फक्त दोन मिनिटांचा आनंद देणारे त्रासदायक फटाके कशाला फोडायचे?

image : freepik

नुकतीच एकदा एका शाळेत एक शिक्षक कार्यशाळा घ्यायला आले होते. त्यांनी कार्यशाळेत मुलांसमोर बोलत असतांना खिशातून पाचशे रुपयांची एक नोट बाहेर काढली आणि सहज बोलता बोलता मुलांना म्हणाले,

“आपण ही नोट जाळून टाकूया का?”

त्यावर अर्थातच सगळ्या मुलांनी खूप आरडाओरडा केला. कोणाला वाटलं की ते सर चेष्टा करतायत, कोणाला वाटलं की खरंच ते वेड्यासारखं करतायत, कोणाला वाटलं की ते आपली परीक्षा घेतायत. पण काहीही वाटलं तरी मुलांनी एका आवाजात सांगितलं, की “अशी पाचशे रुपयांची नोट जाळणं हा शुद्ध वेडेपणा आहे.” मग त्या सरांनी शांतपणे विचारलं, “पैसे जाळायचे नसतात हे जर का तुम्हाला समजतं, तर तुम्ही फटाके का उडवता?”

 

 

हेही वाचा!

एकट्याने घरी थांबायची वेळ आली तर हुशारीने वागा! म्हणजे कसं?

मुलं म्हणाली, “आम्हाला फटाके उडवायला मजा येते.”

सर म्हणाले, “किती वेळ मजा येते?”

“जितका वेळ आम्ही फटाके उडवतो तितका वेळ!”

“एक फटाका किती वेळ उडतो सांगा बरं? फार तर दोन मिनिटं! हो ना?”

“हो सर”

 

image : falstaff

“म्हणजे फटका उडवण्याची जी मजा असते ती फक्त दोन मिनिटं येते. पण त्या दोन मिनिटांसाठी फटाके आणतांना आपण किती खर्च करतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? तुम्ही सगळे जण किती रुपयांचे फटाके आणता सांगा बरं.”

मुलांनी सांगायला सुरुवात केली. कोणी पाचशे रुपये तर कोणी पाच हजार रुपये. काही जण तर म्हणाले की आमचे वडील आम्हाला रोज पाच हजारांचे फटाके आणून देतात. कार्यशाळेला जवळजवळ दीडशे मुलं बसली होती. सगळ्यांच्या रकमांची बेरीज केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की तेवढ्या मुलांमध्ये दिवाळीत जवळजवळ २ लाख रुपयांचे फटाके उडवले जातात.

“फटाके उडवल्यावर त्यांचं काय होतं?” असं सरांनी विचारलं. त्यावर मुलांनी सांगितलं, की खरं म्हणजे धूर, आवाज आणि उजेड!

सर म्हणाले, यापैकी धूर आणि आवाज हे दोन्ही आपल्यासाठी चांगलं नसतं. मग ते आपल्याला कशाला बरं पाहिजे? राहता राहिला उजेड! तर फटाक्यांचा उजेड होतो आणि दोन मिनिटात संपून जातो. त्यापेक्षा आपण भरपूर दिवेच लावूया की! नाहीतरी दिवाळी हा दिव्यांचाच सण आहे. त्यामुळे या दिवाळीत भरपूर दिवे लावा, छान कपडे घाला, भरपूर फराळ करा, भाऊ बहिणांना भेटा… मजा करा! फक्त फटाके तेवढे उडवायचेच आहेत का याचा विचार करा…

त्या शाळेतली मुलं आता विचार करतायत, की मजा येण्यासाठी फटाके लागतात का? तुम्हीपण करणार आहात का विचार

फटाके उडवण्याची जी मजा असते ती फक्त दोन मिनिटं येते. पण त्या दोन मिनिटांसाठी फटाके आणतांना आपण किती खर्च करतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? तुम्ही सगळे जण किती रुपयांचे फटाके आणता सांगा बरं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact