पेपर लिहिताना हात दुखतो.लिहायचं खूप असतं पण लिहिताच येत नाही!

– डाॅ. श्रुती पानसे

पेपर लिहिताना हात दुखतो अशी तक्रार अनेक मुलं करतात. याची कारणं काय आहेत ते आधी आपण समजून घेऊ. 

आपल्याला धड्यांमधलं  सर्व काही समजलेलं आहे मग लेखी अभ्यास कशाला करायचा, असा विचार करून बरेच जण तोंडी अभ्यास करतात. खरं म्हणजे तसा अभ्यास करायला काही हरकत नाही. कारण आकलन झालंय ना हा मुद्दा महत्त्वाचा असतो. 

पण जेव्हा परीक्षेचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र आपल्याला जे येत आहे ते नुसतं तोंडी सांगून उपयोगच नसतो, तर ते तुम्हाला लिहूनच शिक्षकांना सांगावं लागतं. लेखी परीक्षा हा आपल्या शिक्षण पद्धतीतला खूपच महत्त्वाचा भाग ठरलेला आहे आणि त्यामुळे त्याचा सराव करणं हे आवश्यक ठरतो.

तुम्हाला लेखी अभ्यास करण्याचा सराव नसेल तर अचानकच दोन तीन तास सलग पेपर लिहिणं  हे तुम्हाला अवघड वाटणारच. आपल्याला पेपरचा वेळ पुरतो ना, आपण सलग तीन तास सलग लिहू शकतो का? या सगळ्या गोष्टींच्यासाठी लेखी अभ्यासही तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्याचा सराव आवश्यक आहे. 

हेही वाचा!

काय केलं आणि काय नाही केलं तर परीक्षा चांगली पार पडेल?

 

जर तुमचे पेपर हे तुमच्या वर्गात न होता अन्य कोणत्या वर्गात होत असतील, विशेषतः मोठ्या इयत्तेच्या  वर्गामध्ये लहान इयत्तेतल्या मुलांना बसवायचं असेल किंवा लहान इयत्तेतल्या वर्गांवर मोठ्या इयत्तेच्या मुलांना परीक्षेला बसवायचं असेल,  तुम्ही जर अशा वेगळ्या वर्गांमध्ये बसत असाल तर ते बाक तुमच्या उंचीपेक्षा खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात. जर तसं असेल तर  बैठक व्यवस्थित नसल्यामुळे मान अवघडणं, हात दुखणं, पाय लोंबकळत राहणं किंवा खूप वेळ पाय पुढे करून ठेवणं, अशा  काही समस्यांना सामोरे जावं लागेल. तसं असेल तर ते शिक्षकांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. 

पेपर लिहीत असताना जर तुमचं फक्त मनगट बाकावर राहत असेल आणि कोपर  अधांतरी राहत असेल तर थोड्यावेळाने कोपर अवघडतं . त्याचा ताण हातावर पडून हात दुखायला लागतो.  दोन ते तीन तास सलग लिहायचं असतं तेव्हा केवळ मनगट बाकावर ठेवणं पुरेसं नाही तर कोपरापर्यंत – तळहातापासून कोपरापर्यंतचा संपूर्ण भाग  हा बाकावर ठेवता आला पाहिजे.  म्हणजे हात दुखणार नाही. अक्षर ही चांगलं येईल. 

( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact