
Image: freepik
अनय सकाळी आंघोळ वगैरे करुन खेळायला निघाला. तो वही आणि पेन घेवून खेळायला जात आहे हे आईने बघितलं. पण ती फारच कामात असल्याने तिने तेव्हा काही अनयला विचारलं नाही. आई तू ऑफिसला जाण्याआधी घरी येतो हे सांगून अनय खेळायला निघून गेला. आईने आज हाल्फ डे घेतलेला. घरातली उरलेली आवर शिवर करायला. तिने बरं म्हणून दरवाजा लावून घेतला. सकाळी 10 वाजता खेळायला गेलेला अनय दुपारी साडे बारा वाजता घरी आला. आईचीही ऑफिसला जाण्याची तयारी झाली होती. अनयच्या हातातली वही पाहून ' आज काय अभ्यास वगैरे केला की काय तुम्ही?' आईनं विचारलं. अभ्यास नाही काही. दिवाळीचं प्लॅनिंग केलं आम्ही. त्यादिवशी मी मोबाइल खेळत होतो तर बाबा माझ्यावर ओरडले नव्हते का? दिवाळीच्या सुटीत नुसता टी.व्ही पाहायचा नाही आणि मोबाइल खेळायचा नाही असं बजावून सांगितलं मला. आणि आई अगं आमच्या ग्रूपमधल्या सगळ्याच मुलांच्या आई बाबांनी काहीतरी करा, नुसता टी.व्हीपुढे वेळ घालवू नका असं सांगितलं. म्हणून आज आम्ही सर्वांनी मिळून दिवाळीच्या सुटीतलं क्रिएटिव्ह प्लॅनिंग केलं आहे. आमचं परवापासूनच त्यावर डिस्कशन सुरु होतं. आज फायनली झालं!'
'भारी रे अनय. मला दाखव ना तुमचं क्रिएटिव्ह प्लॅनिंग! आई अनयवर खूष होत म्हणाली. ' आता नाही.. बाबापण समोर हवा. तुम्ही दोघं ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळी सांगतो!' यावर आई चालेल म्हणत आणि अनयला काही सूचना देवून ऑफिसला निघाली.
हेही वाचा!
ऑफिसमधून घरी आल्यावर आईने बाबांना अनयच्या दिवाळी प्लॅनिंगविषयी सांगितलं. बाबाही खूष झाला. ' चला मागच्या आठवड्यात आपल्या सांगण्याचा काहीतरी परिणाम झालेला दिसतोय म्हणायचा. आपण लहान असताना दिवाळीत काय काय करायचो. दिवस पुरायचा नाही आपल्याला. आणि आता टी.व्हीसमोर बसून बसून यांचा दिवस जात नाही. काही केलंच नाही तर दरवर्षीची दिवाळी यांच्या कशी लक्षात राहील. काय सांगतील ते आपल्या लहानपणीच्या दिवाळीविषयी? बाबांच्या सुरात थोडा वैताग होताच.
' अहो पण आता केलंय ना अनयने प्लॅनिंग. बघू तरी काय करणार आहे ते. आता पुन्हा त्याला रागवू नका.. काय म्हणतोय ते ऐकून घ्या जरा!' आईने समजावण्याच्या सुरात सांगितलं.
रात्री जेवणं आटोपल्यावर , सर्व आवरा आवरी झाल्यावर आई बाबा, आजी आजोबा सर्वजण उत्सुकतेने अनयचं दिवाळीच्या सुट्यांचं क्रिएटिव्ह पलॅनिंग ऐकायला बसले.
अनय वही उघडून प्लॅनिंग वाचू लागला. धनत्रोयदशी ते लक्ष्मीपूजन रोजच्या सारखं खेळणं आणि फॅमिली टाइम. आणि भाऊबीज झाल्यावर नंतरच्या दिवसांचं तारखेवार प्लॅनिंग केलेलं होतं.
भाऊबीज झाल्यावर दुसऱ्याच दिवशी श्रुतिकाच्या घरी दिवाळीचा फराळ पार्टी आणि मुलांच्या गेट टुगेदरचा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी ओवीची मोठी बहिण रश्मी ताई मुलांचं ओरिगामी सेशन घेणार होती. तिसऱ्या दिवशी अभंगचे बाबा मुलांसोबत एक दिवसाचं डाॅक्युमेण्टरी फिल्म वर्कशाॅप घेणार होते. अभंगचे बाबा डाॅक्युमेण्टरी फिल्म मेकर आहे. मुलं आम्हाला सुटीत फिल्म करायची आहे म्हणून त्यांच्या मागे लागले. फिल्म करायची तर मग त्यासाठी प्रशिक्षण तर हवंच. म्हणून अभंगच्या बाबांनी मुलांसोबत फिल्म मेकिंग घेण्याचं ठरवलं. एक दिवस फिल्म मेकिंग वर्कशाॅप आणि पुढचे दोन दिवस मुलांना त्यांनी ठरवलेल्या विषयावर फिल्म तयार करण्यासाठीचा वेळ आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मुलं आणि त्यांचे आई बाबा मिळून मुलांनी तयार केलेल्या फिल्मस बघणार होते. त्यानंतर एक दिवस अभंगच्या घरी मुलांचा फिल्म क्लब भरणार होता. खास मुलांसाठीच्या निवडक शाॅर्ट फिल्मस शोधून अभंगचे बाबा मुलांना त्या फिल्म दाखवणार होते आणि त्यावर मुलांशी गप्पा मारणार होते. आणि सुटी संपण्याच्या दोन दिवस आधी गौरव काका विदितचे लहान काका मुलांना एका छोट्या ट्रेकवर नेणार होते. शेवटचे दोन दिवस घरी आराम आणि शाळेची तयारी असं ठरलं होतं.
हेही वाचा!
अनय तर हे सुट्यांचं प्लॅनिंग वाचतानाच खूप एक्साइट झाला होता. आई बाबा, आजी-आजोबा सर्वांना अनयचं हे दिवाळीच्या सुटीच क्रिएटिव्ह प्लॅनिंग आवडलं होतं. बाबा तर म्हणाले, ' अनय भारी आहे रे तुमचं प्लॅनिंग. मलाही लहान होवून तुमच्यासोबत यावंसं वाटतंय!' यावर अनय स्मार्टपणे म्हणाला, ' बाबा यासाठी लहान होण्याची गरज नाही. आमचं प्लॅनिंग ओपन आहे. मोठ्यांना आमच्यात यावंसं वाटलं तर त्यांनी खुशाल यावं! नंतर अनयने मोर्चा आईकडे वळवला. आई फराळ पार्टीला मी चिरोटे आणणार असं सांगून आलोय. देशील ना करुन? अनयने जरा अविश्वासानंच आईकडे पाहिलं. पण आई तर यासाठी एका पायावर तयार होती .

Image: freepik
काय मस्त प्लॅनिंग केलं ना अभंग आणि त्याच्या मित्रांनी. मलाही त्यांच्या ग्रूपमध्ये जावंसं वाटतंय. तुम्ही दिवाळीच्या सुट्यांमध्ये काय करणार आहे? मलाही सांगा ना तुमचं धम्माल प्लॅनिंग!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact