१४ वर्षांच्या काल्याने जगाला कौतुक वाटावं असं केलं धाडस!

Image: .rnz.co.nz

न्यूझिलंडमधील काल्या गमागे या १४ वर्षाच्या मुलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्याने केलेल्या धाडसाची बातमी जगभरातल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झाली आहे. त्यासाठी त्याला अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे. काल्या गमागे याने केलेली कृती आम्ही लहान असलो तरी संकट आलं तर भिवून मागे पळत नाही ही अनेक मुलांच्या मनातली भावना व्यक्त करणारी आहे.

हेही वाचा!

काय केलं काल्याने ?

मागच्या वर्षी एका सुटीच्या दिवशी काल्या , त्याचा भाऊ किथमी हे दोघे आपल्या आईसोबत न्यूझिलंडमधील दक्षिण ओटॅगो येथील क्रिस्टाॅल्स बीच येथे फिरायला गेले. खेळता खेळता १२ वर्षांचा किथमी समुद्राच्या पाण्यात उतरला. थोड्याच वेळात समुद्राच्या लाटांनी त्याला आत ओढलं. खरंतर किथमी याला चांगलं पोहोता येत होतं. पण समुद्राच्या तीव्र लाटांनी किथमीचे पायच जखडून टाकले. या वेगवान लाटांनी किथमीला समुद्राच्या पाण्यात ओढले आणि किथमी त्या लाटांसोबत वाहून जायला लागला. तो किनाऱ्यापासून ६० मीटर दूर वाहात गेला. लाटांनी त्याला आपल्यासोबत अशा ठिकाणी नेलं जिथून कोणीच जिवंत परत नाही असं त्या स्पाॅटबद्दल न्यूझिलंडमध्ये बोललं जातं. आता आपली सुटका नाही, आपण मरणार याची किथमीला खात्री पटली. त्याने ओरडून आईला ' आई मी आता चाललो आहे, मी परत येणार नाही कदाचित ' असं ओरडून सांगितलं. आपला मुलगा असा आपल्या डोळ्यादेखत वाहात चाललेला बघून किथमीच्या आईच्या हातापायातली शक्तीच गेली. ती असाहय्यपणे आपल्या किथमीसाठी रडत होती, ओरडत होती. आपल्या वाहून जाणाऱ्या भावाल आणि त्याच्या दुखात व्याकूळ झालेल्या आईला बघून काल्याने कसलाही विचार न करता किथमीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

अतिशय थंड असलेल्या त्या समुद्राच्या पाण्यात् काल्या आत्मविश्वासाने पोहोत होता. आपल्या भावापर्यंत पोहोत जाताना काल्याला अनेक अडचणी आल्या, पण काल्या घाबरला नाही. तो आपल्या भावापर्यंत पोहोचला. पण लाटांचा वेग आणि एकूणच पाण्याचं थंड तापमान बघता आपण आपल्या भावासह किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचू का? याची त्याला खात्री वाटत नव्हती. पण त्याने धीर सोडला नाही. आपल्या भावाला घेवून त्याने किनारा गाठला. दोन्ही मुलं समुद्रातून सुखरुप बाहेर पडलेली बघून आईच्या जीवात जीव आला. एवढ्या अवघड प्रसंगी काल्यानं दाखवलेलं धाडस कौतुकास्पद आणि दखलपात्र होतं. झालंही तसंच, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या भावाला वाचवणाऱ्या काल्याची दखल न्यूझिलंडमधील सर्व माध्यमांनी घेतली.

काल्याला मिळाला मानाचा पुरस्कार 

काल्याचा हा पराक्रम जगाला माहीती झाला तो त्याला नुकत्याच मिळालेल्या एका मानाच्या पुरस्कारामुळे. काल्याने आपल्या भावाला संकटातून सहीसलामत बाहेर काढून दाखवलेल्या अचाट पराक्रमाबद्दल त्याला ' माउंटबॅटन अवाॅर्ड' हा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा १४ वर्षांचा काल्या सर्वात लहान मुलगा आहे. ब्रिटीश काॅमनवेल्स्थ मधील ५६ देशांमधील २०० कोटी लोकांमधून फक्त एकाला दिला जातो. २०२२चा 'माउंटबॅटन अवाॅर्ड' हा काल्याला मिळाला आणि काल्या त्याच्या पराक्रमामुळे जगभरात कौतुकाचा विषय झाला. 

 Image: .rnz.co.nz

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact  

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact