मधमाशीचं घर पाहण्यासाठी आरुषच झाला मधमाशी

 

images : freepik

आंब्याच्या झाडाकडून आपल्याकडे काय उडत येतंय ते आरुष आ वासून बघत राहिला. ते जे काय होतं ते जरा जवळ आल्यावर त्याला दिसलं की त्या एकूण ४ मधमाश्या होत्या आणि त्यांनी चौघींनी मिळून एक छोटा गोळा उचलून आणला होता. तो गोळा आरुषच्या शेजारी जमिनीवर ठेऊन त्यातल्या तीन मधमाश्या उडून गेल्या. आणि मगाशी त्याच्याशी गप्पा मारणारी माशी तिथेच थांबून त्याला म्हणाली,

“मी राणीमाशीला विचारलं, तुला सीक्रेट सांगू का म्हणून. तर आधी तर ती नाहीच म्हणाली. पण मग मी तिला सांगितलं की तू कशी आमच्यासाठी झाडं लावलीस ते. मग ती ना, सॉलिड खूष झाली आणि म्हणाली, की त्याला आपलं घर दाखवायला घेऊन ये.”

“भारी! पण मी कसा येणार तुझ्या घरी?” आरुष म्हणाला, “मला उडता पण येत नाही आणि झाडावर इतक्या उंच चढता पण येत नाही.”

“ते पण मी राणीमाशीला सांगितलं.”

“मग??”

“मग तिने तुझ्यासाठी जादूचा मध दिलाय.” मधमाशीने मगाशी आणून ठेवलेल्या गोळ्याकडे पुढचा पाय केला. तो खाल्लास तर तुझी पण मधमाशी होईल. मग तुला येता येईल माझ्या घरी.”

“खरंच?” आरुषने त्या छोट्या गोळ्याकडे हात केला, पण मग काहीतरी विचार करून तो हात परत मागे घेतला आणि म्हणाला, “नको नको. मी कायमचा मधमाशी होऊन गेलो तर???”

“मग हो की.” मधमाशी त्याला चिडवत म्हणाली, “मधमाशी झालास तर तुलापण माझ्यासारखा रोज रोज मध खायला मिळेल.”

“नको रे बाबा. मध खायला मिळेल, पण मग मी शाळेत कसा जाणार? आणि माझे आईबाबा शोधतील ना मला!”

मधमाशी हसायला लागली, आणि म्हणाली, “अरे असा कसा कायमचा मधमाशी होशील? तुला थोडा वेळ मधमाशी करणार, आमचं घर दाखवणार आणि परत आणून सोडणार.”

“पण मी परत माणूस कसा होईन?”

“अरे तुला परत आणून सोडलं की तू तुझ्या सोंडेने कुठल्याही फुलातला साधा मध पी. की तू परत माणूस होशील.”

“नक्की?”

“नक्की!”

“ओके…” क्षणभर विचार करून आरुषने शेजारी ठेवलेला छोटुसा गोळा उचलला.

मधमाशीने आणून दिलेला छोटुसा गोळा आरुषने उचलला, तर तो चक्क मेणाचा होता. आरुषने प्रश्नार्थक चेहेऱ्याने मधमाशीकडे बघितलं. तर ती म्हणाली,

“त्याच्या आत मध आहे.”

हेही वाचा : 

आरुषचा हट्ट पुरवण्यासाठी राणीमाशी परवानगी देणार का?

आरुषने वर बघून आ केला, चिमटीत तो गोळा उचलला, आणि चिमूट थोडीशी दाबली, तर त्यातून दोन थेंब मध बाहेर आला आणि त्याच्या तोंडात पडला. तो मध खाल्ल्यावर त्याला एकदम कसंतरीच व्हायला लागलं. आपल्याला सगळीकडून कोणीतरी दाबतंय असं वाटायला लागलं.

त्याने घाबरून एकदम डोळे मिटले आणि खाली बसला. आता त्याला असंही वाटत होतं की आपल्या पाठीला कोणीतरी गुदगुल्या करतंय. अजून जरा वेळात बरं वाटलं नाही तर जोरात आईला हाक मारायची असं त्याने ठरवलं. पण तेवढ्यात ते वाटणं हळूहळू कमी झालं. पण आता त्याच्या पाठीवर काहीतरी हलत होतं. ते काय आहे ते बघायला त्याने डोळे उघडले, तर त्याला एक सेकंड आपण कुठे आहोत तेच कळेना. त्याच्या समोर विटकरी रंगाची एक प्रचंड मोठी गोल भिंत होती. त्याने जरा बाजूला बघितलं तर पलीकडे अजून एक तशीच मोठी भिंत होती. त्याच्या बाजूला एक मोठ्ठा पिवळसर केशरी रंगाचा गोळा पडलेला होता. आणि त्याच्या पाठीवर काय जे होतं, ते अजून हलतच होतं. त्याने मान वळवून मागे बघितलं आणि तो सॉलिड दचकला! त्याच्या पाठीवर दोन पंख होते…

आईशप्पथ! तो खरंच मधमाशी झाला होता! त्याने हात पाय हलवायचा प्रयत्न केला तर त्याला एकदम कन्फ्यूज व्हायला झालं. त्याला आता एकूण सहा पाय आले होते. त्यातला कुठला पाय कुठून हलतो त्याचा त्याने एकदा अंदाज घेतला. मग पाठीवरचे पंख हलवायचा प्रयत्न केला तर ते हलले. त्याने अजून जोरात पंख हलवले, तर तो थोडासा वर उचलला गेला. त्याने घाबरून पंख मिटले तर तो बुदुकदिशी खाली पडला. आणि त्याला जोरजोरात हसण्याचा आवाज आला. त्याने आजूबाजूला बघितलं, तर ती त्याची मैत्रीण मधमाशी जरा लांब उभी राहून त्याच्याकडे बघून हसत होती. पण तिने पटकन हसू आवरतं घेतलं आणि त्याला म्हणाली,

“जमतंय की तुला उडायला. अजून थोडी प्रॅक्टिस कर.”

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact