अभ्यासाची रिव्हिजन तुम्ही कशी करता? वाचता लिहिता की नजर फिरवता?

Image: freepik

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी पेपर चांगले लिहिणे गरजेचे असते. पण पेपर तेव्हाच चांगले लिहिता येतात जेव्हा परीक्षेसाठीचा अभ्यास चांगला झालेला असतो. परीक्षेसाठीचा अभ्यास करणं म्हणजेच रिव्हिजन करणं. परीक्षेच्याआधी वर्षभर किंवा त्या त्या सत्रात शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी केली जाते. ही उजळणी तुम्ही कशी करता यावर तुम्हाला पेपर किती चांगला लिहिता येईल हे अवलंबून असतं. यासाठी रिव्हिजन करण्याची परिणामकारक आणि स्मार्ट पध्दत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे

रिव्हिजन कशी करणार?

दुसऱ्या दिवशी कोणता पेपर आहे त्यानुसार आपण त्या त्या विषयाची उजळणी करत असतो. आपल्याला त्या विषयाचे किती धड्यांचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक धड्याच्या रिव्हिजनला किती वेळ लागेल याचा अंदाज घेवून रिव्हिजनला बसण्याआधी एक वेळापत्रक ठरवायचं. ते ठरवताना आपल्याला त्यातलं काय सोपं जातंय काय अवघड जातंय हे बघून त्यानुसार कोणत्या टाॅपिकला किती वेळ द्यावा लागेल हे ठरवावे. अशा प्रकारे ज्या धड्यांची उजळणी (रिव्हिजन) करायची आहे त्याचं योग्य नियोजन केल्यास त्या त्या विषयाचा परीक्षेला जो अभ्यासक्रम आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीची नीट उजळणी होते.

उजळणी करताना केवळ पुस्तक वाचणे/ नोटस वाचणे अशी पध्दत अवलंबली तर त्याचा कंटाळा येतो. आणि धड्यातल्या अवघड, क्लिष्ट गोष्टी नीट लक्षातही राहात नाही. त्यामुळे आपण रिव्हिजन करत असलो तरी जो भाग किचकट आहे त्याची उजळणी करुन झाल्यावर तो मुद्दा आपल्या शब्दात लिहून पाहावा. उजळणी करताना वही पेन हाताशी असू द्यावं. जे अवघड आहे ते स्वत:च्या मनाने लिहून बघितलं की त्या अवघड मुद्द्याबाबतचा आपला आत्मविश्वास वाढतो. शिवाय रिव्हिजन करताना आपल्याला जे समजलं आहे ते आपण मित्रांना समजावून सांगतोय, त्यांना शिकवतोय या शैलीत मुद्द्यांची रिव्हिजन केली तर केलेला अभ्यास चांगला लक्षात राहातो.

उजळणी करताना आपल्याला किती येतं याचा अंदाज घेण्यासाठी सराव प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवून पाहायला हवेत. हे प्रश्न वेळ लावून सोडवायला हवेत.

 हेही वाचा!

आता अभ्यासाच्या संदर्भातले ऑनलाइन व्हिडीओही उपलब्ध असतात. विषयातला जो भाग आपल्याला अवघड वाटतो आहे त्याचे यूट्यूबवर व्हिडीओ पाहिल्यास तो भाग चटकन लक्षात येतो.

उजळणी करताना एकामागोमाग एक धडे असे न करता मधे मधे छोटे ब्रेक घेणे आवश्यक आहे. एक धडा संपला की दहा मिनिटं घरात किंवा थोडं घराबाहेर पडून फिरावं. डोळे बंद करुन शांत बसावं. घरातल्यांशी अभ्यास सोडून इतर विषयांवर गप्पा माराव्यात, यामुळे अभ्यासाचा आलेला ताण निघून जातो. रिलॅक्स होतो आणि पुढील धड्याची रिव्हिजन करण्याला उत्साह आणि ऊर्जा मिळते.

Image: freepik

अभ्यास करता करता मधे ब्रेक घेतल्यावर अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा निर्माण होते. अशा वेळेस जंक फूड जर खाल्लं तर त्याचा वाईट परिणाम अभ्यास करण्यावर होतो. त्यामुळे ब्रेकमध्ये पौष्टिक खाऊ खावा. रात्री लवकर आणि वेळेत झोपावे. यामुळे आपल्या मेंदूला पुरेसा आराम मिळून तोही छान ताजातवाना होतो.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact