
सगळ्यांनाच आता परीक्षेचे वेध लागले असणार, हो ना? या दिवसात अभ्यास तर छान करायलाच हवा पण त्याच्या जोडीला आपला आहार, झोप आणि थोडी फार शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे.
अभ्यास तुम्ही करणारच आहात, बाकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं. तर पुढल्या गोष्टी नीट लक्षात असू द्या-
हेही वाचा!
'सेफ्टी फर्स्ट' साठी आधी संकटाचा विचार करा! तो कसा करायचा?
१. सध्या उन्हाच्या झळा खूप वाढल्या आहेत. त्यामुळे घरचा पौष्टिक आहार भाजी पोळी, वरण भात, फळं, रात्री भिजवलेले बदाम, मनुका आणि अक्रोड खा.
२. घरच्या दह्याचं ताक/मठ्ठा/लस्सी पण अधूनमधून प्या. दुपारी लिंबू पाणी, नारळपाणी आणि कमीतकमी दोन अडीच लिटर पाणीही प्यायला हवं.
३. हॉटेलमधून मागवलेलं, फास्ट फूड, चिप्स, फ्राईज, पिझ्झा, बर्गर, मोमोजना थोडे दिवस सुट्टी द्या. हे सगळं खाऊन डोकं दुखलं, पित्त झालं तर अभ्यास नीट होणार नाही आणि मग परीक्षेचं जास्त टेन्शन येईल.
४. नाश्ता हे दिवसातलं पहिलं खाणं, ते नीटच हवं. नुसतं दूध किंवा चहा कॉफी पिऊन परीक्षेला जायचं नाही. परीक्षाच काय, अभ्यासालाही बसायचं नाही. पोहे, उपमा, इडली, घावन, एखादं फळ किंवा भिजवलेले बदाम असं पौष्टिक खाणं खाऊनच पेपरला जायचं.
५. अभ्यास करायला मेंदूलाही भरपूर एनर्जी लागते, त्यामुळे रिकाम्या पोटी अभ्यासालाही बसायचं नाही.

६. झोपेच्या बाबतीतही हेच लक्षात ठेवायचं. तुमचा पेपर किती वाजता आहे ते बघून परीक्षेच्या आधी तुम्ही आपलं झोपण्याचं रूटीन ठरवा. सकाळी आठ वाजता पेपर असेल तर रात्री १० किंवा ११ वाजता तुम्ही झोपायला हवं. त्याआधी अर्धातास अभ्यास, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप सगळं बंद करायचं.
७. झोपायच्या आधी तीन तास तरी तुम्ही रात्रीचं जेवण संपवायला हवं. झोपायला गेल्यावर पाच दहा मिनिटं डोळे बंद करुन शांत बसा. श्वासाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला शांत वाटेल आणि छान झोप लागेल.
८ सलग अभ्यास केला की कंटाळा येतो ना? मग अधूनमधून ब्रेकही हवाच. ४५/५० मिनिटं अभ्यास केला की ५/१० मिनिटांचा ब्रेक घ्या. थोडं चाला. खिडकीबाहेर एखादं लांबचं झाड किंवा इमारत बघा, म्हणजे अभ्यास करताना ताणले गेलेले डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतील.
९. स्ट्रेचेिंगचा व्यायाम, योगासनंही नियमित करा. म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही आणि परीक्षाही मस्त जाईल...
१० . थोडक्यात काय, तर हेल्दी राहा आणि मस्त पेपर सोडवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


