
Image: earth.org
वेळ कमी आणि कामं खूप म्हटल्यानंतर आपण कसं कामात गढून जातो तशी परिस्थिती विनिशा उमाशंकरची झाली आहे. विनिशा ही तामिळनाडू राज्यातील तिरुवन्नमलाई या छोट्याशा शहरात राहाते. तिची आई शाळेत विज्ञान हा विषय शिकवते. आपल्या आईकडून विनिशाला कायमच प्रोत्साहन मिळत असतं. ती फक्त पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या आईने विनिशाला विज्ञानाचा विश्वकोष आणून दिला. विनिशा लहान असली तरी तिला तो विश्वकोष चाळण्याचा छंद जडला. ती जसजशी मोठी होवू लागली, तशी हा विश्वकोष वाचून तिची चिकित्सक बुध्दी आणखीनच तल्लख झाली. विनिशा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहायला लागली. यामुळे झालं काय की तिला अनेक गोष्टींबद्दल राग यायला लागला. पण हळूहळू तिला समजलं की केवळ राग करुन काहीच उपयोग नाही. परिस्थितीचा राग करण्यापेक्षा ती बदलण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत हे तिला समजत गेलं.
हेही वाचा!
विनिशा आता १६ वर्षांची आहे. ही गोष्ट आहे ती जेव्हा केवळ नऊ दहा वर्षांची होती तेव्हाची. विनिशा आपल्या आईसोबत कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी, टाकलेले कपडे आणण्यासाठी धोब्याच्या गाड्यावर जायची. तेव्हा तिचं आवडतं काम म्हणजे ती इस्त्रीवाले इस्त्री कशी करतात याचं बारीक निरिक्षण करायची. या निरिक्षणात एक गोष्ट तिला प्रकर्षानं आढळली ती म्हणजे इस्त्रीवाले इस्त्रीत कोळसा भरतात. कोळशावर इस्त्री तापवतात. कोळशावर इस्त्री तापायला वेळ लागतो. वापरलेला कोळसा हा नंतर पाण्यात बुडवून टाकून दिला जातो. या कोळशाचा पुन्हा वापर होत नाही.
हे पाहून विनिशाला प्रश्न पडू लागले. या उत्तरांचा ती इंटरनेटवर शोध घ्यायची. तेव्हा तिला काही गोष्टी प्रामुख्याने समजल्या. जसे वापरुन झालेला कोळसा नंतर निरुपयोगी ठरतो. या जळालेल्या कोळशाने हवा प्रदूषित होते. हा कोळसा बनवण्यासाठी झाडं तोडली जातात.१ किलो कोळसा बनवण्यासाठी १२ झाडं तोडली जातात. आपल्या देशात साधारणत: १ कोटी धोबी आहेत. त्यातले बहुतेकजण हे अजूनही कोळशावरची इस्री वापरतात. एक धोबी दिवसाला साधारणत: ५ किलो कोळसा वापरतो. हा कोळसा जाळल्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड या ग्रीन हाउस गॅसची निर्मिती होते. तसेच कोळशाची इस्त्री चालवणाऱ्या लोकांनाही विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे सर्व वाचून विनिशाला आपण काहीतरी करायला हवं असं वाटलं. तिनं काय करता येईल याचा अभ्यास सुरु केला. इस्त्रीसाठी कोळशाऐवजी काय वापरता येईल याची विनिशा शोध घेत होती. विनिशा आठवीत होती. पण सोलर पॅनलमुळे कशी वीज निर्मिती होते, सोलरद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर आपण कुठे कुठे करु शकतो, याचा तिने अभ्यास करण्यासाठी अकरावी- बारावीची भौतिकशास्त्राची पुस्तकं आणून त्याचा अभ्यास सुरु केला. या अभ्यासातून तिला ' सोलर आयर्न कार्ट' म्हणजे सोलरवर चालणाऱ्या इस्री गाड्याची कल्पना सूचली.

Image: thestatesman
ती तिने अनेकांसमोर मांडली. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तिला अहमदाबादमधील ' नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनमधील इंजिनिअर्सची मदत देण्यात आली. विनिशाची ही सोलर वरील आयर्न कार्टची कल्पना या इंजिनिअर्सनी प्रत्यक्षात आणली. या सोलर आयर्न कार्टच्या छताला दुहेरी सोलर पॅनल आहेत. या पॅनलमध्ये साठणाऱ्या सौर ऊर्जेतून वीज निर्माण होवून मग ती इस्त्री करण्यासाठी वापरली जावू शकते. सोलर पॅनल पूर्ण चार्ज होण्यासाठी त्यांना किमान ५ तास सूर्यप्रकाश लागतो. पूर्ण चार्ज झालेले सोलर इस्त्री कार्ट नंतर ६ तास चालतं. या इस्त्रीच्या गाड्यावर फोन चार्ज करता यावा यासाठी यूएसबी चार्जिंग पाॅंइट्स आहेत. कोणाला गरज असल्यास या चार्जिंग पाॅइंटवर पैसे घेवून मोबाइल चार्ज करुन देण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे इस्त्रीसोबतच धोब्यांच्या जोडधंद्याचाही विचार करण्यात आला आहे.
हेही वाचा!

Image: bizadda360
विनिशाच्या कल्पनेतून डिझाइन झालेली ही सोलर आर्यन कार्ट संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या १५ मुल्यांपैकी १३ मुल्यं पूर्ण करते. या कार्टचा किंमत अजून ठरायची आहे. पण विनिशा म्हणते ती जास्तीत जास्त किफायशतशीर ठेवली गेल्यास ती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचेल. जास्तीत जास्त जणांनी हा सोलरवर चालणाऱ्या इस्त्रीचा वापर केला तर कोळशामुळे होणारं प्रदूषण टळेल, हवा शुध्द राहील. झाडं वाचतील. आपली ही सोलर आयर्न कार्ट बाजारात आल्यावर लोकं तिचा वापर करु लागतील. वापरणाऱ्यांच्या प्रतिक्रिया समजतील. या कार्टमध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या करता येतील असं विनिशाला वाटतं. विनाशाच्या सोलार आर्यन कार्टला २०२१ मध्ये इको ऑस्कर्स म्हणून ओळखला जाणारा ' अर्थशॉट प्राइज' हा पुरस्कार मिळाला.
काॅलेज, अभ्यास, छंद, खेळ सांभाळून विनिशा आपला जास्तीत जास्त वेळ हा विविध प्रश्न सोडवू शकणाऱ्या वैज्ञानिक शोधांसाठी घालवते. सगळी धावपळ करुन प्रत्यक्ष जीवनातल्या प्रश्नावर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी अभ्यास करताना विनिशाची खूप धावपळ, दमछाक होते. पण विनिशा म्हणजे मी फक्त या जगातली मुलगी नसून या ग्रहावरची एक मुलगी आहे. आणि आपला ग्रह पूर्ववत करण्यासाठी प्रत्येकानं काम केलं तर आपली पिढी भविष्यात तग धरेल याची खात्री विनिशाला वाटते. आपणही आपल्या आजूबाजूचं निरिक्षण करुन विनिशासारखं काम उभं करायचं का? याचा नक्की शांतपणे विचार करा. तुमचं काही ठरलंच तर मग तुम्ही काय करणार हे मला नक्की लिहून पाठवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact