मी आठवीत आहे, आणि तरीही मी इन्स्टावर आहे. तर त्यात बिघडलं काय? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडता येतं आणि ते नीट ऑपरेट करता येतं. मला माझ्या आईबाबांपेक्षा ते जास्त चांगलं वापरता येतं. अगदी खरं सांगायचं तर त्यांना मुळात इन्स्टा वापरताच येत नाही. ते उगाच फॅशन म्हणून तिथे आहेत. आणि मी मात्र तिथे अकाऊंट उघडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण का?
इन्स्टावर नसणं म्हणजे काय हे तरी माहितीये का त्यांना? माझ्या वर्गातल्या जवळजवळ सगळ्यांचं इन्स्टा अकाऊंट आहे. सगळे त्यावर फोटोज आणि रील्स शेअर करत असतात. सगळे एकमेकांना फॉलो करत असतात. त्यामुळे ते शाळेत किंवा क्लासला आल्यावर जे बोलतात ते त्यांना माहिती असतं. आणि जर का माझं तिथे अकाऊंट नसेल, तर त्यांचं काय चाललंय ते मला कसं कळेल?
हेही वाचा!
इन्स्टावर अकाउंट उघडलंय,पण काय काळजी घ्यायची माहिती आहे का?

तुम्हाला खरं सांगू का? आमच्या वर्गातली काही मुलं इन्स्टावर नाहीयेत. आणि आम्ही काय बोलतो ते त्यांना काहीही कळत नाही. ती नुसती बावळट चेहेरा करून आमच्याकडे बघत असतात. आणि ती आम्हाला खरंच बावळट वाटतात. सिरियसली! त्यांना रील्स माहिती नसतात, हॅशटॅग माहिती नसतात, ट्रेंड्स माहिती नसतात… आम्ही त्या मुलांना हसतोच. त्यामुळे मला हे माहितीये की मी जर इन्स्टावर नसेन तर मलाही इतर मुलं हसतील.
पण आईबाबा म्हणतात की इतक्यात कशाला तुला अकाऊंट पाहिजे? मला न त्यांचं काही कळतच नाही. माझा युजर आयडी आणि पासवर्ड त्यांच्याकडे आहे. ते मला असेही फॉलो करतात. त्यामुळे मी तिथे काय करतो हे त्यांना माहिती असतं. तरी नको म्हणतात. आणि त्याहून भारी काय आहे माहितीये? परवा ते मला म्हणत होते की इन्स्टाग्रामवर असतं तरी काय? तुला पाहिजे तर फेसबुकवर अकाऊंट उघडून देतो.
मी त्यांना इतका हसलो माहितीये. फेसबुकवर??? सिरियसली? फेसबुकवर कोण असतं? तर काका काकू आणि आजीआजोबा लोक असतात तिथे. तिथे मी जाऊन काय करू? मी शेवटी विचारलं आईबाबांना, की तुमच्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये एकतरी आठवीतला मुलगा किंवा मुलगी आहे का? मग आधी गप्प बसले आणि मग आपापसात काहीतरी चर्चा करत होते की कशी आम्ही मुलं काही वाचत नाही वगैरे वगैरे…
बरं त्यांना फोटो अपलोड करायला पण प्रॉब्लेम असतो. रील्स एवढी छोटी असतात त्याबद्दलपण त्यांना प्रॉब्लेम असतो. त्यातपण ते जर का म्हणाले की आपले पर्सनल फोटो अपलोड करतांना विचार करा. तर ते मला ओक्के वाटतं. त्यांना काळजी वाटते. आम्हाला शाळेतपण एकदा सांगितलं होतं की इन्स्टावर लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात. त्यासाठी काय काळजी घ्यावी तेही शिकवलं होतं. ते शिकवा आम्हाला. आम्ही ऐकू. पण इन्स्टावर जायचंच नाही असं तुम्ही सांगायला लागलात तर अवघडच आहे ना!
- शुभम
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


