
शाळा सुरू झाल्याचा उत्सव साजरा करण्यात सुरुवातीचे काही दिवस मजेत गेल्यानंतर सरांनी डोस दिला की सोमवार पासून सिरियसली अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि त्याच दिवशी ७ वी ब मधली मिहीका हाताला मोठं बँडेज बांधून वर्गात बसलेली सरांना दिसली. काय तर म्हणजे हात मुरगळला असल्याने लिहू शकत नाहीये. वर्गातली सगळी मुलं फळ्यावरचं लिहून घेत होती आणि मिहीका मात्र हात दुखतोय म्हणून मस्त गंमत बघत बसून होती. सर डेंजर होते. त्यांना मुलांचा हा चालूपणा नीट माहिती होता. त्यांनी अचानक डस्टर मिहीकाच्या दिशेने फेकलं आणि काही कळायच्या आत रिफ्लेक्स ॲक्शनने मिहीकाने बॅंडेज बांधलेल्याच हाताने डस्टर आरामात कॅच केलं. सगळा वर्ग हसू लागला. आणि मिहीकाची चोरी पकडली गेली.
तिचा क्रश असणाऱ्या विराट कोहलीची शपथ घातल्यामुळे मिहीकाचा नाईलाज झाला आणि तिने कबूल केलं की, तिच्या हाताला काहीही झालेलं नाही. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत हाताने लिहिण्याची प्रॅक्टिस न राहिल्याने तिचा हात वळतच नाहीये. आदल्या दिवशी घरी आईने एका गिफ्ट पॅकवर नाव लिहायला सांगितलं तर तिला साधं नाव आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, एवढं पण लिहिता आलं नाही. पेनाची ग्रीप पकडता येईना. प चं पोत सुटलं, फ चे कपडे फाटले, घ घसरून पडल्या सारखा दिसत होता. काय लिहिलंय ते धड वाचता सुद्धा येईना. आणि २ ओळी लिहिल्या तरी बोटं आणि हाताची शीर दुखायला लागली. हात अगदी फ्रीज झाल्या सारखा वाटत होता. घरी ही हालत तर उद्या शाळेत फळ्यावरचं उतरवून घेताना आपली वाट लागेल. आणि सगळ्यांसामोर इज्जत जाईल, या भीतीने तिने हात दुखण्याचं नाटक केलं.
हेही वाचा!
मित्राला मदत करण्यासाठी सरबताची गाडी. एवढुशा मुलाला एवढी समज?

पण नशीब तिचे सर ‘तारे जमीन पर’ मधल्या निकुंभ सरांसारखे होते. ते म्हणाले हा एकदम कॉमन प्रॉब्लेम आहे. यात लपवण्यासारखं काहीच नाही. मला पण सेम प्रॉब्लेम होता. तुमचा रिझल्ट तयार केल्याच्या नंतर जवळजवळ दीड महिना मी हाताने काहीच लिहिलं नाही. त्यामुळे बोटं आखडून गेली होती. आपल्या सरीरातील स्नायू वापरले नाहीत तर त्यांची पण सवय मोडते आणि मग अचानक काम आलं की मग ते फारसे वळत नाहीत किंवा बळजबरी वळवायला घेतले तर दुखतात. वर्गातल्या एका फनी मुलाने विचारलंच की, सर मग तुम्ही पण मिहीका सारखं हात दुखण्याचं नाटक करायचात का? त्याला वाटल त्याने जोक मारला, पण कोणीच हसलं नाही. सर मनाने चांगले होते, त्यामुळे ते एकटेच हसले आणि पुढे त्यांच्या लाहानपणीचा किस्सा सांगू लागले.. हात वळत नाही आणि त्यामुळे आपलं अक्षर कळत नाही म्हणून त्यांनी पहिल्याच आठवड्यात शाळेला दांडी मारली होती आणि त्यावरून मार पण खाल्ला होता. पण अशाप्रकारे लपवून ठेवले तर प्रॉब्लेम्स अजून वाढत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जो काही प्रॉब्लेम असेल तो शिक्षकांशी आणि पालकांशी बोलला पाहिजे.
सुट्टी नंतर लिहिण्यासाठी हात न वळणे हा अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आहे. पण सुरुवातीचे काही दिवस छान लिहिता आलं नाही, हात दुखला किंवा अक्षर घाण आलं तरी काही बिघडत नाही. सरांच्या या वाक्यामुळे मिहीकाला खूप बरं वाटलं. यावर उपाय म्हणून हाताचे काही सोपे व्यायाम करायचे. बोचकारल्या सारखी सगळी बोटं अधून मधून हलवत राहायची. पाण्यात बोट बुडवून स्वयंपाकाच्या ओट्यावर किंवा फरशीवर रेघोट्या मारून बघायच्या. पेनापेक्षा जाड काडी घेऊन मातीत वेगवेगळे आकार काढून बघायचे, मोठी मोठी अक्षरं लिहून बघायची, रांगोळी किंवा मीठ बोटांच्या चिमटीत धरून सूर्रकन सोडायचं, मध्येच थांबून परत सोडायचं. दोन तीन दिवस असे बोटांचे व्यायाम केल्याने हात मोकळा होतो.
पण दिवाळीच्या सुट्टीत पुनः हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सुट्टीत लिखणाची सवय तुटू द्यायची नाही. आठवड्यातून तीन वेळा आधी सांगितलेले व्यायाम करायचे. सुट्टीत काय उद्योग केले ते आपल्या सीक्रेट डायरीत लिहून ठेवायचे. आपल्याला सुचलेली किंवा आवडलेली कविता, गोष्ट नाहीतर काहीपण टाइमपास लिहा. पण लिहा. खरंतर मिहीकासारखाच वर्गातल्या इतर पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होता. पण ते सांगायला घाबरत होते आणि मिहीका सारखं नाटक करणीय इतके बदमाश पण नव्हते. पण बरं झालं सरांनी डस्टर फेकलं त्यामुळे मिहीकाची विकेट पडली आणि सगळ्यांची बोटं वळायला लागली आणि अक्षरंही कळायला लागली.


