मधमाशी झालेल्या आरुषला पोळ्यामध्ये दिसलं मधमाश्यांचं अनोखं जग

 

image : freepik

आरुषने पंख हलवले तर त्याला खरंच छान उडता येत होतं. तो उडत उडत थोडा उंच गेला. आणि त्याच्या लक्षात आलं की त्याला मगापासून जी मोठी विटकरी रंगाची भिंत वाटत होती ती खरं म्हणजे कुंडी होती. मग तो उडत उडत अजून थोडा वर गेला तर त्याला त्या कुंडीत लावलेलं मोठ्ठ फूल दिसलं. एवढं मोठं फूल कुठलं आहे असा विचार करत असतांना त्याच्या लक्षात आलं, की ते साधं सदाफुलीचं फूल होतं. पण आता तो मधमाशी होऊन छोटा झालेला असल्यामुळे त्याला ते फूल मोठं वाटत होतं. त्याने उडत उडत त्या फुलाभोवती चक्कर मारली आणि तो हळूच त्याच्या मैत्रीण मधमाशीच्या शेजारी येऊन बसला. ती त्याला म्हणाली,“जाऊया का माझ्या घरी?”

आरुष हो म्हणाला. आणि मग ती मधमाशी आणि आत्ता राणीमाशीच्या जादूच्या मधाने थोड्या वेळासाठी मधमाशी झालेला आरुष असे दोघं जण उडत उडत आंब्याच्या झाडावरच्या मधमाश्यांच्या घराकडे निघाले. 

त्याच्या जरा जवळ पोचल्यावर आरुषच्या लक्षात आलं की ते मधमाश्यांचं पोळं होतं. त्याने उंच बिल्डिंगवर किंवा आईबरोबर ट्रेकला गेलेला असतांना असं पोळं आधीपण बघितलेलं होतं. पण त्याच्याभोवती खूप मधमाश्या असल्यामुळे तो कधीच त्याच्या जवळ गेलेला नव्हता. आत्तापण त्याला एकदम भीती वाटली की आपल्याला त्या मधमाश्या चावल्या तर? त्याला वाटलं परत जावं. पण मग त्याला आठवलं की तोच सध्या एक मधमाशी झालेला होता. ते आठवल्यावर तो परत त्या मधमाशीबरोबर उडत त्या पोळ्याकडे जात राहिला.

हेही वाचा : 

मधमाशीचं घर पाहण्यासाठी आरुषच झाला मधमाशी

त्याच्या पहिली गोष्ट तर ही लक्षात आली, की आपल्याला जमिनीवरून बघतांना उडणं एकदम सोप्पं आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र उडायला बरीच मेहनत करायला लागते. त्याने मनातल्या मनात चिमण्यांसाठी पाणी ठेवायचं पण ठरवून टाकलं. 

आता ते मधाचं पोळं अगदी जवळ आलं होतं. ते खूप म्हणजे खूपच मोठं होतं. त्यावर अक्षरशः हजारो मधमाश्या बसलेल्या होत्या. काही लांबून उडत येत होत्या, काही बाहेर चालल्या होत्या, काहीजणी तिथेच एका ठिकाणी पंख हलवत स्थिर उडत होत्या. आरुषला कळेना की आपल्याला यात उभं रहायला तरी जागा मिळणार आहे का?

image : savannah bee company

आरुष आणि मधमाशी पोळ्याच्या अगदी जवळ आले तेव्हा चार पाच मधमाश्यांचा एक घोळका तिथून उडाला. तिथे रिकाम्या झालेल्या जागेत आरुष आणि मधमाशी लँड झाले. आरुषने दमून पंख मिटून घेतले आणि तो कुतूहलाने आजूबाजूला बघायला लागला. मधमाश्यांचं घर कसलं सुंदर होतं!

सोनेरी ब्राऊन रंगाच्या पातळ भिंतींनी एकसारखे षट्कोनी कप्पे बांधलेले होते. त्यातल्या काही कप्प्यांमध्ये सुंदर सोनेरी रंगाचा मध ठेवलेला होता. काही कप्पे बंद करून ठेवलेले होते तर काहींच्या समोर एक - एक माशी पंख हलवत स्थिर एकाच जागी उडत होती. काही कप्प्यांमध्ये पांढरं काहीतरी भरून ठेवलेलं होतं. पण इतके सगळे चिकट पदार्थ तिथे असतांनाही सगळं पोळं एकदम स्वच्छ होतं. कुठेही कचरा नव्हता. आरुष कितीतरी वेळ आश्चर्याने इकडेतिकडे बघत होता. मग त्याने त्याच्या मैत्रीण मधमाशीला विचारलं,

“या माश्या अशा एकाच जागी का उडतायत?”

“त्या मध वाळवतायत.”

“म्हणजे?” आरुषला काही कळलं नाही. मध वाळवतायत म्हणजे काय??

“अरे…” ती मधमाशी म्हणाली, “मगाशी तू माणूस असतांना फुलातला मध चोखून खाल्ला होतास ते आठवतंय का?”

“हो.”

“तो मध कसा होता?”

“पांचट!”

“करेक्ट. फुलात जो मध असतो तो पांचटच असतो. कारण तो फार दाट असेल तर आपल्याला सोंडेने तो ओढून काढताच येणार नाही.”

“मग?”

image : dreamstime

“मग काय? आमच्यासारख्या माश्या फुलांवर बसतात, त्यातला तो पातळ पांचट मध सोंडेत भरून घेतात आणि तो इकडे आणून एकेका कप्प्यात भरून ठेवतात. आणि मग या माश्या अशा पंखांनी वारा घालून त्या मधातलं पाण्याचं प्रमाण कमी करतात. मग तो मध हळू हळू घट्ट आणि चिकट होतो. तो मध एकदा तसा तयार झाला की मग तो खराब होत नाही. एकदा मध तयार झाला की त्या कप्प्याचं तोंड बंद करून टाकतात.”

आरुष आ वासून ऐकत राहिला. एवढुश्या मधमाश्यांना एवढं समजतं? त्याला खरंच वाटेना. मग तो म्हणाला,

“पण तो कप्पा कसला बनवलेला असतो?” मग त्याच्या लक्षात आलं, “कप्पा म्हणजे हे सगळं पोळं कशाचं बांधलंय?”

मधमाशी म्हणाली, “चल तुला दाखवते.”

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact