इन्स्टावर अकाउंट उघडलंय,पण काय काळजी घ्यायची माहिती आहे का?

मुक्ता चैतन्य

हाय शुभम!

तू आठवीत आहेस आणि तरीही इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं आहेस याचा अर्थ तू १३ वर्ष पूर्ण आहेस असं मी गृहीत धरते. कारण इन्स्टाग्रामवर १३ वर्षांपेक्षा लहान मुलांना अकाऊंट उघडणं अलाऊडच नाहीये. त्यामुळे तू खोटी जन्मतारीख टाकून अकाऊंट उघडलं नसशील असं मी समजते. कारण तसं करणं तर अगदीच चुकीचं आहे.

शिवाय एका गोष्टीबद्दल तुला शाब्बासकी दिली पाहिजे, कारण तू तुझ्या आईबाबांना सांगून अकाऊंट उघडलं आहेस. ती गोष्ट खूप महत्वाची आहे. तुला सोशल मीडियावर जाऊ नको म्हणत असले तरी त्यांनी तुला अकाऊंट उघडू दिलं आहे, हेही आपण लक्षात घेऊया. पण तू १३ वर्ष पूर्ण असतांनाही ते सतत तू सारखं सोशल मीडियावर जाऊ नकोस असं म्हणतात त्यामागे काही कारणं आहेत. १३ वर्षांची मुलं धड लहान नसतात आणि धड मोठी नसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर काही संकटांमध्ये सापडू शकतात आणि त्याची आईबाबांना काळजी वाटते. त्यामुळे सोशल मीडियावर जातांना काळजी घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा!

सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी?

तुम्ही जो लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट फोन, टॅब वापरत असाल ती सिस्टीम सिक्युअर आहे ना, हे पालकांना विचारून घ्या. नसेल तर सिस्टीम सिक्युअर करा.

शंका उपस्थित करणाऱ्या मेल्स, मेसेजेस अजिबात उघडू नका. त्यावर क्लिक करू नका. नेहमीपेक्षा वेगळं काही असेल तर त्याबद्दल पालकांना सांगा.

सोशल मिडिया, ई-मेल पासवर्ड सातत्याने बदलत राहा.

कुठल्याही सोशल मीडियावर वावरतांना तुमचं अकाऊंट कायम प्रायव्हेट ठेवा. तुम्ही सेटिंग पब्लिक ठेवलं तर तुमच्याशी अक्षरशः कोणीही बोलू शकतं. ही माणसं अनोळखी असतात. आणि त्यात अनेक माणसं वाईट असू शकतात.

कंटाळा आला की ऑनलाइन जाण्याची अनेक मुलांना सवय असते. या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. कंटाळा आला तर करण्यासारख्या इतरही अनेक गोष्टी आहेत. ऑनलाइन जाणं नियमित असण्याची गरज नाही.

तुम्ही काढलेले सेल्फी कुठेही अपलोड करण्याआधी एकदा आई-बाबांशी बोला. त्यांना सांगून अपलोड करण्यात काहीही कमीपणा नसतो. उलट तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही अपलोड करत असाल तर ते तुम्हाला सावध करू शकतात.

डिजिटल मीडियाचा सतत वापर केला तरीही आपलं शरीर आजारी पडू शकतं. रात्री अंधारात मोबाईल वापरला की डोळ्यांच्या आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात. सतत मोबाईलमध्ये घुसून बसलं की पाठीच्या आणि बोटांच्या हालचालींच्या समस्या उद्भवू शकतात, मान दुखायला लागते. डिजिटल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक इमोशनल प्रॉब्लेम्स तर होतातच, पण शारीरिक त्रासही सुरू होतात. ते आपण स्वत:ला का चिकटवून घ्यायचे ?  त्यामुळे सगळी डिजिटल गॅजेट्स वापरायची, पण थोडा वेळच आणि योग्य ती काळजी घेऊनच.

तुम्हाला नीट झोप लागत नाहीये, डोळे चुरचुरायला लागलेत, पाठ, मान दुखतेय असं वाटलं तर सरळ हातातलं गॅजेट ठेवून द्यायचं आणि आई-बाबांना सांगायचं. म्हणजे त्यावर आवश्यक उपाय, व्यायाम ते तुम्हाला सांगू शकतील. सो, सुट्टीत शाळा नाहीये, क्लासेस नाहीयेत, ऊन खूप आहे, पाऊस आहे, पण म्हणून सदासर्वदा गॅजेट्समध्ये डोकं घालून बसू नका.

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

mukta.seekhlo@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact