शेवटी एकदाची सुट्टी लागली! परीक्षा संपली, आता निकाल लागेपर्यंत काही टेन्शन नाही. झालं काय, आपण भेटलो तेव्हा परीक्षांचे दिवस होते. त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की इथे फक्त अभ्यास आणि परीक्षेबद्दल बोलतात की काय? पण तसं अजिबात नाहीये. आपण इथे खूप विषयांवर बोलणार आहोत. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत काय मजा करता येईल हेसुद्धा आपण बोलू इथे.
अर्थात, उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं याचं प्लॅनिंग केलं असेल तुम्ही सगळ्यांनीच. कुठल्या मैत्रिणीकडे राहायला जायचं, कुठल्या मित्राबरोबर कुठला पिक्चर बघायचा, गावाला कधी जायचं हे सगळं तर ठरलं असेलच. शिवाय आता सुट्टीत मी नुसती मजा करणार आहे हे पण आईबाबांना १० वेळा सांगून झालं असेल. पण मजा म्हणजे नेमकं काय?
संपूर्ण दिवस मोबाईलवर गेम खेळायचे? यूट्यूब बघायचं? रील्स बनवायचे?
हेही वाचा!
गोष्ट पायातून निसटलेल्या बुटाची आणि स्लिपर तुटलेल्या मुलाची
तर हे सगळं तुम्ही करालच. पण काही दिवसांनी हेही रोज करण्याचा कंटाळा येतो. ऊन फार असल्यामुळे बाहेर जाऊ देत नाहीत. मित्रमैत्रिणी भेटले तरी रोज काय खेळायचं किंवा काय करायचं हे सुचत नाही. मग आपण “आता मी काय करू?” अशी भुणभुण सुरु करतो. पण आईबाबा त्यांच्या कामात असतात. त्यांच्याकडेही आपल्याला द्यायला फार वेळ आणि फारशी उत्तरं नसतात. शिवाय “सगळी सुट्टी नुसती लोळत राहू नका. काहीतरी नवीन शिका.” हे ते सारखे सांगतातच. पण नेमकं काय करायचं ते काही सांगत नाहीत आणि मग बरीचशी सुट्टी नुसती कंटाळून भुणभुण करण्यात जाते.
असं फक्त तुमचं एकट्याचं होत नाही, तर बहुतेक सगळ्या मुलांचं असंच होतं. आणि म्हणूनच सुट्टीत रोज तुम्हाला इथे रोज काहीतरी नवीन वाचायला मिळेल. नवीन आयडिया मिळेल. ऍक्टिव्हिटी सुचतील. गोष्ट वाचता येईल. माहिती कळेल.
आता आपण रोज भेटत राहू. तुम्हीही मला ईमेल लिहा. तुम्हाला इथे अजून काय वाचायला आवडेल ते कळवा. तुम्ही सुट्टीत काय केलंत ते सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा इथे यायला सांगा. स्क्रीन कमी बघा असं आईबाबा सांगतात ते बरोबरच असतं. पण इथे येऊन तुम्ही काय बघता, काय वाचता ते आईबाबांनाही दाखवा. त्यांनाही ते आवडेल.
- तुमची ऊर्जा
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


