हाय, मी रुचिरा.. आता आपण भेटूया, दर रविवारी ! इथेच !

मनाचा मित्र

- रुचिरा दर्डा, संस्थापक, पेरेंट विथ पर्पज

प्रिय मुलांनो, कुणालाच विचारता येत नाहीत, कुणीच त्याबद्दल बोलत नाही असे तुमच्या मनातले प्रश्न, तुमची ‘सिक्रेट्स’ तुम्ही ‘ऊर्जा’कडे पाठवता आहात. थँक यू ! असे प्रश्न विचारायलासुद्धा डेअरिंग लागतं, हो ना? - मला माहितीये ते ! आपल्याला ज्याचा त्रास होतो अशी कुठलीही गोष्ट मनातच ठेवण्यापेक्षा त्याबद्दल मोकळेपणाने बोलणं, माहिती मिळवणं, आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे खूप महत्त्वाचं असतं. खूप मुलांनी पाठवलेले खूप प्रश्न मी वाचले आणि खरं सांगू, ते वाचताना मला समजलं, की आम्ही मोठी माणसं तुम्हा मुलांना किती गृहीत धरतो, तुमच्या मनात काय चालू आहे, तुम्हाला कशाची भीती वाटते, कसला त्रास होतो, हे अनेकदा आम्हाला कळतच नाही. अनेक आईबाबा, शिक्षक इतके घाईत असतात की थोडा वेळ थांबून तुम्हा मुलांना जवळ घ्यायला, तुमच्याशी गप्पा मारायला त्यांच्याकडे वेळच नसतो.आपण आपल्या आईबाबांवर रागावूया नको. त्यांना समजून घ्यायला मीच तुम्हाला मदत करीन; कारण आजपासून मीच तुमच्या ‘सिक्रेट’ प्रश्नांची उत्तरं देणार आहे.

 

 हेही वाचा!

आई बाबा पाहतात ती 'एमिली इन पॅरिस' मलाही पाहायचीये.. पण आई बाबा नाही का म्हणतात?

आता मी कोण? - तर माझं नाव रुचिरा दर्डा. तुमच्याच वयाच्या दोन मुलांची मी आई आहे. डॉक्टर-इंजिनिअर किंवा पायलट किंवा शिक्षक व्हायचं तर शिकावं लागतं ना?- तशी मी ‘आई’ झाल्यावर शिकले. म्हणजे काय?- तर मुलं आणि त्यांचे आईबाबा यांच्यात दोस्ती कशी होऊ शकते, त्यासाठी आईबाबांनी काय करायला हवं याचं शिक्षण मी घेतलंय. त्यासाठी काउन्सिलिंग, ट्रेनिंग, ट्रान्झेक्शनल ॲनालिसिस, सेक्स एज्युकेशन असे खूप शब्द आहेत. मी ‘लोकमत टाइम्स’मध्ये गेली दहा वर्षं लिहिते आणि तुमचे ताईदादा, आईबाबा अशा मोठ्या माणसांसाठी कार्यशाळा घेते. मी ‘माइंडफुलनेस’चा अभ्यासही करते आहे. हा शब्द तुमच्यासाठी जरा किचकट आहे, पण बोलू आपण त्याबद्दल केव्हातरी ! थोडक्यात काय, तर मी काही बोलण्याच्या किंवा सांगण्याच्या आधी ‘चांगलं’ ऐकून कसं घ्यायचं हे नीट अभ्यास करून शिकले आहे.. तुमचा हाच तर प्रॉब्लेम असतो ना, की मोठी माणसं फक्त ‘सांगतात’ आमचं ‘ऐकत’च नाहीत.. पण मी तसं करणार नाही, प्रॉमिस!
आपण सगळ्यांनी आनंदाने जगायला हवं, तुमच्यासारख्या मुलांच्या मनावर काळजीचं ओझं असता कामा नये, असं मला वाटतं. मी त्यासाठी तुम्हाला मदत करीन.. कशी? - तर या कॉलममध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन !
एकदा का आपण गप्पा मारायला लागलो, की तुमच्या मनातल्या शंका आणि प्रश्न तुमच्या आईबाबांना विचारायचं धाडसही तुमच्यात येईल, ते खरं महत्त्वाचं आहे कारण आपले आईबाबा आपले खरे मित्र असतात. चला, पुन्हा भेटूया पुढल्या रविवारी ! पहिला प्रश्न कोण विचारतंय बरं..?

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाही पण मनातून खूप भीती वाटतेय असं काहीतरी मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणींना सांगायला कसंतरीच वाटतं ; असं जे जे सिक्रेट तुमच्या मनात दडवलेलं असेल ते सगळं 'ऊर्जा'च्या कानात सांगा. तुम्ही काहीही, कोणताही प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सिक्रेट ठेवून त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया.

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact