दिवाळीला संध्याकाळी आम्ही साधेच कपडे का घालायचे?

Image : freepik

मम्मी दिवाळीत मला कधीच माझ्या मनासारखे कपडे घालू देत नाही. नेहमी तिला पाहिजे घालायला लावते. माझ्याकडे एवढे छान छान घागरा आणि अनारकली ड्रेसेस आहेत. ती मला दिवाळीला दिवसा घालू देते. पण संध्याकाळी म्हणते की आता सुती कपडे घाल. फार घेराचे कपडे घालू नको. नाही तर सरळ लेगिंग आणि टॉप घाल.

तुमची पण आई असं करते का? मुलग्यांनी झब्बा घातला असेल तर त्याचा स्टोल काढून ठेव म्हणते. साधा कॉटन शर्ट आणि जीन्स घाल असं म्हणते का? किंवा तुमचे वडील असं करतात का? आजी आजोबा? काका काकू? मावशी? आत्या? मामा मामी?

जे कोणी मोठे लोक तुम्हाला असं सांगतात, ते का सांगत असतील बरं? त्यांनीच तुम्हाला छान छान कपडे आणून दिलेले असतात. दिवसभर ते घालून मिरवायला मदत केलेली असते. तुम्हाला छान वेण्या घालून, दागिने घालून नटवलेलं असतं. दिवसभर तुमचे हौसेने फोटो काढलेले असतात. तुमचं कौतुक केलेलं असतं. मग संध्याकाळी असं काय होतं ज्यासाठी तुम्हाला ते साधे कॉटनचे कपडे घालायला सांगतात?

हेही वाचा… 

दिवाळीच्या सुटीत नुसता टी.व्ही पाहणार की काही तरी धम्माल करणार?

Image : freepik

सोप्पं आहे! दिवाळीच्या दिवसात संध्याकाळी घरात, अंगणात दिवे आणि पणत्या लावतात. त्यात तुम्ही असता सुट्टी आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये. अशात खूप घेराचे, पायघोळ, सिंथेटिक कापडाचे कपडे घालून वावरणं हे धोकादायक ठरू शकतं. फलकरणाऱ्या ओढण्या, अनारकली ड्रेसचा पायघोळ घेर यातलं काहीही दिव्याच्या संपर्कात आलं तर गंभीर अपघात घडू शकतो. त्यातही सिंथेटिक कपडे पटकन पेट घेतात. कॉटनचे कपडे त्यामानाने लवकर पेटत नाहीत.

काही मुलांना फटाके उडवायला आवडतं. त तर सगळाच आगीशी खेळ असतो. काही मुलं स्वतः फटाके उडवत नसतील तरीही त्यांच्या अवतीभोवती अनेक जण फटाके उडवत असतात. अशा वेळी कुठलाही अपघात घडू नये, दिवाळी छान आनंदात आणि सुखासमाधानात जावी यासाठी तुमच्या घरातली मोठी माणसं तुम्हाला कपडे बदलून यायला सांगतात. त्यांचं ऐका. दिवसभर छान कपडे घालून नटूनथटून मिरवा. फक्त संध्याकाळी दिवेलागणीनंतर कॉटनचे आणि सुटसुटीत कपडे घाला. तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या घरातल्या आईबाबा-ताईदादा-आजीआजोबा-काकाकाकू-मामामामी-आत्या-मावशी सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!