मुलामुलीची मैत्री असण्यात काय चूक? माझ्या मैत्रिणीवरुन मला का चिडवलं जातं?

Image: bing

राणी नावाची माझी एक मैत्रीण आहे, पण माझे मित्र तिला माझी ‘जीएफ’ असं चिडवतात. मला ते अजिबात आवडत नाही, मी काय करु?

- हे जीएफ आणि बीएफ असं चिडवणं पूर्वी कॉलेजच्या वयात गेल्यावर सुरु व्हायचं. आता ते शाळेतही सुरु झालं आहे. खरंतर मैत्री निखळ असते. त्यात मुलाने मुलीशी, मुलीने मुलाशी मैत्री करण्यात काहीच वावगं नसतं. पण वाढीच्या वयात मैत्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आणि मग चिडवाचिडवी सुरु होते.

- तुझे मित्र तुला चिडवतात आणि ते तुला आवडत नाही असं तू म्हणतोस त्यावरुनच तू समजुतदार मुलगा असणार हे नक्की. मुलांच्या चिडवण्याचं फार टेन्शन न घेता सरळ त्याकडे दुर्लक्ष करावं. हा सगळ्यात सोपा उपाय. यामुळे कोण काय म्हणतंय याचा आपल्याला त्रास होत नाही. त्याचा आपल्या कोणत्याही गोष्टीवर परिणाम होत नाही.

- त्यापुढची पायरी म्हणजे जे मित्र आपल्याला चिडवतात त्यांना समजावून सांगणे. जसे ते तुझे मित्र आहेत तशीच राणीही तुझी मैत्रीण आहे, हे त्या मित्रांना तूच समजावू शकतोस. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. मित्रांशी शांतपणे आणि समजूतदारपणे संवाद साधल्यास तुमच्यातली मैत्री अधिक घट्ट होईल. आपल्या चिडवण्यामुळे तुला त्रास होतोय, तू काय म्हणतोय हे समजून घ्यायला हवं ही जाणीव मित्रांमध्ये निर्माण होईल. यामुळे कदाचित तुझ्या इतर मित्रांचीही राणीशी मैत्री होईल. आणि तसं झालं तर ते तुला चिडवणं बंद करतील. समजा तसं नाही झालं तर मात्र पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करावं. त्यांना समजावण्याच्या फंदात पुन्हा पडू नकोस.

- मित्रांना काय वाटेल म्हणून राणीशी असलेली तुझी निखळ मैत्री तोडायला जाऊ नकोस. चांगले मित्र मैत्रिणी असणं ही छान गंमत असते. आपल्या मित्र मैत्रिणींकडून आपल्याला अनेक नव्या गोष्टी, छंद, पुस्तकं, खेळ कळतात. त्यातली गंमत शेअर करायला मित्र मैत्रिणी हवेतच. त्यामुळे राणीशी असलेली मैत्री टिकवताना तुझे मित्रही तुझ्याबरोबर राहतील याची काळजी घे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact