गोष्ट पायातून निसटलेल्या बुटाची आणि स्लिपर तुटलेल्या मुलाची

- शिल्पा दातार

image : google

आफ्रिका खंडात इजिप्त नावाचा प्राचीन देश आहे. या देशातल्या दोन मुलांची ही गोष्ट आहे.

या गोष्टीतला प्रसंग रेल्वे स्टेशनवर घडतो. यातला आपला एक दोस्त परिस्थितीने खूप गरीब असतो. इतका की, त्याच्या अंगावर फाटके कपडे असतात. त्यानं पायात घातलेल्या स्लिपर जीर्ण झालेल्या, फाटलेल्या असतात. त्यातच त्याच्या उजव्या पायातल्या स्लिपरचा बंद तुटतो. तो बंद बसवण्याचा तो मुलगा खूप प्रयत्न करतो, पण तो बसत नाही. ती स्लिपर घालून त्याला चालताच येत नाही. शेवटी तो खूप निराश होतो. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा बघून आपल्यालाही वाईट वाटतं? असं का व्हावं, त्याला आता दुसरी चप्पल कशी मिळेल, तो नवीन चप्पल घेऊ शकेल का, असं आपल्याला वाटत राहतं. दुसऱ्याबद्दल असं वाटणं हे आपलं मन चांगलं असल्याचं लक्षण असतं, बरं का!

 

हेही वाचा! 

घरासमोरच्या कचऱ्यावर आगळं वेगळं उत्तर शोधणाऱ्या मुलाची गोष्ट

एका पायातच चप्पल घालून कसं चालणार ना! म्हणून ती स्लिपर दुरुस्त करण्यासाठी तो एका दगडावर बसतो. स्लिपर दुरुस्त करण्याचा खटाटोप करत असतानाच त्याचं लक्ष काळ्याभोर नवीन चकचकीत बुटांकडं जातं. पांढऱ्याशुभ्र मोज्यांवर हे बूट त्याच्याच वयाच्या मुलाने घातलेले असतात. त्या मुलाला वाटतं, असे छान बूट आपल्याला कधी घालायला मिळतील का? तो दुसरा मुलगा म्हणजे आपला दुसरा छोटा मित्र आपल्या बाबांबरोबर तिथं आलेला असतो. तो आपले हे बूट खूपच जपत असतो. इतके की, चालून त्यावर जराशी धूळ बसली तरी तो टिश्यू पेपरने ती पुसत असतो. अगदी बाकावर बसल्यावर, चालता चालताही तो बुटावरची धूळ पुसतो. बूट नवे दिसायला पाहिजेत, त्यावर जराही धूळ नको, असं त्याला वाटत असतं.

तेवढ्यात एकच लगबग उडते. घंटा वाजते. रेल्वे येण्याची वेळ होते. सगळ्यांची पावलं रेल्वे प्लॅटफॉर्मकडं धावतात. त्या मुलाची आणि त्याच्या बाबांचीसुद्धा! स्लिपर तुटलेल्या मुलाचं संपूर्ण लक्ष त्या बूट घातलेल्या श्रीमंत मुलाकडं असतं. तो कुठं जात असेल, काय करत असेल, त्याचे हे बूट किती भारीतले असतील, असे सगळे प्रश्न त्याच्या मनात येत असतील.

image: google

तेवढ्यात रेल्वे थांबते. रेल्वेमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होते. त्या गर्दीतून वाट काढत रेल्वेमध्ये चढताना नेमका त्या मुलाच्या एका पायातला बूट निसटतो आणि प्लॅटफॉर्मवरच राहतो. अरे बापरे! आता काय करायचं! तो मुलगा रेल्वेच्या डब्यात आणि बूट खाली. आपला इतका आवडता बूट आता आपल्याला मिळणार नाही, याचं त्याला फार वाईट वाटतं. रेल्वे निघालेली असते.

image : google

योगायोग असा की, याच्याही एका पायात एक स्लिपर आणि त्याच्याही एका पायात एकच बूट! त्याचा खाली राहिलेला बूट पाहून प्रसंगावधान साधत तो गरीब मुलगा तो बूट उचलतो आणि त्या मुलाला देण्यासाठी रेल्वेच्या बरोबर जोरात पळायला लागतो. पुढं तो बूट त्या मुलाला परत मिळतो का? गरीब मुलाचं काय होतं? हे पाहण्यासाठी ‘द अदर पेअर’ ही लघुकथा पाहायलाच हवी. ही मुलं काहीही ओळख नसताना एकमेकांना कशी मदत करतात, चांगलं काम करतात, हे पाहण्यासारखं आहे. हा लघुपट महात्मा गांधीजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन तयार केला आहे. आपल्या गांधीजींचे विचार इजिप्त देशातल्या सारा रोजिक यांनी इतके छान मांडले आहेत की आपण पुन्हा पुन्हा हा लघुपट पाहतो. त्यातले दोन छोटे मित्र आपल्या लक्षात राहतात.

मग पाहणार ना, द अदर पेअर ही लघुकथा! भेटणार ना त्या दोन दोस्तांना! तुम्हालाही त्यांना भेटून नक्कीच आनंद होईल.

द अदर पेअर शॉर्ट फिल्म यूट्युबवर पाहायला मिळेल.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact