
आई-बाबांच्या भांडणाचा मला त्रास होतो, माझ्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होतो, मी काय करु?
- आरोही, अकोले
घरातल्या वातावरणाचा लहान मुलांवर खूप परिणाम होतो. अनेकदा हे पालकांच्या लक्षातही येत नाही. आई बाबांच्यामध्ये सतत मुलांसमोर भांडण होत असेल तर मुलं घाबरतात, बुजतात. त्यांचं अभ्यासात, खेळात कशातच लक्ष लागत नाही. मुलांवर हे परिणाम तेवढ्यापुरतीच राहातात असं नाही तर मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वावरही त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे आई बाबांना त्याची जाणीव करुन देणे, या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी स्वत: प्रयत्न करणं या गोष्टी मुलांनी पुढाकार घेवून करणं आवश्यक आहे. आपण लहान आहोत, आपण काय करु शकतो? असा विचार करुन मुलं शांत राहिली तर हा प्रश्न सुटणार नाही, उलट तो गंभीरच होईल. पण आपली मुलं आपल्याला काहीतरी सांगू पाहाताय याची जाणीव झाल्यास पालक त्यांच्या वर्तनात बदल करण्याची शक्यताही मोठी असते. आई बाबांमधली भांडणं थांबवण्यासाठी मुलं पुढीलप्रमाणे कृती करु शकतात.
- आई बाबांच्या भांडणाचा आपल्याला त्रास होतो, त्याचा अभ्यासावर परिणाम होतो हे आई बाबांना अवश्य सांगायला हवं. ते भांडत असताना त्यांना हे सांगायची कदाचित भीती वाटत असेल तर त्यांचं भांडण मिटल्यावर हे त्यांना सांगायचा प्रयत्न करायला हवा. ते दोघेही आपलं मूल काय म्हणतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतील.
- समजा मुलांना हे आई बाबांना सांगता येत नसेल तर त्यासाठी कदाचित आजी आजोबांची मदत घेता येईल.
- आईबाबांच्या भांडणाचा परिणाम मुलांच्या मनावर आणि अभ्यासावर होणं साहजिक आहे, पण शक्य झालंच तर त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करावं. दुर्लक्ष करणं सोपं नाही पण प्रयत्न केल्यास हे नक्की जमेल.
- आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून घराजवळ राहत असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर अभ्यास करता येईल का? हे बघावं. मित्र-मैत्रिणींची कंपनी मिळाली तर घरातलं वातावरण विसरुन अभ्यासात लक्ष लागेल आणि अभ्यासही छान होईल. आईबाबांनाही 'मला अभ्यासात मदत करा' असं सांगून बघावं. आई बाबांमध्ये भांडण नसतं तेव्हा अभ्यास कसा छान होतो, ते भांडताना मनात काय सुरु असतं या गोष्टी आई बाबांपर्यंत अवश्य पोहोचवाव्यात, त्याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता असते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


