
Image: indiansportsnews
'शुभमन गिल दहावीसुध्दा पास नाही. सचिन तेंडुलकरही दहावी पास नाही. धोनीपण कॉलेज पूर्ण करु शकला नाही. पण मी मात्र रोज शाळेत जायला हवं, अभ्यास करायला हवा, हा काय त्रास आहे? माझी शाळा सकाळचीच, मी कधी क्रिकेट प्रॅक्टिस करणार? माझ्यात नाहीये का टॅलण्ट?
सांग ना, सांग ना तू..' छोटा रोहन आईला रागातच विचारत होता.
रोहनने गुगल अभ्यास खूप केला होता. त्याला खूप आवडतो शुभमन गिल. आपणही त्याच्यासारखेच दणादण खेळून इंडियन टिमला जिंकवायचं हे त्याच्या डोक्यात दिवस-रात्र चालतं. त्याच्या आईलाही क्रिकेट आवडतं. त्यामुळे त्याचं क्रिकेटसाठीचं पॅशन तिलाही कळतं.
रोहन आईला म्हणाला,'तुला नकोय का मी क्रिकेटस्टार व्हायला? मी काय करु रोज रोज शाळेचा अभ्यास करुन, माझा वेळ जातो, तू प्लीज मला समजून घे!'
हेही वाचा!
आई म्हणाली,' करेक्ट आहे. उद्यापासून तू नको जाऊस शाळेत. मी बोलते तुझ्या मुख्याध्यापकांशी! बरोबर आहे तुझं अभ्यास करण्यात कशाला वेळ घालवायचा? फक्त आपल्याला शाळेत सांगावं लागेल ना की आम्ही का नाही येणार. तर ते आपण बोलून घेऊ! म्हणजे बघ, आपल्याला गिल आणि धोनीसारखं व्हायचं आहे बरोबर? तर धोनी म्हणे रोज पहाटे ४ वाजता उठायचा, आणि ५ वाजून ४५ मिनिटांनी तो ग्राऊण्डवर पोहोचलेला असायचा. कधीही अगदी कधीही म्हणजे पाऊस असो की ऊन जास्त, रात्री जागरण झालेलं असो तो कधीही पावणेसहा नंतर मैदानात पोहचलेला नाही. त्याचे सर सांगतात, की त्याचा क्रिकेटचा अभ्यास इतका दांडगा की तो पावणेसहाला येऊन सराव सुरु करायचा. सायंकाळी व्यायाम म्हणून पुन्हा बॅडमिंटन खेळायचा. आणि तो कशाला शुभमन गिलपण बघ रोज सकाळी ५ वाजता ग्राऊण्डवर पोहोचतो. आणि जे दणादण प्रॅक्टिस करतो की त्याला ना व्हिडिओ गेम आठवतात ना मोबाइल गेम!'
रोहन शांतपणे ऐकत होता. पटकन म्हणाला,' मी उठत जाईन ना पहाटे रोज!'
आई पुढे सांगत होती, 'आणि राहुल द्रविड नाव ऐकलंस ना! आता कोच आहेत आपले. तो तर ग्रॅज्युएट आहे. एमबीए करणार होता, पण पुढे नाही करता आलं त्याला! अनिल कुंबळे तर इंजिनिअर होता. पण ते जाऊ दे! सचिन तेंडूलकर घे, त्यानं नाही शाळेत अभ्यास केला!
पण त्याचे सर त्याला दिवसाला सहा सहा तास प्रॅक्टिस करवत!
आणि प्रॅक्टिस म्हणजे तरी काय अभ्यासच ना? तू शाळेत पाढे पाठ करतोस, लक्षात रहावी म्हणून उत्तरं पुन्हा पुन्हा वाचतो. पुस्तकं वाचतो. गणित सोडवतो. तो एक अभ्यास. आणि मैदानात जाऊन एकेकच शॉट हजारवेळा खेळून खेळून घोटून पाठ करणं तो दुसरा अभ्यास. अभ्यास तर करावाच लागतो. खेळून स्पोर्ट्समन व्हायचं असलं तरी शाळेचा अभ्यास यासाठी करायचा की आपल्याला नवीन विषय कळतात, क्रिकेटचे जसे रेकाॅर्ड असतात तसे माणसांच्या इतिहासाचे असतात. भूगोल-भौतिकशास्त्र-जीवशास्त्र सगळ्यात काहीनाकाही गंमत असते. ती गंमत कळली ना तर ती तुला तुझ्या खेळात पण वापरता येते. शेवटी क्रिकेट काय आहे दिल का गेम दिमाग से!
तू बघ तुझा दिमाग तुला तेज करुन हवा आहे की नको?'

Image: cricket.com
अभ्यास म्हणजे बोअर काहीतरी, बिनकामाचं असं मनातून काढून टाकलं आणि गणितात क्रिकेटचा स्कोअर, भाषेत क्रिकेटच्या कॉमेण्ट्रीची गंमत कळली तर तुला सगळीकडे क्रिकेटच दिसायला लागेल! हा अभ्यास करता करता क्रिकेटचा अभ्यास होईल बाकी क्रिकेटची प्रॅक्टिस तर तू करच. शनिवारी वाटल्यास आपण शाळेची परवानगी घेऊ आणि तू दिवसभर ग्राऊण्डवर जा...'
रोहनने शांतपणे ऐकून घेतलं.. मग म्हणाला.. 'विचार करतो.'
'म्हणजे बघ अजून देशात क्रिकेटर सायंटिस्ट किंवा स्पेस सायंटिस्ट आणि क्रिकेटर किंवा क्रिकेटर आणि आर्किटेक्ट असं कुणी झालं नसेल तर तसं व्हायला मला स्कोप आहे!'
आई म्हणाली, 'स्कोपपण आणि स्टाइलपण आहे यात भारी!'
रोहनला तर पटलं, सांगा तुम्हाला पटलं का?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact