काय केलं आणि काय नाही केलं तर परीक्षा चांगली पार पडेल?

– डाॅ. श्रुती पानसे

जर आपला अभ्यास वर्षभर अगदी छान झाला असेल तर वार्षिक परीक्षा अगदी सहज जायला हवी. वार्षिक परीक्षा आहे म्हणून जास्त ताण घेणं, एका जागी बसून जास्त अभ्यास करणं, असं काही जण करतात. पण ते करायची गरज नाही. नेहमीच्या रूटीनमध्ये खूप जास्त बदल न करता छान परीक्षा देता आली पाहिजे. 

हेही वाचा!

रात्री जागरण करायचं नाही. रात्री जागरण झालेलं असेल तर दुसऱ्या दिवशी मेंदू नीट काम करत नाही. झोप येत राहते. पूर्ण झोप घेणं हे अतिशय आवश्यक आहे.

जेवणाच्या वेळा पाळायला हव्यात. नेहमीपेक्षा जास्त आहार किंवा अजिबात खायचे नाही हे दोन्ही टाळलं पाहिजे. यांचा तब्येतीवर परिणाम होतो.

टेंशन घेतल्यामुळे अस्वस्थ वाटतं. माझा अभ्यास झाला नाही, मला काही आठवत नाही असं सारखं सारखं म्हटल्यामुळे खरंच काही आठवेनासं होतं. त्यापेक्षा आत्ता वेळ आहे तो अभ्यास करण्यात सत्कारणी लावा. टेंशन घेतल्यामुळे अस्वस्थता वाढली तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याची शक्यता असते.

वार्षिक परीक्षेच्या काळात थंडी सुरू होऊन उन्हाळा वाढायला लागलेला असतो. त्यामुळे वातावरणात बदल होत असतात. आता तर या काळात कुठे कुठे पाऊसही पडतो आहे. हे वातावरण तब्येत बिघडवणारं आहे. हे लक्षात घेऊन आपली काळजी स्वत:च घ्यायला पाहिजे.

कितीही इच्छा झाली तर थंडगार पदार्थांपासून खूप दूर राहणं आवश्यक.

आपलं टेन्शन घरच्या माणसांवर काढून चिडचिड करायची नाही.

शांत राहिलं तर आपलं लक्ष अभ्यासावर राहील. त्याचा परिणाम निकालावर दिसून येईल.

आत्ता नव्याने काही शिकण्यापेक्षा उजळणीवर भर द्या.

आपल्याला जे समजलं ते लिहून काढण्याचा फायदा होईल. पण सर्व गोष्टी लिहून काढू नका. कारण तेवढा वेळ आता हाताशी नाही.

अधूनमधून ब्रेक घ्याल तेव्हा चालणं, फिरणं, खेळणं, सायकल चालवणं, दोरीच्या उड्या मारणं असं काही करा. म्हणजे मेंदूला ऑक्सीजन मिळेल.

एक पेपर झाला की तो सोपा गेलेला असू दे किंवा अवघड; त्या विषयाचा विचार तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशीचा विषय मनात घोळवा. म्हणजे प्रत्येक पेपर नव्या दमाने सोडवता येईल.

( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact