आहे हे त्या वयातल्या मुलामुलींना खरोखर समजत नाही.
हेही वाचा!
पण सारखं आरशात बघितल्याने खरंच काय होतं? तर तुमच्या मनात ‘आपण कसे दिसतोय?’ हा एकच प्रश्न सतत घोळत राहतो. असं होणं या वयात नैसर्गिक आहे. मात्र केवळ ‘दिसणं’ या गोष्टीसाठी इतका वेळ खर्च करणं नाही. या वयातल्या मुलांनी अभ्यास, खेळ, व्यायाम, इतर ऍक्टिव्हिटीज, कुटुंब, मित्रमैत्रिणी, नातेसंबंध, सकस अन्न यासारख्या अनेक गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे. या सगळ्या बाबी मिळून एखाद्याचं व्यक्तिमत्त्व ठरत असतं आणि विकसित होत असतं. मात्र आपण जेव्हा फक्त आपल्या दिसण्याकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण या बाकीच्या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करत असतो.
आपला सर्वांगीण विकास व्हावा आणि आपण फक्त शारीरिक सौंदर्याच्या आकर्षणात अडकून पडू नये यासाठी आईवडील आपल्याला सारखे सांगतात की, 'सारखं सारखं आरशात बघू नको.' आणि एका अर्थी त्यांचं म्हणणं बरोबरही असतं. दर दहा मिनिटांनी किंवा एक तासाने आपण वेगळे थोडीच दिसणार असतो? त्यामुळे आपल्याला आतून कितीही आरशात डोकावून बघण्याची इच्छा झाली तरी आपण थोडा प्रयत्न करून त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. थोडा वेळ स्वतःकडे बघणं ठीक आहे. पण त्यात फार वेळ जात असेल तर तो मात्र आपण कमी केला पाहिजे.

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact