लाइफ स्किल्स
- गौरी पटवर्धन
मुक्त पत्रकार

लाइफ स्किल्स किंवा जीवनकौशल्य यातली एक सॉलिड महत्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट म्हणजे काय, तर कुठल्याही संकटात सापडण्याच्या आधीच त्या संकटाचा विचार करणं. तो का करायचा? तर आपल्याला जेव्हा आधीच लक्षात येतं, तेव्हा आपण त्या संकटात सापडत नाही. मला माहितीये, हे वाचून बरेच जण म्हणतील, की आम्ही फक्त शाळेत आणि खेळायला जातो. आम्ही काय सैनिक, पोलीस किंवा गुप्तहेर आहोत का? आमच्यावर कसलं संकट येणार आहे?
तर… पोलिसांवर येणारी संकटं वेगळी असतात आणि लहान मुलांवर येणारी संकटं वेगळी असतात. जरा विचार केलात, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठे कुठे संकटात सापडू शकता? कुठे कुठे अपघात होऊ शकतात? त्यातले कुठले अपघात किंवा प्रसंग तुम्ही सहज टाळू शकता?
हेही वाचा!
...तर, इथे धोका आहे!
१. तुम्ही मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर खेळायला जाता. तिथे तुमचा बॉल किंवा पतंग किंवा इतर काहीतरी वस्तू कुठेतरी उंचावर जाऊन अडकते. ती काढायला तुमच्यातला एखादा / एखादी शूरवीर मुलगी वर चढते, तिथून पतंग सोडवते. पण एखाद्या अडचणीच्या ठिकाणी वर चढताना इथून आपण परत खाली कसे उतरणार याचा विचार तुम्ही करता का?
२. एखाद्या ठिकाणी विजेची मोकळी वायर रस्त्यात जातांना दिसते. तिच्यात करंट आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं. अशा वेळी निदान आपण त्या वायरच्या जवळ अजिबात जाऊ नये. किंवा तिकडूनच जावं लागणार असेल तर निदान पायात रबरी चपला किंवा बूट घालावेत आणि रबर हे विद्युतरोधक असतं हे तुमच्या मनात येतं का?
३. शाळा सुटल्यावर अर्धवट अंधाराच्या वेळी तुम्ही एकटे रस्त्यावरून जात असाल, त्या रस्त्यावर इतर कोणीही माणूस किंवा रहदारी नसेल आणि त्या रस्त्यावर एक गाडी उभी असेल, तर आपण त्या गाडीच्या जवळ जायचं नाही. कारण कदाचित त्या गाडीतून आपल्याला किडनॅप करणारी माणसं आलेली असू शकतात हे तुमच्या लक्षात येतं का?
४. एखाद्या हॉलमध्ये लग्न किंवा इतर कार्यक्रमासाठी गेलात तर तिथून बाहेर पडायचे रस्ते तुम्ही बघून ठेवता का? कुठल्याही कारणाने तिथे जर का लोकांची धावपळ झाली तर आपण बाहेर कसं पडणार याचा विचार तुमच्या मनात येतो का?
५. घरात शिरतांना गॅसचा वास आला तर घरात जायचं का नाही जायचं? हे तुम्हाला माहिती असतं का?
या आणि यासारख्या सगळ्या गोष्टींचा विचार आपोआप करता येणं म्हणजे सेफ्टी फर्स्ट. आता या अडचणी सगळ्यांना रोज येतात का? किंवा सगळ्यांना कधी ना कधी येतातच का? तर नाही. पण जर का या अडचणी तुम्हाला कधी आल्या, तर त्या तुमचं खूप नुकसान करू शकतात, म्हणून हा विचार करायला शिकणं फार फार महत्वाचं आहे.
- गौरी पटवर्धन
मुक्त पत्रकार
patwardhan.gauri@gmail.com


